फ्युजन सप्तपदी – २० सप्टेंबर २०१९

/ / marathi

गेल्या महिन्यात माझ्या व्यवसायाच्या काही कामानिमित्त अमेरिकेत गेलो होतो. तिथे गेल्यावर काम तर असतंच पण कामाव्यतिरिक्त सुहृदांच्या भेटीगाठी आणि गप्पा टप्पा यात दिवस कसे  भुर्रकन उडून जातात कळतच नाही. वेगवेगळे विषय निघतात चर्चा रंगतात गमतीदार अनुभव एकमेकांना सांगितले जातात. अशाच एका खास सुहृदांबरोबर एका संध्याकाळी एक छान चर्चा रंगली. मी ज्यांच्याशी गप्पा मारत होतो ते बऱ्याच वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांचा स्वतःचा उत्तम व्यवसाय आहे  पण ते सेवाभावनेने आणि तिथल्या भारतीय समाजाची गरज म्हणून पौरोहित्याचं काम करतात. अगदी बारसं, मुंजीपासून ते लग्नापर्यंत आणि सत्यनारायण पूजेपासून ते वास्तुशांतीपर्यंत सगळे विधी ते उपलब्ध सामग्रीसह तिथे उत्तमरीत्या पार पाडतात.
त्यांच्याशी गप्पा मारताना  सहज त्यांनी काही गमतीशीर अनुभव सांगितले. मग त्यात सत्यनारायणाच्या दर्शनासाठी घरी खूप ‘गेस्ट’ येणार असल्यामुळे आणि मेकअप  हेयरडू साठीच यजमानीण बाईंना किमान दोन तास लागत असल्यामुळे अर्ध्या तासात सत्यनारायण पूजा उरकुन घेण्याची विनंती झाली. एका लग्नात फोटोग्राफर ने तीन तास घेतल्यामुळे लग्न वीस मिनिटात लावण्याची विनंती झाली. एक लग्नात तर मुलगा हिंदू आणि मुलगी वेगळ्या धर्माची असल्यामुळे आणि दोघांनीही आपापल्या पद्धतीने विवाह करण्याचा आग्रह धरल्यामुळे एकीकडे धोतर नेसून माझे स्नेही आणि दुसरीकडे झगा घालून दुसऱ्या धर्माचा धर्मगुरू असे एकमेकांसमोर उभे ठाकले होते.  एक संस्कारविधी हिंदू पद्धतीने आणि पाठोपाठ एक विधी पाश्चात्य पद्धतीने एकामागोमाग असा फ्युजन विवाह केला जात होता. त्यामुळे एकीकडे सप्तपदीचं एकेक पाऊल पुढे टाकल्यानंतर इंग्रजी मध्ये ‘आय डू’ ‘आय डू’ म्हणून आणाभाका होत होत्या. नंतर तर पांढऱ्या शुभ्र वेडिंग गाऊनवर रेशमी शेला पांघरून वधू उभी राहिली आणि मंगळसूत्र परिधान विधी झाल्यानंतर लगेच त्याच्या पाठोपाठ वधुवरांचा सर्वांसमक्ष चुंबन विधीही त्या विवाहात पार पडला. माझ्या स्नेह्यांचं असं अनुभव वर्णन सुरू असताना  तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि मी दिगमूढ झालो. त्यांचं हे वर्णन सुरू असतानाच एकदा अशाच भरतामधल्या एका पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींनी भारतातल्या परिस्थितीचं केलेलं वर्णन मला आठवू लागलं. काही तांत्रिक बिघाडामुळे फोटोग्राफर ने काढलेले लग्नविधीचे फोटो पुसले गेल्यामुळे त्याच दाम्पत्याचा त्याच मंडपात दोनदा विवाह करावा लागल्याचा प्रसंग असो, किंवा एका पर्यावरणवादी व्यक्तीच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला प्लॅस्टिकची ‘रियुजेबल’ तुळशीपत्र वाहण्याचा प्रसंग असो किंवा रुद्राभिषेकानंतर अभिषेकाच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे हे कळल्यावर संपूर्ण रुद्राभिषेक  बिस्लरीच्या पाण्याने केल्याचा प्रसंग असो. हे सगळे प्रसंग ऐकून आणि आठवून मला मनातल्या मनात खूप हसू आलं.

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते खरं आहे आणि शास्त्र किंवा विधी हे माणसासाठी असतात माणूस शास्त्रविधीसाठी नसतो आणि शास्त्रात स्थळकाळा प्रमाणे काही बदल होणं अपेक्षित आहे हे जरी मान्य केलं तरी एखादा संस्कार किंवा एखादा विधी का करायचा यामागची कारणमीमांसा लक्षात घेऊन जर तो केला तर त्याचा अपेक्षित परिणाम साधला जाईल ना ? हिंदू धर्मात काय किंवा इतर कुठल्याही धर्मात शास्त्र, विधी, संस्कार यामागे माणसाच्या शारीरिक, मनासिक आणि भावनिक जडण घडणीचा आणि त्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार केलेला असतो. तो विचार समजून घेऊन मग स्थळकाळाप्रमाणे त्या विधी अथवा संस्कारात बदल केला तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळू शकेल असं मला वाटतं.
आणि असं झालं तर ‘गेस्ट’ ना घरी बोलावण्यासाठी ना सत्यनारायणाची पूजा थोडक्यात उरकावी लागणार ना विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी फ्युजन सप्तपदीची गरज भासणार. नाही का ? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *