फेसबुक आणि अस्तेय – १२ ऑक्टोबर २०१७

/ / marathi
काही दिवसांपूर्वी मी लेख लिहू लागलो. मी काही लेखक नव्हे. पण मनात विचारांचे जेव्हा जेव्हा तरंग उठतील ते तरंग माझ्या कुवतीप्रमाणे शब्दबद्ध करायचे या विचाराने मी लिहायला लागलो. मी सुचेल तसं आणि सुचेल तेव्हा लिहीत असे, अजूनही तसंच लिहितो. दररोज काहीना काही विषयासंबंधातील चिंतन होतं आणि ते विचार मनात घोळत असल्यामुळे त्या अनुषंगाने दररोज काही ना काही लिहिणं होतं. ‘आपण लेख लिहितो’ असा अविर्भाव या पूर्वीचे लेख लिहितानाही नव्हता आणि हा लेख लिहितानाही नाही.  बऱ्याचवेळा एखादा अस्पष्टसा विचार मनात असतो आणि संगणकावर लिहायला बसलो की लिहिता लिहिता काहीतरी तंद्री लागते आणि वाक्यामागे वाक्य सुचू लागतात आणि अस्पष्ट विचार शब्दांच्या आधाराने घासून पुसून अगदी सुस्पष्ट होऊन आपल्याआपच माझ्यासमोर येऊन उभा राहतो. बऱ्याचवेळा माझाच लेख वाचल्यावर “हे मीच लिहिलं का?” असं एक आश्चर्ययुक्त प्रश्नचिन्ह माझ्या चेहेऱ्यावर तरळतं आणि ‘लेख लिहिला’ या पेक्षाही मनातील घोंगावणारे विचार व्यक्त होऊन मन मोकळं झाल्याचा आनंद लेख पूर्ण झाल्यावर मनाला अधिक होतो.
जेव्हा हे लेख संगणकावर उमटू लागले त्यावेळी माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे खरे ते माझ्या संगणकामध्येच पडून राहायचे. पूर्वीपासूनच माझ्याकडून घडलेली निर्मिती ही अशीच कुठल्यातरी चिटोऱ्यावर, कुठल्यातरी रफ वहीत किंवा नंतर माझ्या संगणकातल्या एखाद्या माझ्या खाजगी कोपऱ्यात जाऊन पडत असे. आणि तसंच या लेखांच्या बाबतीतही झालं असतं. कारण हे लेख कुणी दुसऱ्याने वाचावे आणि माझं कौतुक व्हावं या दृष्टीने लिहिलेच नाहीत. आणि मी लेखक नसल्यामुळे माझी लेखनशैली वगैरे असली काही भानगड या लेखांच्या बाबतीत असेल अशी पुसटशी शंका सुद्धा मला आली नाही. त्यामुळे काही पहिले लेख केवळ माझ्या अगदी जवळच्या माणसांना दाखवले.
माझ्या अगदी जवळच्या माणसांची माझी व्याख्या म्हणजे माझी कुठलीही सांगीतिक किंवा साहित्यिक निर्मिती घडल्यानंतर,  म्हणजे कविता असो, लेख असो, रचलेली बंदीश असो किंवा तत्सम काही असो, मी जेव्हा त्यांना त्याबद्दल सांगतो त्यावेळी ” हं !! आज काय पडलं ?” इतक्या खोचक तटस्थतेने जी माणसं त्या निर्मितीचा आस्वाद घेतात ती माझी जवळची माणसं. राजेंद्रने जे काही लिहिलं आहे त्याची जितकी चिरफाड होऊ शकेल तितकी करून शेवटी मात्र एखादी गोष्ट खरंच चांगली जमली असेल तर कौतुकाचे “छान आहे” हे दोन ( आणि दोनच!) शब्द माझ्यासमोर उच्चारतात ती माझी जवळची माणसं.  “अति कौतुक केलं तर मुलगा शेफारेल म्हणून कौतुकाचे दोनच शब्द पुरे” हा इतका माझ्याबद्दलचा आत्मवविश्वास ज्यांना आहे ती माझी जवळची माणसं.
तर अशा माझ्या जवळच्या माणसांकडून, माझ्या बहुतांशी लेखांवर, ” छान आहे” इतक्यावर न थांबता, “खूपच छान आहे रे” इतकं घवघवीत कौतुक माझ्या पदरी पडल्यावर माझं धैर्य अधिक वाढलं आणि एक दिवस मनाचा हिय्या करून व्हाट्सऍपवर माझ्या ब्रॉडकास्ट लिस्ट मधल्या सगळ्यांना माझा त्या दिवशीचा लेख पाठवला. साधारणतः माझ्या लेखाचा अध्यात्मिक चेहरामोहरा लक्षात घेऊन व्हॉट्सऍप वर येणाऱ्या अनंत कोटी सात्विक फॉरवर्ड्समध्ये माझा लेख गुरफटून बुडून जाईल आणि एखाद दुसऱ्या माणसाकडून “छान आहे” किंवा “हात जोडून नमस्कार” इत्यादी अभिव्यक्तीचिन्ह (emoticons) किंवा फार तर एखादा ई-पुष्पगुच्छ उत्तरादाखल येईल इतकीच अपेक्षा माझी होती. अगदीच कोणी माझा नंबर साठवला नसेल तर नक्की लेख कोणी आणि कधी लिहिला हे कळण्यासाठी (खरोखर हाच भाबडा विचार होता माझा !) आणि त्यांना माझा नंबर साठवण्याचा पुन्हा एकदा चान्स (!!!) द्यावा म्हणून माझा फोन नंबरही त्या सोबत नमूद केला.
आणि त्यादिवशी खरोखर चमत्कार झाला. माझ्या अपेक्षेच्या कितीतरी बाहेर उत्तरं आली, कौतुकाचे शब्द आले, आशीर्वाद आले, फोन आले, कौतुकाची थाप अनेकांकडून आली. आणि मी पण माणूस आहे, खोटं नाही बोलणार, मी खूप सुखावलो. त्या प्रोत्साहनाने उत्साहित झालो. अनेकांनी “तुझं लिखाण पाठवत जा, वाचायला आवडेल” असा गोड आग्रहही केला. आणि मी माझे लेख सर्वांना पाठवू लागलो. मग कोणीतरी सुचवलं “फेसबुकवर टाक” म्हणून ते लेख तसेच फेसबुकवर पोस्ट करायला सुरुवात केली. दररोजचे लेख लोकांना आवडले असावे म्हणून कदाचित लोकांनी ते लेख त्यांच्या त्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर, फेसबुक पेजवर शेअर केले आणि मला असं कळतंय की खूप जणांकडे माझे लेख पोहोचले आहेत, दररोज पोहोचत आहेत. या सगळ्याचं मला खूप अप्रुप वाटलं. अर्थात माझ्याकडून लिहिलं गेलेलं लोक आवडीने वाचत आहेत, शेअर करत आहेत ही भावना नक्कीच सुखकर होती.
नंतर गम्मत झाली. काही सुहृदांनी मला सांगितलं की माझे लेख माझ्या खाली लिहिलेल्या नावाशिवाय कोणीतरी त्यांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर, फेसबुक पेजवर शेअर करतंय. नंतर तर असंही कळलं की माझे लेख कुणीतरी त्यांच्या नावाने  व्हॉट्सऍप ग्रुपवर, फेसबुक पेजवर पोस्ट करतंय. तसंही श्रेय मिळावं, प्रसिद्धी व्हावी, नाव व्हावं यासाठी मी लिहीतच नसल्यामुळे मी या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला. मलाही माझेच लेख असेच दुसऱ्या ग्रुपमधून माझ्या नावाशिवाय मिळाले त्यावेळी लेखात काही फेर फार केला नाहीये ना ! एवढी खात्री करून मी तेही सोडून दिलं. पण माझ्या काही सुहृदांनाच याचं वाईट वाटलं आणि त्यांनी मला माझे लेख pdf फॉरमॅट मधे पाठवायचा आग्रह केला. मीही त्यांचं मन मोडलं नाही आणि या अगोदरचा एक लेख pdf मध्येच पाठवला. बऱ्याच लोकांना ही कल्पना आवडली. काहींनी pdf मध्ये वाचायला त्रास होतो, तू नेहेमीसारखी पोस्टच कर असाही अभिप्राय दिला. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यावर मत मांडली.
मग मी माझ्या मनाला प्रश्न केला “मी काय करायला हवं?”. माझं मन मला म्हणालं “माझं माझं सोडायचं” हे करण्याचा एकदा प्रयत्न सुरु केल्यावर या प्रसंगात “मी काय करायला हवं?” हा प्रश्नच अप्रस्तुत नाही का?  हाताबाहेर पडल्यावर तो लेख केवळ एक विचार म्हणून सगळीकडे पसरतोय. विचार लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तो लिहिला कुणी हे गौण नाही का? बरं विचार म्हणावा तर तो माझ्या अनुभवांवरच माझं चिंतन आहे आणि ते लिहिल्यावर मी मोकळा होतो हाच माझा उद्देश नाही का? जगरहाटी आणि माझ्याकडून पुरेशी काळजी घेण्याच्या दृष्टीने आणि खरंच ज्यांना हा लेख कोणी लिहिला याची उत्सुकता असेल त्यांच्यासाठी माझं नाव, दिनांक आणि माझा फोन नंबर देण्याचं काम माझ्याकडून मी करतोय यात माझं कर्म पूर्ण झालं नाही का? मी एखादी गोष्ट समाज माध्यमांवर स्वतःहुन टाकतोय म्हटल्यावर त्याचा गैरवापर होणारच नाही याचं नियंत्रण माझ्याकडे आहे का?. जे अयोग्य कृत्य करत आहेत त्यांना माझ्या लेखांमधला मथितार्थ कळलाच नाही असाच अर्थ नाही का? आणि “चोरी करू नये” हा अस्तेयाचा संस्कारच ज्यांच्यावर झाला नाही त्यांना त्यांच्या चौर्यकर्माबद्दल “क्षमा करणे” हेच श्रीमद भगवदगीतेचा आणि आचार्य पतंजलींच्या अष्टांगयोगाचा अभ्यासक म्हणून मी करणं माझ्याकडून अपेक्षित नाही का? आणि म्हणूनच माझ्या लेखांचं pdf या करणासाठीतरी करायचं नाही असं माझं मन मला सांगतं…
माझी संतांच्या नखाइतकीही लायकी नाही. मग जर नेवाश्याला संत ज्ञानेश्वरांनी श्रीज्ञानेश्वरी लोकांना सांगितली तेव्हा त्यांनी pdf वापरलं नाही. संत तुकाराम महाराजांनी अभंग pdf मध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवले नाही. संत रामदास स्वामींना मनाचे श्लोक लोकांच्या घरोघरी पोहोचवताना pdfचा आधार घ्यावा असं वाटलं नाही,  मग मी माझ्या फुटकळ लेखांसाठी pdf वापरण्याची गरजच काय? लोकांच्याच भावनेचा आदर करायचा म्हणून एक लेख pdf मध्ये लिहिला ना? मग त्याच लोकांच्या सद्भावनेवर विश्वास ठेवून केवळ विचार व्यक्त करणं इतकाच माझा अधिकार आहे आणि फक्त एवढंच माझं काम आहे. पुढची चिंता मला कशाला?  न जाणो त्याकाळातल्या मंबाजींनी बुडवलेले संत तुकोबांचे अभंग जसे लोकांच्या सद्भावनांमधून तरले तसे फेसबुकवर अस्तेयाचा संस्कार न पाळणाऱ्या ई-मंबाजींच्या तावडीतून फेसबुकवरच्या सज्जनांत वसत असलेली हीच लोकसद्भावना आणि लोकसंवेदना माझे क्षुल्लक लेखच काय पण कुणाच्याही मूळ कलाकृती तारून नेईल कदाचित…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *