बर्म्युडा चड्डीतले पुंडलिक – २७ जुलै २०१९

/ / marathi

तीन चार दिवसांपूर्वी आमच्याकडे आमचे एक स्नेही आले होते. चर्चा  करता करता विषय परदेशात राहणारी पुढची पिढी आणि त्यांचे इथे एकटेच राहणारे म्हातारे आईवडील यावर आला. त्यांच्या सोसायटीतील अठ्ठावीस पैकी चोवीस फ्लॅट मध्ये पुढची पिढी परदेशात स्थायिक झाल्यामुळे त्या फ्लॅटमध्ये म्हातारं जोडपं किंवा मागे राहिलेलं दोघांपैकी कुणीतरी एक असे एकटेच राहत असल्याचं त्यांनी सांगितलं, आणि नंतर  एकंदरीतच त्या स्नेह्यांचा सूर हा ‘पुढची पिढी आपल्या म्हाताऱ्या झालेल्या, एकट्या पडलेल्या आई वडिलांना सोडून कशी परदेशात मजेत राहते आहे, आणि त्या मुलांना आपल्या आई वडिलांच्या एकटेपणाची कशी जाणीव नाही’, असा होता.

मीही परदेशात काही वर्षे राहिलेलो असल्यामुळे मी त्या संभाषणात ओढला गेलो. परदेशात इतकी वर्षे राहून सुद्धा नंतर मी कुटुंबासह भारतात परत आलो म्हणून माझ्याबद्दल त्यांच्या मनात जरा सॉफ्ट कॉर्नर होता पण एकंदरीतच परदेशात स्थायिक झालेल्या पुढच्या पिढीबद्दलची कटुता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. मी परदेशस्थ मुलांची बाजू मांडण्याचा थोडा प्रयत्न केला पण त्यांचा एकंदरीत मूड पाहून मी काही फार संभाषण वाढवलं नाही. 

 

या संभाषणानंतर माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरू झालं. भारतात, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र सर्व काही मागे सोडून, भारतातून एक दिवस उठून दोन बॅगांच्यात राहील इतकंच सामान घेऊन आणि खिशात काही तुटपुंज्या डॉलरच्या पुंजीसह जेव्हा मुलगा किंवा मुलगी परदेशात जाते तेव्हा नवीन प्रदेशात, नवीन लोकांत , नव्या संस्कृतीत, नव्या भौगोलिक परिस्थितीत, नव्या समाजरचनेत, नव्या कार्यपद्ध्तीशी जुळवून घेण्यात, रीतिरिवाज समजून घेण्यात, तिथल्या वातावरणाशी आणि एकंदरीतच परदेशी राहणीमानाशी जुळवून घेण्यात काय त्रेधातिरपीट होते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. एक हवेचा टायर गळ्यात टाकून महासागरात पडल्यागत परिस्थिती असते. सुरुवातीच्या काळात डोक्यात सतत ‘एक डॉलरचे रुपये किती’  हे गणित सुरू असतं आणि अशा परिस्थितीत तीन डॉलरचे म्हणजेच दीडशे ते दोनशे रुपयांचे दोन समोसे विकत घेण्याचं धाडस त्या काळात होत नाही, हा किंवा तत्सम अनुभव म्हणजे भारतातून परदेशात गेलेल्या जवळजवळ सगळ्या मंडळींच्या अगदी मर्मबंधातली ठेव असते हे मी स्वानुभवाने आणि खात्रीपूर्वक सांगू शकतो. कामासाठी असो वा शिक्षणासाठी, परदेशगमन केलेल्या सर्वांनाच डॉलर किंवा पौंड किंवा तत्सम वाचवायचे म्हणून सुरुवातीच्या काळात काय काय क्लुप्त्या आणि युक्त्या कराव्या लागल्या या बाबतीतले किस्से हे नवीन भूमीत मूळ धरू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवांच्या पोटलीत भरलेले असतातच असतात. 

 

जेव्हा तिथे तो मुलगा किंवा मुलगी स्वतःला त्या महासागरात सावरू पाहत असते. डॉलर किंवा पौंड वाचवण्याची तारेवरची कसरत करत असते त्याच वेळी भारतात त्यांच्या आईवडिलांचा उर त्यांचा मुलगा किंवा मुलगी परदेशी आहेत असं समाजात  सांगताना अभिमानाने भरून आलेला असतो. साहजिकच परदेशस्थ मुलाचं किंवा मुलीचं लग्नाच्या मार्केटमधलं बाजारमूल्यही वाढलेलं असतं. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी स्थळं सुद्धा तशीच तोलामोलाची पहिली जातात. तसंही, शिक्षण असो किंवा नोकरी, परदेशात जाऊन शिकायचं, थोडा कामाचा अनुभव घ्यायचा, बरेचसे डॉलर, पौंड इत्यादी गाठीला बांधायचे आणि तीन ते पाच वर्षात भारतात परत यायचं या “दृढ निश्चयाने” मुलगा किंवा मुलगी परदेशस्थ झालेली असते. त्यामुळे मनाची पंचवार्षिक तयारी, मुलं काय किंवा आईवडील काय , दोघांचीही झालेली असते. 

मुलांच्या बाबतीत तर विशेषतः असंही घडतं की संपूर्ण वर्षाच्या साठवून ठेवलेल्या सुट्टीतल्या वीस दिवसात भारतात येऊन  घरच्यांनी आधीच शॉर्टलिस्ट करून ठेवलेल्या पाच ते सात मुलींना भेटून, त्यातल्याच एकीला पसंत करून बहुतेकवेळा लग्न करूनच (थोडक्यात उरकून) मुलगा परदेशात परतही जातो.  लग्न झाल्यावर मग यथासांग व्हिसावगैरे पदरात पाडून मग नवखी सूनही परदेशात जाते. काही दिवस झोपाळ्यावाचून झुलण्यात जातात आणि मग एक आनंदाची बातमी भारतात पोहोचते. मग पहिल्या बाळंतपणाच्या निमित्ताने त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही आई वडिलांची परदेशवारीही घडते. आणि सगळीकडेच एकंदरीत आनंदी आनंद असतो. त्यावेळी जेव्हा भारतात परत येण्याचा विषय निघतो त्यावेळी, “भारतापेक्षा  परदेशातच करिअरला आणि टॅलेंटला कसा अधिक वाव आहे याची चर्चा होते आणि ‘मुलांच्या भल्यासाठी’ परदेशातच थोडा अधिक काळ राहण्याचं ठरतं आणि विषय लांबणीवर पडतो. 

 

मग सुरवातीला ठरलेल्या तीन ते पाच वर्षांची योजना वाढून त्याची पंधरा वर्ष कधी होतात ते ना मुलांच्या लक्षात येत ना आईवडिलांच्या. याच दरम्यान परदेशात असलेली पिढी अपार्टमेंट मधून सिंगल फॅमिली होम किंवा त्याही पेक्षा मोठ्या घरात रहायला गेलेली असते. करिअर मध्ये उच्चपदस्थ होण्याकडे मार्गक्रमणा सुरू झालेली असते. साधारण ग्रीनकार्ड किंवा तत्सम कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना  मिळालेला असतो, टुमदार घरासमोर दोघांच्या दोन टुमदार गाड्या आलेल्या असतात. इंडियातून दोन वर्षातून एकदा येणाऱ्या आईवडिलांना प्रेक्षणीय स्थळं दाखवण्याच्या निमित्ताने खरेदी केलेली एखादी व्हॅन उभी असते. विकेंडला दोनचार मित्रांची कुटुंब एकत्र येऊन पॉटलकच्या पार्टीज व्हायला लागतात. बर्म्युडा चड्डी घालून आपापल्या गाड्यातून लॉंग ड्राइव्हला जाणं सुरू असतं. त्यातच शाळेत जाऊन हळू हळू इंग्रजाळणाऱ्या आपल्या मुलांना इंडियन कल्चर कळलं पाहिजे म्हणून मागच्या एखाद्या इंडियाच्या ट्रिपवेळी आणलेले झगझगीत उंची झब्बे घालून ‘एलिफन्ट गॉड फेस्टिवल’ ( गणपती उत्सव), ‘फेस्टिवल ऑफ लाईट’ (दिवाळी) वगैरेसाठी  जवळच्या महाराष्ट्र मंडळाचं सभासदत्व घेऊन मुलांच्या मनाविरुद्ध त्यांना खेचडत तिथे घेऊन जाऊन आपल्या कल्चरची गोडी लावण्याचा एक हतबल प्रयत्न सुरू असतो. त्यातच मातृभाषा यायला पाहिजे म्हणून त्या भागातल्या मराठीप्रेमी लोकांनी सुरू केलेल्या एखाद्या मराठी शाळेत घालून बघण्याचाही एखाद-दोन वर्ष प्रयत्न होतो. त्यातल्यात्यात पाहिलं मूल तरी जोर जबरदस्तीने मराठी बोलण्याचा प्रयत्न करतं पण त्यातच त्या पालकांचं इतकं रक्त आटलेलं असतं की दुसऱ्या आणि त्याच्या पुढच्या मुलाच्यावेळी तो नाद पालक वेळेवारीच सोडून देतात. 

 एकंदरीतच परदेशी जीवन आणि आपली संस्कृती दोन्ही सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरू असते. खरं तर बर्म्युडा चड्डी घालून सगळीकडे वावरणं काय किंवा, त्या त्या देशाच्या ऍकसेन्ट मध्ये इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न काय हे सगळं तिथल्या मातीत संस्कृतीत मिसळून जाण्यासाठी चाललेले प्रयत्न असतात कारण तिथल्या लोकांनी तुम्हाला त्यांच्यात सामावून घेणं ही मानसिक , भावनिक आणि सामाजिक गरज असते. ‘When you are in Rome, Do what Romans do’ या म्हणीच्या तत्वानुसार सुरू असलेले ते प्रयत्न असतात. म्हणूनच काही अपवाद सोडले तर ‘प्रकाश’ चा ‘कॅश’ होणं, ‘समीर’ चा सॅम होणं किंवा धनंजयचा ‘डॅन’ होणं हा त्याच प्रयत्नांतला एक भाग असतो. परदेशी जिभेला ‘अरनॉल्ड श्वार्ट्सझेनेगर’ किंवा ‘अल्बर्ट श्वाइटझर’ म्हणता येत असेल तर ‘राजेंद्र वैशंपायन’ उच्चारता आलंच पाहिजे असा हट्ट धरणारे काही माझ्यासारखे खट असतात पण त्याचं प्रमाण थोडकं. गम्मत म्हणजे जवळजवळ सगळ्याच समवयस्क भारतीय परदेशस्थांची कमी अधिक फरकाने सारखीच परिस्थिती असल्यामुळे त्या पंचतंत्रातल्या गोष्टीप्रणाने शेपटी कापले गेलेले सगळेच निळे कोल्हे दुसऱ्याची आपल्यापेक्षा फार वेगळी स्थिती नाही हे लक्षात येऊन हास्य चेहऱ्यावर ठेऊन जीवनात जास्तीत आनंद निर्माण करण्याचा निदान तसं  मानण्याचा आणि भासवण्याचा प्रयत्न करत दररोजचा उगवणारा दिवस साजरा करत असतात. 

 

या स्थितीत परदेशात गेलेल्या पिढीला आणि त्यांच्या आईवडीलांना आता ‘पुन्हा  भारतात कायमस्वरूपी माघारी येणे शक्य नाही’ हे कळून चुकलेलं असतं. एकीकडे आपले आईवडील म्हातारे होतायत याची जाणीव आणि दुसरीकडे  तिथे जन्माला आलेली परदेशी नागरिक असलेली, ‘डर्टी इंडिया’ शी नाळ तुटलेली आणि भारतात परतण्याची सुतराम शक्यता नसलेली पुढची पिढी या दोघांमध्ये मधली पिढी अडकते. जीवनातल्या अप्रिय पण अटळ सत्याचा सामना करण्याची वेळ आलेली असते. चक्रव्यूहात आत गेलेल्या पण बाहेर येण्याची क्लुप्ती माहीत नसलेल्या अभिमन्यूसारखी स्थिती झालेली असते. आणि एक विचित्र अपराधीपणाची बोच जाणवायला लागलेली असते.  गाठीशी आता पुरेसे पैसे असतात पण भारतात परत येऊन आईवडिलांच्या सहवासाची इच्छा असली तरी त्यांना देण्यासाठी पुरेसा वेळही नसतो आणि तशी परिस्थितीही नसते. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो की हा त्या परदेशस्थ मुलांचा निष्काळजीपणा नाही तर नाईलाज असतो. या बर्म्युडा चड्डीतल्या पुंडलिकांना आईवडिलांची काळजी नक्कीच असते पण जीवनाने समोर इतकी क्लिष्ट परिस्थिती आणून ठेवलेली असते की शेवटी मनावर दगड ठेवणं त्यांना क्रमप्राप्त असतं. भरपूर पैसे पाठवून आपल्या आईवडिलांची आपल्या अपरोक्ष पुरेशी काळजी घेणाऱ्या एखाद्या ब्युरोच्या 24 तासांच्या मावशी ठेवण्यापालिकडे काहीच करता येणं शक्य नसतं. 

 

खरं तर मी यातली बरीचशी मनस्थिती स्वतः अनुभवली नसली तरी इतरांकडे पाहून  अशावेळी त्यांच्या मनाची काय घालमेल होते हे मी माझ्या परदेश वास्तव्यात जवळून पाहिलं आहे.. योगायोगाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले गेल्याने मी या अपराधीपणाच्या भावनेतून सुटलो पण आपण आपल्या आईवडिलांच्या प्रत्यक्ष सहवासात राहून काळजी घेऊ शकत नाही ही भावना मन कसं कुरतडत असेल हे मी समजू शकतो. 

 

मी या परिस्थितीच्या आणि  परिस्थितीजन्य मनस्थिच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात. 

 

  1. आपल्याला कुठे थांबायचं आहे आणि नक्की जीवनात काय हवं आहे आणि त्यासाठी आपण काय गमावतोय याचा हिशोब करावा असं भारतातून गेलेल्या आणि तिथे कायम वास्तव्य करायचा निर्णय घेणाऱ्या परदेशस्थ लोकांना वाटत नसेल का ? 

 

२. तसं वाटत असेल आणि तसा हिशोब झाला असेल तर त्या दिशेने गांभीर्याने निर्णय का घेतले जात नसतील? 

 

  1. आपल्या मुलांना आपल्या मायेपेक्षा परदेशातली ऐहिक सुखं अधिक भावतात, आईवाडीलांपेक्षा परदेश अधिक प्यारा वाटत असेल तर केवळ मुलांना संपूर्ण दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांना वाढवताना माया लावण्यात, कर्तव्याची जाणीव देण्यात  यापण कुठे कमी पडलो का, हे आत्मपरीक्षण आईवडिलांनीही परखडपणे करायला नको का ?  

 

  1. प्रत्येक जण म्हातारं होणारच आहे. त्या परिस्थितीचं नियोजन टाळत राहण्या ऐवजी जेव्हा शक्ती आणि शक्यता  दोन्ही आहे तेव्हाच मुलं आणि आईवडिलांनी बसून मोकळेपणाने बोलून ते नियोजन करणे आणि त्या दिशेने पाऊलं उचलणे दोघांच्याही भविष्याच्या दृष्टीने अधिक हितकारी होणार नाही का? 

 

  1. आपण आयुष्यभर नियोजन करत असतो. म्हातारपणाचं आर्थिक नियोजनही करतो काही अंशी शारीरिक काळजी आणि नियोजनही करतो पण त्याच म्हातारपणासाठी मानसिक आणि भावनिक नियोजन करण्यात आपण कमी पडतो का ? 

 

  1. जसं उत्तम करिअर व्हावं म्हणून आपण सजग असतो आणि अगदी प्राथमिक शाळेपासून तयारी करतो तशी म्हातारपणाची एकटेपणाची मानसिक आणि भावनिक तयारी तरुणपणीच धडधाकट असताना करायला नको का ? 

 

मला वाटतं जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि जितकी घरं तितक्या परिस्थिती. म्हणून या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ज्याची त्यांनीच शोधायची असतात, ज्याची त्यांनाच शोधायला लागतात. पण एक तथ्य मात्र मी अगदी छातीठोकपणे सांगतो. आमच्याकडे त्या दिवशी आलेल्या स्नेह्यांसारखं भारतातल्या लोकांना कितीही वाटो, की परदेशात जाऊन मुलं आईवडिलांना विसरतात,  पण परदेशात गेलेल्या या बर्म्युडा चड्डीतल्या पुंडलिकांचा एकही दिवस आपल्या आईवडिलांच्या काळजीशिवाय किंवा आठवणीशिवाय जात असेल असं मला तरी वाटत नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *