बाळाची वर्चुअल रिऍलिटी – २६ मार्च २०१९

/ / marathi

मी काही दिवसांपूर्वी प्रवासाला गेलो होतो. एका ठिकाणी खाण्यापिण्यासाठी थांबलो असताना माझ्या समोरच एक आई तिच्या चार पाच महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. माझ्या हातात गरम गरम चहा होता आणि मी त्या गोंडस बाळाचं निरीक्षण करत होतो.  गालावर आणि कपाळावर काळी तीट लावलेली, कानात छोटे मोत्याचे डूल, डोक्यावर मोजकेच केस, अंगात एक झबलं आणि तोंडात इवली इवलीशी बोटं आणि कधीतरी अख्खा हात घालण्याचा प्रयत्न सुरु होता आणि तोंडातून त्या झटापटीमुळे मुखरस गळत असलेलं असं ते रुपडं होतं. त्या बाळाचे डोळे भिरभिरत होते. हलणारी प्रत्येक गोष्ट त्याचं लक्ष वेधून घेत होती आणि जिथे जिथे लक्ष जात होतं त्या गोष्टीचं कमालीच्या एकाग्रतेने निरीक्षण करणं सुरु होतं. त्याच्या दृष्टीने त्याच्या आजूबाजूचं सगळंच विचित्रविश्व होतं. त्या विश्वातली प्रत्येक गोष्ट त्या बाळासाठी नवीन होती. आणि त्या विश्वात घडणारी प्रत्येक गोष्ट ते इवलंसं बाळ एखाद्या स्पंज प्रमाणे त्याच्या डोळ्यातून, कानातून फक्त शोषून घेत होतं. चेहऱ्यावर केवळ निरागस भाव होते. डोळे लुकलुकत होते, मान डुलडुलत  होती आणि पाठीच्या कण्यावर शरीराचा तोल सावरत सावरत, त्याची डुगडुगी या विश्वाचा अनुभव त्याच्या परीने साठवण्याचा प्रयत्न करत होती.
मनात आलं, की काय सुरु असेल त्याच्या मेंदूत त्या वेळी? त्या बाळाच्या दृष्टीकोनातून हे जग कसं दिसत असेल? मी विचारात पडलो.

हल्ली एक वर्चुअल रिऍलिटी (आभासी अस्तित्व)  म्हणून तंत्रज्ञान विकसित झालं आहे. या तत्रंज्ञानाचा उपयोग करून खरं वाटावं इतकं आभासी जग निर्माण केलं जातं आणि त्या जगात मानव प्रवेश करून त्या जगाशी संवाद साधतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग विमानचालक, अंतराळवीर इत्यादींना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो तसेच या तंत्रज्ञानावर विकसित केले गेलेले अनेक विडिओ गेम्सही आता उपलब्ध आहेत.

मी जेव्हा त्या बाळाचं निरीक्षण करत होतो तेव्हा माझा त्या बाळाच्या शरीरात जणू परकाया प्रवेश होत होता. मी कल्पना करू लागलो की त्या बाळाचे डोळे हे जणू त्याच्या आजूबाजूच्या विश्वात शिरण्यासाठी वर्चुअल रिऍलिटी च्या विडिओ गेम मध्ये वापरल्या जाणाऱ्या गॉगल सारखे आहेत. जर ते डोळे माझ्या जाणिवेला लावून मी त्या बाळाच्या डोळ्यातून त्याच्या विश्वात शिरलो तर मला काय दिसेल? मला काय अनुभव येईल?

माझी कल्पना जसजशी सूक्ष्म होऊ लागली तसा माझ्या त्या बाळाच्या अंतरंगातील प्रवास जणू सुरु झाला आणि त्या प्रवासात काही गोष्टी जाणवू लागल्या. पहिली ही की बाळाकडे पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांच्या मार्फत काही गिगाबाईट इतका डेटा दर क्षणाला निर्माण होत असेल आणि तो मेंदूत नकळत साठवला जात असेल,त्याचं वर्गीकरण केलं जात असेल. या प्रक्रियेत कुठलीही चाळणी लावली जात नसेल आणि प्रत्येक इंद्रियजन्य अनुभव नवीनच असल्यामुळे अगदी प्रत्येक लहान सहान गोष्टीतही प्रचंड कुतूहल असेल.

मग मला असं लक्षात आलं की ते बाळ दशेंद्रियजन्य अनुभव जरी घेत असलं तरी त्या अवस्थेत भाषा नावाचा प्रकार पूर्णपणे विकसित झालेला नसल्यामुळे ,  शब्दांच्या आधाराने निर्माण होतात असे जे विचार ते निर्माणच होत नसतील. विचार नसल्यामुळे त्या अनुभवांतुन अनुमान काढणं होत नसेल. अनुमान नसल्यामुळे विश्लेषण नसेल. विश्लेषण नसल्यामुळे, पर्याय नसतील, पर्याय नसल्यामुळे निवड नसेल. निवड नसल्यामुळे  हवंनकोपण नसेल, हवंनकोपण नसल्यामुळे वृत्तीचं समत्व असेल आणि वृत्तीचं समत्व असल्यामुळे आपपरभाव रहित ती अवस्था असेल म्हणजेच स्थितप्रज्ञता असेल या स्थितप्रज्ञ अवस्थेतच अखंड समाधान आणि नि:शब्द शांती असेल. आणि तेच अखंड समाधान बाळाच्या चेहऱ्यावर निरागासतेच्या रुपात दृश्यमान होत असेल. तीच निरागसता जी आत्मसाक्षात्कारी संतांच्या चेहऱ्यावर विलसत असते. त्या बाल्यावस्थेत कुणी आवडता नसतो ना कुणी नावडता. ना सोनं, रुपं यांचं महत्व ना जमिनीवरची माती तोंडात घालण्यात कमीपणा. ना आकर्षक कपड्यांचं आकर्षण ना लंगोटातील (आताच्या डायपरमध्ये) होणाऱ्या मलमूत्राविषयी घृणा.

म्हणजेच यातून हेही लक्षात आलं की इंद्रियजन्य अनुभव घेऊन सुद्धा संतमंडळी निर्लेप राहतात याचा गाभा हा मुळात त्या अनुभवांचं भाषायुक्त विचारात परिवर्तन न होणं यात आहे. आणि म्हणूनच नित्य नैमित्तिक कर्म करत असताना इंद्रिय जरी कर्मरत असली आणि इंद्रियजन्य अनुभव जरी येत असले तरी मन जर नि:शब्द राहिलं तर त्या अनुभवांचं भाषायुक्त विचारात परिवर्तन होत नसल्याने अखंड समाधान टिकतं आणि मन निःशब्द करण्याचा अभ्यास म्हणजेच अनुसंधान ठेवणं आहे आणि हेच तर सर्व संत सांगत आहेत. 

एका प्रवचनात एका स्वामींनी सांगितलं होतं की अखंड शांती हवी असेल तर मनातल्या मनात स्वतःशी बोलणं कमी करत करत शेवटी स्वतःशी बोलणं पूर्णपणे थांबवा. त्यावेळी संकल्पना कळली होती पण त्याचा व्यवहारात अभ्यास कसा करायचा याची दृष्टी मला या बाळाच्या वर्चुअल रिऍलिटीमध्ये शिरलो तेव्हा मिळाली. त्याच वेळी मानवी जीवनाच्या संबंधातली अजून एक गंमतही मला या बाळाच्या वर्चुअल रिऍलिटीचा विचार करताना लक्षात आली ती ही की ही निरागस बाल्यावस्था माणूस जेव्हा प्रत्यक्ष अनुभवत असतो तेव्हा त्याला ती व्यक्त करता येत नाही आणि जेव्हा व्यक्त करता येऊ शकते तेव्हा या बाल्यावस्थेचं पूर्ण विस्मरण माणसाला झालेलं असतं. ही अशी मेख ईश्वराने मानवी जीवनात का करून ठेवली आहे हे परमेश्वरासच ठाऊक. पण पतंजली योगसूत्रांपासून ते सर्व संत महंतांपर्यंत सर्वांनी निर्विचार मन म्हणजेच समाधीचा अनुभव असं सांगितलं आहे आणि या निर्विचारी मनाची तयारी मनाला नि:शब्द करण्याने होते आणि त्या साठी या बाळाच्या डोळ्यांच्या मार्फत अनुभवलेल्या या वर्चुअल रिअलिटीच्या खेळाचा खूप उपयोग होऊ शकेल असं मला मनापासून वाटलं.

असं म्हटलं जातं की ज्याच्याशी तुमचं मन जडतं त्याचा आकार मन घेतं.  मला पूर्ण कल्पना आहे की नि:शब्द , निर्विचार, निर्विकल्प होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे पण जर मी बाळाच्या वर्चुअल रिऍलिटी चा खेळ खेळत राहिलो तर मनाच्या या वैशिट्यामुळे त्या बाळाचा निरागसपणा जरी मनाला मिळाला तरीही जो आनंद मिळेल तो मात्र वर्चुअल म्हणजेच आभासी नसेल तर ती एक जीवनातील रिऍलिटी म्हणजे सत्य  असेल हे नक्की !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *