मज खुणावतो तो पूर्णविराम- १९ सप्टेंबर २०१७

/ / marathi

पु. ल. देशपांडे यांच्या ‘रावसाहेब’ या व्यक्तिरेखेमध्ये एक सुंदर वाक्य आलं आहे. पु. ल. कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत हे कळल्यावर त्यांना कानडी हेलात रावसाहेब प्रश्न विचारतात “ते मराठी मध्ये काय शिकवायचं असतं हो त्यांतं “. ते वाक्य पहिल्यांदा ऐकल्यावर मी खळखळून तर हसलोच आणि मन लगेच भूतकाळात गेलं. अगदी खरं सांगतो असे काही प्रश्न मलाही पडले होते. इंजिनीरिंग कॉलेज मध्ये कॉम्पुटर सायन्स या शाखेत प्रवेश घेतलेले माझ्यासारखे अनंत विद्यार्थी प्रथम वर्षात शिकताना ‘पाण्याचे गुणधर्म’ हा रसायनशास्त्रामधला भाग का शिकतात, हे जसं मला अजूनही न सुटलेलं कोडं आहे तसंच, मंदाक्रांता, शार्दूलविक्रीडित, भुजंगप्रयात , इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, शिखरिणी इत्यादी नावांची समवृत्त , विषमवृत्त किंवा अर्धसमवृत्त मी शाळेत का शिकलो हे ही तितकंच कुटील कोडं आहे. मला तर वाटतं आताच्या इंग्रजी माध्यमाच्या “यो” पिढीला ही वृत्तांची नावं म्हणजे बाळकृष्णाने लहानपणी मारलेले पण फार प्रसिद्धी न पावलेले राक्षस आणि राक्षशिणी होत्या असं सांगितलं तरी त्यांचा विश्वास बसेल. ही अशी हॉरर नावं मराठी व्याकरणात कोणी आणि का दिली हे खरंच न सुटलेलं कोडं आहे.

जी गत वृत्तांची तीच मराठीतल्या विरामचिन्हांची. आधीच कान्हा, मात्रा, वेलांटी, इकार, उकार, अनुस्वार, विसर्ग या चक्रव्यूहात आमचे अभिमन्यू व्हायचे त्यात मग अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह इत्यादी शस्त्रास्त्रांनी तर जीव मेटाकुटीला यायचा. बरं ही शस्त्रास्त्र वापरायची कधी आणि कशी याचेही काही नियम असतात. जसं रामायण महाभारतातली शस्त्रास्त्र नीट अभिमंत्रित केली नाही की त्यांच्या वापरकर्त्यावर उलटायची तशी एखादा नियम चुकीचा वापरला तर ती विरामचिन्ह आपल्यावर उलटतील की काय अशीही एक भीती आमच्या भाबड्या बालमानात असायची.

या सगळ्या जंजाळात मला मनापासून आवडायचा तो पूर्णविराम. कारण या चिन्हाला काही कॉम्प्लिकेशनच नाही. वाक्य संपलं की वापरायचं इतका साधा आणि सोपा नियम. कधी चुकायची शक्यता नाही आणि उलटायची भीती त्याहून नाही. एखादं वाक्य कितीही क्लिष्ट असलं तरी पूर्णविराम आला की हुश्श करायचं. वाक्यातल्या सगळ्या उठाठेवीनंतर एकप्रकारची शांती मिळते पूर्णविरामात.

आता मोठं झाल्यावर आयुष्याच्या व्याकरणातही अजूनही पूर्णविरामच भुरळ पाडतो. आयुष्यात येणारी वेगवेगळी विरामचिन्ह अनुभवताना, त्यांच्याशी दोन हात करताना शेवटी एकच ध्येय असत ते म्हणजे पूर्णविराम. प्रत्येक जीवनाचा सुखद अंत म्हणजे पूर्णविराम. असा विराम की जो आल्याशिवाय पुढचं वाक्यच सुरु होऊ शकत नाही. म्हणूनच मला वाटतं,

मान पराभव हर्ष दुःख हे
आयुष्यातील स्वल्पविराम।
मज खुणावतो तो पूर्णविराम ।।

जीवनातली प्रश्नचिन्ह अन
घटनांची उद्गारचिन्ह ती ।
तया पाहता येऊन ठेला
आयुष्याचा अर्धविराम ।
मज खुणावतो तो पूर्णविराम ।।

बाल्यही सरले पंखाखाली,
तारुण्याची झिंग चाखली ।
आता भावे समर्पणाचा
हृदयालागी तो विश्राम ।
मज खुणावतो तो पूर्णविराम ।।

सौख्यही मिळते दुःखही होते
संकटातही मन सावरते ।
स्थितप्रज्ञता क्षणीक मिळण्या
मुखात यावे माझ्या नाम ।
मज खुणावतो तो पूर्णविराम ll

प्रपंच जर का खेळच आहे
कशास मन मग चिंता वाहे ।
गुरुचरणांवर भार टाकुनी
मुखी धरावा राजाराम ।
मज खुणावतो तो पूर्णविराम ।।

मित्र सोयरे नाती गोती
काळामध्ये वाहून जाती ।
एक सत्य राहील स्वतःशी
श्रीराम जयराम जयजय राम ।
मज खुणावतो तो पूर्णविराम ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *