पाच रुपयांचे क्षण- 22 सप्टेंबर 2017

/ / marathi

देवाच्या पूजेसाठी हवी म्हणून फ़ुलं आणायला बाजारात गेलो. उत्सवाचे दिवस म्हणून फुलवाल्यांना अधिक मागणी होती. मी एका फुलवालीकडे गेलो आणि 5 रुपयाची फ़ुलं मागितली. मी काहीतरी जगावेगळं मागतोय अशा अर्थाचा चेहरा करून काही न बोलताच दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे ती वळली आणि तोंडानी ‘आता 5 रुपयाची फ़ुलं द्या म्हणे, दुसरा धंदा नाही का आम्हाला’ असं काहीतरी तिचं स्वगत मी जाता जाता पुसटसं ऎकलं. मी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता पुढच्या फुलवालीकडे गेलो. तिथेही मी तिला 5 रुपयाची फुलं मागितली. ती थोडी वरघटली असावी व्यवसाय करण्यात. थोडं मवाळपणे ती म्हणाली, “साहेब कुठल्या जमान्यात वावरताय? 5 रुपयात आता काय पन येत नाय .निदान धाची (म्हणजे दहाची) तरी घ्यावीच लागतील.” मी पण थोड्या हट्टानेच विचारलं, “मला 5 रुपयाचीच हवी आहेत मग फुलं देणार की नाही?” या वर ती चक्क नाही म्हणाली. आणि तीही दुसऱ्या गिऱ्हाईककडे वळली.

खरं तर 10 रुपयाची फुलं घेणं काही मला जड नव्हतं. पण प्रश्न सोईचा होता. जास्त फुलं घेतली आणि सर्व वाहिली तर ती उगाच देवाला गुदमरवून टाकतात. नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे फ्रीजमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी तशीच आइसकोल्ड फुलं देवाला वाहायची. तिसरा पर्याय म्हणजे फ्रिजमधून थोडी अगोदर बाहेर काढून वाहिली तर फुलांना पाणी सुटतं आणि फ्रीजमध्ये नाही ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी मलूल होतात म्हणजे एकंदरीत देवांना आपल्यासाठी थोडं ऍडजस्ट करायला लावायचं. आणि हे सगळं का तर फुलवाली 5 रुपयाची फ़ुलं देत नाही म्हणून? हा विचार मनात आल्यानंतर आता नुसताच सोयीचा नसून ‘प्रश्न तत्वाचा’ झाला होता.
बरं गमतीची गोष्ट अशी की कोणीही मला 5 रुपयाची अगदी 5 फुलं जरी दिली असती तरी मी घ्यायला तयार होतो. त्या दोन फुलवाल्या मावश्यांच्या अनुभवानंतर मी मात्र हट्टालाच पेटलो. ‘प्रश्न तत्वाचा’ झाल्यामुळे थोडा अहंकारही जागृत झाला. आणि आज 5 रुपयाचीच फुलं न्यायची असं ठरवून मी पूर्ण बाजार पालथा घातला. पण कोणीही मला 5 रुपयाची फुलं द्यायला तयार नव्हतं. शेवटी एका फुलवाल्या ताईने मला समजावणीच्या सुरात म्हटलं,”दादा, सिझनचे दिवस हायेत. 5 रुपयात 10 फ़ुलं सुद्धा मिळणार नाहीत तुम्हाला”. मी जरा चिडूनच त्यावर म्हटलं, ” मी कुठे जास्त मागतोय? तुम्हाला परवडतील तितकी द्या. पण 5 चीच द्या” यावर तिने शांतपणे 5 रुपयाचीच थोडी फुलं मला दिली. खरं तर माझ्या अपेक्षेपेक्षा अधिकच दिली. आणि गम्मत म्हणजे मी खुश होऊन आधीच ठरवलेले दोन हारही 50 रुपये देऊन अर्थात त्याच फुलवालीकडून घेतले अगदी कुठली घासाघीस न करता. अशा रितीने माझा फुलांचा खरेदीव्यवहार पूर्ण झाला आणि फुलवाल्यांबरोबरचं माझं शीतयुद्ध संपवून मी विजयी मुद्रेने, आणि सुखावलेल्या अहंकाराने घरी परतण्याचा वाटेवर लागलो.

घरी परतताना घडलेल्या प्रसंगाचा विचार करू लागलो आणि माणसाच्या स्वभावाच्या काही गमतीजमती लक्षात आल्या. आणि मीच मला प्रश्न केले,
1. जे शेवटच्या फुलवालीने केलं ते कोणालाही करता येणं शक्य होतं. पण कुठल्याच दुसऱ्या फुलवालीकडे आपली परिस्थिती शांतपणे समजावून देणे आणि दुसऱ्याची समजून घेणे यासाठी मानसिक धारणा नव्हती. माझी मानसिक धारणा कुठल्या फुलवालीसारखी आहे?

2. जेव्हा सिझनचे म्हणजेच आयुष्यातले बरे दिवस येतात त्यावेळी आपल्या दृष्टीने कमी किंमत असलेल्यांकडे त्या इतर फुलवाल्यांसारखं माझं दुर्लक्ष होत नाहीये ना? किंवा माझ्या वागण्याबोलण्यातून आयुष्यातल्या त्या हंगामी सिझनमुळे आलेला माज डोकावत नाहीये ना ?

3. मी माझ्या स्वत:च्या व्यवसायात किंवा इतर व्यवहारातही समोरची संधी कमी किमतीची आहे म्हणून सोडून देत नाहीये ना? मी छोट्या संधी सोडून मी गिऱ्हाईक आणि गिऱ्हाईकामधला माणूस तर तोडत नाहीये ना ?

4. माझा व्यवसाय कुठलाही असला तरी सर्वांच्या मुळाशी जो व्यवसाय असतो माणसं जोडण्याचा तो मी सजगतेने करतोय ना ?

5. पाच रुपयाची फ़ुलं द्यायला एका फुलवालीने नकार दिला म्हणून जागृत होण्याइतका माझा अहंकार पोसला गेलाय का?

6. माझ्या अहंकारामुळे सगळ्या फुलवाल्यांना 5 रुपयाची फुलं विचारण्यात जे आयुष्याचे किमती क्षण वाया गेले त्याची भरपाई त्या क्षुल्लक विजयाच्या उन्मादाने होईल का ?

मी माझं मलाच तपासून पाहिलं. काही चुकलं हे उमगलं आणि त्याच्यावरचा उपाय म्हणून एका मंत्राची आठवण झाली. जवळजवळ सगळ्या संत मंडळींनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला मंत्र आहे हा.
या मंत्राचं महात्म्य अस की आयुष्यातील सगळ्या चांगल्या वाईट दिवसांना तो मंत्र लागू पडतो. या मंत्रामुळे आयुष्यातल्या चांगल्या सिझन चा माज ही येत नाही, 5 रुपयाची फ़ुलं नाकारल्यामुळे अहंकारही डिवचला जात नाही, आणि खोटा अहंकार बचावण्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या लुटुपुटुच्या लढाया जिंकल्याचा विजयोन्मादही होत नाही. करण गेला तो क्षण आपला नाही येणाऱ्या क्षणाची शाश्वती नाही म्हणून आपला वेळ जपा. जीवनाचं हे अमूल्य सार सांगणारा तो महामंत्र म्हणजे
‘क्षण क्षण करीत पण हे ही दिवस जाणार आहेत’…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *