फॉसबरी फ्लॉप – १४ नोव्हेंबर २०१७

/ / marathi

१९६८ चा ऑलिम्पिक चा सोहळा. ‘उंचउडी’ म्हणजेच ‘हाय जम्प’ चा सामना. ऑलिम्पिकच्या सामन्यातली जाणवणारी
चुरस, स्पर्धा याही सामन्यात शिगेला पोहोचलेली. २.२२ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेला. या उंचीवर रशियाचा
खेळाडू बाद झाला. आता बार ची पातळी वाढून २. २४ मीटर इतक्या उंचीवर बार ठेवला गेलेला. आतापर्यंत कधीही इतकी
उंची उंचउडीच्या सामन्यात पार केलेली नव्हती. शेवटचे अमेरिकेचे दोन स्पर्धक शिल्लक होते. त्यातील एक स्पर्धक ही
उंची पार करू शकला नाही. आता डिक फॉसबरी नावाचा शेवटचा स्पर्धक शिल्लक उरलेला. त्याच्या उंच उडी मारण्याच्या
तंत्रामुळे तो इतर स्पर्धकांच्या चर्चेचा, आणि प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय ठरलेला. तो उडी मारण्यासाठी धावत आला
आणि त्याने पायावर जोर देऊन आपलं शरीर वर उचललं, हवेतच थोडं तिरकं केलं आणि खाली डोकं आणि वर पाय या
पद्धतीने तो बार उल्लंघला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. डिक फॉसबरी हा केवळ सुवर्णपदकाचा मानकारीच
नाही तर त्यापर्यंतच्या उंचउडी या स्पर्धेचा जागतिक विक्रम त्याच्या नावावर त्यादिवशी लागला. इतकंच नाही तर त्या
दिवशी ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात एक विशेष पान लिहिलं गेलं. कारण उंचउडीच्या स्पर्धेत पायानेच जोर देऊन
बार च्या दुसऱ्या बाजूला दुसरा पाय टाकून तो बार उल्लंघायचा हेच उंच उडी मारायचं अतापर्यंतचं सर्व स्पर्धकांनी
आत्मसात केलेलं, आणि वापरलेलं तंत्र. पण डिक फॉसबरी याने मात्र खाली डोकं आणि वर पाय अशी बार उल्लंघायची
नवीनच पद्धत अवलंबली आणि ती १९६८ पासून आजतागायत अजूनही फॉसबरी फ्लॉप या नावाने ते तंत्र किंवा ती
पद्धत ओळखली जाते. एखाद्या खेळाडूच्या नावाने तंत्र विकसित होऊन इतक्या वर्षानंतर अजूनही ते वापरात असणं
या कारणाने डिक फॉसबरी हा ऑलिम्पिक स्पर्धेतील एक दंतकथाच ठरला.
ही कथा मी जेव्हा पहिल्यांदा युट्युब वर पहिली त्यावेळी मी खूप प्रभावित झालो. पण त्याही पेक्षा अधिक प्रभावित झालो
ते डिक फॉसबरीने हे तंत्र विकसित कसं केलं याची कथा ऐकून. खरं पाहता डिक फॉसबरी हा त्यांच्या उंच उडीच्या
चमूतील सर्वात कमी प्रतीचा खेळाडू. काही केल्या त्याला त्यावेळचं प्रस्थापित तंत्र वापरून उंच उडी मारता येईना. या
साठी त्याच्या उडीला फॉसबरी फ्लॉप म्हणजेच फसलेली फॉसबरीची उडी असा शब्दप्रयोग इतर खेळाडूंनी वापरायला
सुरवात झाली होती. या अवहेलनेवर उपाय म्हणून फॉसबरी आपल्या उंच उडी मारण्याच्या पद्धतीवर काम करू लागला
आणि त्याच्याच शब्दात सांगायचं तर त्याने त्याचं विशेष तंत्र हे ‘जिंकण्यासाठी’ विकसित न करता ‘न हरण्यासाठी’
विकसित केलं होतं (‘This technique was not invented for winning, but was invented for not loosing’). हळू
हळू फॉसबरीने ते तंत्र परिपूर्ण करत करत १९६८च्या मेक्सिको येथील ऑलिम्पिक मध्ये इतिहास घडवला आणि ज्या
खेळात त्याला इतकी अवहेलना सहन करायला लागली त्याच खेळात तो एक दंतकथा बनून गेला.
ही सत्यकथा मला काही धडे शिकवून गेली. डिक फॉसबरीच्या या कथेमध्ये मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या अशा;

१. कधीतरी काहीतरी मोठं घडण्यापूर्वी खूप अवहेलना, अपमान सहन करायला लागतो. परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल
दिसत असते. मनुष्य पूर्ण असहाय झालेला असतो. कुठलाच आशेचा किरण दिसत नसतो. अशावेळी कुठलातरी आतला
आवाज आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देत असतो. समोरच्या समस्येवर तोडगा सुचवत असतो. कुठली तरी आंतरिक
शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असते. अशावेळी त्या आतल्या आवाजाला ऐकून आपला प्रयत्न सुरु ठेवणे हेच
श्रेयस्कर ठरतं आणि तेही काही मिळवण्यासाठी नाही तर आपल्याच नजरेतून आपण उतरू नये या साठी.

