
काही दिवसांपूर्वी एक गंमत घडली. मी जेवणाच्या टेबलवर बसलो होतो. समोर मारी बिस्किटाचा पुडा होता. बिस्किटं संपली होती त्यातली पण थोडा चुरा शिल्लक होता. बोलता बोलता त्या पुड्याला माझा धक्का लागला आणि त्या बिस्किटाचा थोडा चुरा टेबलवर पडला. गप्पा मारता मारता माझ्या नकळत मी तो चुरा माझ्या नखांनी टेबलावरच अधिक चुरायला सुरवात केली. बोलता बोलता उगाच हाताला चाळा म्हणून अनाहूतपणे सुरुवात झालेली ती गोष्ट. पण नंतर माझं लक्ष गप्पांमध्ये कमी आणि मी करत असलेल्या त्या उपद्व्यापात जास्त जायला लागलं. गम्मत म्हणून स्वतःलाच आव्हान देत मी ठरवलं की बघूया मी किती बारीक पूड करू शकतो ते आणि मग तो एक खेळच झाला. अगदी शक्य तेवढी बारीक पूड झाल्यावर एक गमतीचा विचार डोक्यात आला की इतकी बारीक केलेली बिस्किटांची पूड आणि कणकेच्या डब्यातली कणिक सारखी लागेल का? मग एका बोटावर मारीची स्वहस्ते केलेली बारीक पूड आणि दुसऱ्या बोटावर तेवढ्याच प्रमाणात कणिक असं घेऊन दोन्ही एकदम जिभेवर ठेवलं. फारसा फरक जाणवला नाही. खरं तर खेळ तिथेच संपला होता पण माझं इंजिनिअरचं किचकट डोकं मात्र सुरु झालं. विचार करायला सुरुवात केली की मारी बिस्किटांची मी केलेली पूड आणि कणिक हे दोन वेगवेगळे पदार्थ एका स्थूळ पातळीवर साधर्म्य दाखवत असतील तर त्याच्या काही अब्जांशाने सूक्ष्म असलेल्या अणुरेणूंच्या पातळीवर हे दोनच काय पण सगळेच पदार्थ साधर्म्य दाखवतील का? आणि जर तसं असेल तर त्या पातळीवर ऊर्जा(energy) आणि जडवस्तू (matter) आणि प्रकाश आणि त्याचा वेग (Speed of Light) यांचा आईन्स्टाईनने जो परस्पर संबंध जोडला तोच संबंध संतांनी सांगितलेल्या काही अनुभवसिद्ध वाचनांशी जोडता येईल का?
हा विचार मला स्वस्थ बसू देई ना ! मनात काहीतरी गवसल्यासारखं तर वाटत होतं पण त्याला विज्ञानाचं प्रमाण सापडत नव्हतं. योगायोग म्हणा हवं तर पण काही दिवसांपूर्वी मी एक विडिओ पहिला. क्वान्टम मेकॅनिक्सच्या संदर्भातला तो विडिओ होता. अणूची संरचना आणि विश्वाची रचना यात काही साधर्म्य आहे का याचा उहापोह त्या व्हिडिओमध्ये केलेला होता. त्यात दिलं होतं की शास्त्रज्ञांना जसजशी अणुच्या संरचनेची अधिकाधिक माहिती व्हायला लागली तसतशी एक गोष्ट लक्षात येऊ लागली की कुठल्याही पदार्थातील अणूची रचना ही एकच असते. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे प्रयोग झाल्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती (gravity), विद्युत-चुंबकीय शक्ती(electormagnetism), कमजोर आण्विकशक्ती (weak nuclear force) आणि बलवान आण्विकशक्ती (strong nuclear force) या चारच शक्ती ज्या अणूमध्येही आणि तशाच त्या संपूर्ण विश्वात कार्यरत आहेत हे शास्त्रज्ञांना लक्षात आलं आहे. पण या चारही शक्ती अणूसंबंधाने दिसणारे काही परिणाम नीट व्यक्त करू शकत नाहीयेत आणि म्हणून या चारही शक्तींना जोडणारी अशी काहीतरी एक “अगाध शक्ती” (super force) या विश्वात नक्कीच उपस्थित आहे त्याशिवाय या जगाच्या पसाऱ्याचं गूढ केवळ क्वान्टम मेकॅनिक्सच्या आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेऊन उकलता येणं शक्य नाही हे शास्त्रद्यांना आता पटलं आहे. त्यासाठी सर्न (CERN) या युरोपातील संस्थेअंतर्गत आतापर्यंत झाली नाहीत अशी जगातील सर्वात गुंतागुंतीची अद्ययावत यंत्रमांडणी करून विश्वनिर्मितीच्या क्षणानंतरच्या (बिगबँग मोमेंट) सेकंदाच्या एक अब्जांश वेळेच्या बिंदुला विश्वाची काय स्थिती असेल त्याची कल्पना करून ती परिस्थिती त्या यंत्रात निर्माण करून ती “अगाध शक्ती” सापडते आहे हा याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.
हे पाहिलं आणि आठवली श्रीमदभगवदगीता.
ज्ञानविज्ञानयोग या सातव्या अध्यायात ८ आणि ९ या श्लोकात भगवंत म्हणतात;
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: |
प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु || 8||
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ |
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु || 9||
या श्लोकांवर संत ज्ञानदेवमाउलींनी खूप गोड ओव्या निर्मिल्या आहेत. माउली म्हणतात;
म्हणौनि उदकीं रसु| कां पवनीं जो स्पर्शु|
शशिसूर्यीं जो प्रकाशु| तो मीचि जाण ||
तैसाचि नैसर्गिकु शुद्धु| मी पृथ्वीच्या ठायीं गंधु|
गगनीं मी शब्दु| वेदीं प्रणवु ||
ऐसें भूतांप्रति आनान| जें प्रकृतिवशें दिसे जीवन|
तें आघवाठायीं अभिन्न| मीचि एक ||
मराठीमध्ये मला समजलेला याचा अर्थ असा की, पाण्याला चव देणारी, चंद्रसूर्यांना प्रभा बहाल करणारी, वाऱ्याला स्पर्श बहाल करणारी, ती “अगाध शक्ती” मीच आहे. निसर्गतःच शुद्ध असलेली , पृथ्वीच्या ठायी गंध म्हणून प्रकट होणारी, आकाशात शब्द म्हणून प्रकट होणारी आणि वेदांमध्ये प्रणव ओंकार म्हणून प्रकट होणारी ती “अगाध शक्ती” मीच आहे. याप्रमाणे या भूतमात्रात म्हणजेच या विश्वाच्या पसाऱ्यात प्रकृतिस्वरुपात जे जे जीवन दिसतं, अनुभवास येतं त्या सर्वांठायी मीच त्या “अगाध शक्तीच्या” रूपात वास करतो. याच संदर्भाने कबीरदास जेव्हा “घट घट मे पंछी बोलता” असं म्हणतात किंवा संत तुकोब्बाराय जेव्हा “अनुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा” असं म्हणतात ते CERN च्या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक गृहीतप्रमेयांपेक्षा (Hypothesis पेक्षा) काय वेगळं आहे?
मनात आलं CERN चे शास्त्रज्ञ जी “अगाध शक्ती” शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, ती जर हाती लागली तर त्याच रूप कसं असेल हे सध्या तरी गूढ आहे. पण जर ती “अगाध शक्ती” कुठल्या रूपात प्रकट झाली. तर अणूच्या अतिसूक्ष्म रूपात दडलेली पण ब्रह्मांडाची उकल करणारी ती “अगाध शक्ती” , “पिंडी दिसे ते ब्रह्मांडी असे” या संतवचनाची, आणि भगवंतांनी ज्ञानविज्ञानयोगात वर्णन केलेल्या त्या “अगाध शक्तीच्या ” अस्तित्वाची वैज्ञानिक सिद्धता (proof) असेल असं नाही का म्हणता येणार?
आणि एक खरं सांगू? एक मारीचं बिस्कीट मला इतका विचार करायला लावेल असं खरंच कधीच वाटलं नव्हतं…..