
परवा गणेशोत्सवात एक ५-६ वर्षाचा छोटा मित्र माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला “काका, तुम्हाला एक कोडं घालू का?”. मी हो म्हटल्यावर त्यानी विचारलं ” काका ATM चा फुलफॉर्म सांगा.” मी म्हटलं, “अगदीच सोपं आहे. (A)ऑल (T)टाइम (M)मनी”. माझं उत्तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे चुकल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर झळकला आणि तो म्हणाला , ” नाहीच मुळी. खरं उत्तर आहे, (A)असेल (T)तर (M)मिळेल”. मी पण त्याला अपेक्षित असलेला बावळट भाव चेहेऱ्यावर आणला आणि हसलो. आणि तो एखादा गड जिंकल्याच्या अविर्भावात, चेहऱ्यावर विजयी मुद्रा घेऊन दुसऱ्या काकाला “मामा” बनवायला निघून गेला.
या निरागस प्रश्नोत्तरामुळे मी मात्र खरंच विचारात पडलो. त्यानी सांगितलेलं उत्तर किती खरं आहे आणि ते केवळ बँक आणि पैशाच्या बाबतीतच लागू आहे असं नाही तर माणसांच्या बाबतीतही ते किती यथायोग्य आहे हे लक्षात यायला लागलं. बँकेच्या बाबतीत, पैसे सतत डिपॉझिट करून जितके पैसे डिपॉझिट करू तितकेच पैसे काढता येतात. पण माणसांच्या बाबतीत मात्र याही पुढे जाऊन एका अद्भुत निसर्गनियमाप्रमाणे एका गोष्टीचं डिपॉझिट करून दुसरी अधिक मौल्यवान आणि कितीतरी अधिक प्रमाणात गोष्ट मिळते.
व्यायाम डिपॉझिट केला तर आरोग्य परत मिळतं. विश्वास डिपॉझिट केला तर निष्ठा परत मिळते. प्रेम डिपॉझिट केलं तर समर्पण परत मिळतं. कर्म डिपॉझिट केलं तर साफल्य परत मिळतं. तेव्हा माणसाने स्वतःच्या किंवा इतर माणसांच्या बाबतीत केलेली जी डिपॉझिट्स असतील त्याप्रमाणे त्याला अद्भुत निसर्गनियमानुसार कितीतरी अधिक प्रमाणात (A)अपेक्षित (T)ते (M)मिळेल. अर्थात, माणसांच्या बँकेतही आपली डिपॉझिट्स मात्र सतत करावी लागतात.
ही स्थिती माणसांची तर भगवंताच्या बाबतीत? तो तर चिन्मय जगद्नियंता. त्याला काय कमी आहे! मग त्याच्या बँकेचे नियम काय असतील?
ते समजण्याची कुवत माझ्यात नाही. संतच ते सांगू जाणे. पण संतांच्या शिकवणुकीमधून एक गोष्ट मात्र लक्षात आली आहे. भंगवंताच्या बँकेत आपण अगदी थोडी थोडी भक्ती समर्पण भावाने डिपॉझिट करत राहिलो तर, आपण न मागताही, भगवंताकडून (A)आवश्यक (T)ते (M)मिळेलच
पण भगवंताच्या बँकेची बम्पर ऑफर काय आहे माहित्ये?
आपला अहं, तोही आयुष्यात फक्त एकदाच आणि कायमचा डिपॉझिट केला नं की त्या दयासागर ईश्वराकडून आपल्याला ध्यानी मनी नसताना एका सुवर्णक्षणी (A)अलौकिक (T)तेही (M)मिळेल…