२. कधी कधी समस्या ही नेहेमीच्या जगद्मान्य उपायाने सुटत नाही. तर त्यासाठी खाली डोकं वर पाय असा उलटा
उपाय कामी येतो. अशावेळी माझ्या लक्षात आलं की कोणाचीही कुठल्याही प्रकारची फसवणूक न करता पण नियमांना
पुन्हा एकदा आव्हान देऊन अपेक्षित परिणाम साधण्यासाठी पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोन ठेवल्यास अनपेक्षित परिणाम
मिळू शकतो आणि समस्येचं अधिक चांगलं समाधान होऊ शकत. मला आठवलं, मी आयटी(IT) मध्ये काम करतअसताना माझ्या बॉसने मला एक कानमंत्र दिलेला होता. तो नेहेमी म्हणायचा की, " राजेंद्र, कुठलीही समस्या सोडवण्याचे तीन उपाय शोधून काढत जा. असं करताना दोन ताबडतोब सुचतील पण तिसरा अधिक योग्य असेल कारण तिसरा कठीण उपाय शोधण्यासाठी साठी तू थोडं डोकं खाजवलेलं असशील (There are always minimum three solutions to any problem. Generally first two are the easy ones but third is the right one because you would have tickled your brain for it.)" कुठल्याही समस्येवर उपाय शोधण्यासाठी मला अजूनही हा कानमंत्र उपयोगी पडतो.

३. दंतकथा ही ठरवून होत नाही. दंतकथा या परिस्थितीवर मात करणाऱ्या विजिगिषु वृत्तीच्या कधीही हार न मानणाऱ्या
प्रयत्नातून आकाराला येते. बऱ्याच वेळा तर दंतकथा होणाऱ्या माणसालाही ती कथा घडत असताना जाणवत नसतं की
त्याच्या कृतीमुळे इतिहास घडणार आहे कारण त्यावेळी तो फक्त समस्येवर सर्वथायोग्य समाधान शोधण्याच्या
प्रयत्नात असतो. इंग्रजीत एक सुंदर म्हण आहे ‘Legends don’t spend time keeping their life records,
because if they do, they can’t become legends’ (थोर माणसं त्यांच्या आयुष्याचे दस्तावेज ठेवण्यात वेळ
घालवत नाहीत, कारण तसे ठेवणारी माणसं थोर होत नाहीत.) थोरांच्या आयुष्याच्या दस्तावेजांचा शोध नेहेमीच इतर
माणसंच घेत आली आहेत आणि प्रसिद्ध करत आली आहेत.
यावरून आठवलं की स्वामी विवेकानंद यांनी ज्या सर्व धर्म परिषदेत ९ सप्टेंबर रोजी सर्व विश्व आपल्या विद्वत्तेने आणि
वक्तृत्वाने जिंकलं, त्याच्या एक रात्र पूर्वीपर्यंत अगदी असहाय परिस्थितीत ते राहिले आहेत. थंडीच्या दिवसात रक्त
गोठवणाऱ्या अमेरिकेतील शिकागो शहराच्या थंडीत एका मालवाहू वाघिणीत बसून त्यांनी रात्र काढली आहे. कागदपत्र
गहाळ झालेली, ना ओळख ना पाळख अश्या परदेशातील शहरात फुटपाथवर बसून रात्र काढली आहे. स्वतःच्या
अस्तित्वाचा प्रश्न आदल्या रात्री पडलेली व्यक्ती दुसऱ्या दिवशी एका भाषणातच संपूर्ण जगावर मोहिनी घालते या मागे
त्यांच्याकडून काम करवून घेणारा आंतरिक आवाज हेच प्रमुख कारण आहे असं लक्षात येतं.
मला असं वाटतं की संकटं, आघात, अवहेलना, अपमान, तणाव एखादा माणूस किती पचवू शकतो याची देव परीक्षा घेत
असावा. कारण संकट, आघात, अवहेलना, अपमान, तणाव हे माणूस जितक्या प्रमाणात पचवू शकेल त्याच्या
समाप्रमाणातच नंतर येणारं यश आणि कीर्ती पचवणं माणसाला शक्य आहे हे जगद्नियंन्त्याला अगदी पक्कं ठाऊक
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *