
मागच्या आठ्वड्यातलीच गोष्ट. मला काही कारणासाठी १००० रुपयांचे १० रुपयांच्या नोटांमध्ये सुट्टे हवे होते. शनिवार संध्याकाळची वेळ त्यामुळे बँका बंद होत्या. मग आमच्या जवळच्याच बाजारात ‘दे दान सुट्टे गिऱ्हाण’ करत दुकानं पालथी घालत होतो. अपेक्षेप्रमाणे सगळ्यांनीच सुट्टे देण्यासाठी नकारघंटा वाजवली. अखेरचा प्रयत्न म्हणून एका डेरीवाल्याकडे सुट्टयांची मागणी केली आणि काय विचारता, तो डेरीमालक सुट्टे द्यायला तयार झाला की ! मी सुट्टयांपायी इतका मेटाकुटीला आलो होतो की त्याने सुट्टे देण्यासाठी होकार भरल्यावर प्रेमभराने आलिंगन द्यावं आणि आमच्या घरच्या दुधाचा रतीब त्यालाच त्याक्षणापासून घालायला सांगावा असा एक मानसिक आवेगही मला येऊन गेला. पण त्याचं पोट इतकं मोठं होतं की त्याला आलिंगन देणे हे माझ्या बाहूंच्या आवाक्याबाहेरचं आहे या सत्यपरिस्थितीचं भान होऊन आमची भरतभेट माझ्या मनातच विरली. असो..
मी सुट्टे घेण्यासाठी डेरीवल्याकडे पाचशेच्या दोन नोटा सुपूर्द केल्या. त्याने त्याच्या ड्रॉवरमधून एक १० च्या १०० नोटांचं बंडल काढलं. त्या नोटा पहिल्या मात्र आणि मी थोडा हबकलोच. तेल, तूप, दूध, हळद, कुंकू, बुक्का, पेन्सिलीच शिसं, पेनाची शाई, साबण, लिपस्टिक, काजळ अशा नानाविध परिमलद्रव्यांनी त्या नोटांची जी काही पूजा झाली असेल त्याच्या खुणा त्या बंडलामधील जवळजवळ प्रत्येक नोटेने आपल्या अंगाखांद्यावर बाळगल्या होत्या. त्यातील काही नोटांची तर , त्या भारतीय वंशाच्या आहेत याची मुद्दाम ओळख मुद्दाम करून द्यावी लागली असती, इतक्या निस्तेज झाल्या होत्या. माझ्यासमोर त्यावेळी फार पर्याय नसल्यामुळे आणि संपूर्ण बाजारात तो पोटुशी डेरीवालाच एकमेव सुट्टे द्यायला तयार झाल्यामुळे त्या हबशी वंशावळीच्या नोटा स्वीकारणं मला भाग होतं.
नीट मोजून द्यायला पाहिजेत म्हणून तो ढेरेदार डेरीमलक बंडलातील नोटा मोजू लागला. नोटांची परिस्थिती पाहता त्या नोटांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले होते हे वेगळं सांगायलाच नको. या अशा नोटांना एकमेकांपासून विलग करण्यासाठी त्या डेरीमालकाने मग नेहेमीचं शस्त्र उगारलं. प्रत्येक नोट मोजताना तो तर्जनी किंवा अंगठा आपल्या रसाळ जिभेवर किंवा ओठावर टेकवून आपल्या मुखरसाच्या आर्द्रतेचा उपयोग त्या एकमेकांच्या बाहुपाशात एकरूप झालेल्या नोटांची आलिंगनं तोडण्यासाठी करू लागला. आधीच वेगवेगळ्या लोकांनी हातून वेगवेगळ्या रसांनी न्हाऊ माखू घातलेली एकेक नोट त्या डेरीवाल्याच्या मुखरसाने पावन होऊ लागल्यावर मात्र माझ्या संयमाचा बांध फुटला. ह्या प्रक्रियेत त्याच्या मुखातून नोटांवर आणि नोटांवरून मुखात किती जीवजंतूंनी स्थलांतर केलं असेल याची गणती तर अशक्यच आहे पण आपण काही अनारोग्यकारी काही करतोय हे त्या डेरीवाल्याच्या खिजगणतीतही नव्हतं. हे सगळं पाहिल्यावर मी ते बंडल घेणं तर शक्यच नव्हतं. “दुसरा अच्छा नोटवाला बंडल नही है क्या?” हा प्रश्न मी नकारात्मक उत्तर येणार याच अपेक्षेने विचारला. आधीच मी सुट्टे देतोय म्हणजे जवळजवळ जीवदान देण्याचं पुण्य करतोय असे भाव त्या डेरीवाल्याच्या मुखावर मला सुट्टे देत असताना होते त्यामुळे असा प्रश्न विचारून मी त्याची भयंकर ‘तौहिन’ केली आहे आणि या साठी मी ताबडतोब काहीतरी प्रायश्चित्त घ्यायला हवं असे भाव त्या डेरीवाल्याच्या चेहऱ्यावर तरळले. त्यामुळे कुत्सित नकार असलेलं पण मला अपेक्षित असलेलं उत्तर आल्यावर, “फीर रेहेने दो” असं मी त्याला सांगितलं आणि त्या प्रसंगातून मी काढता पाय घेतला. पाय काढता घेतला असं म्हणण्याऐवजी खरं तर मी तिथून पळ काढला असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.
परत घरी येताना राहून राहून तो डेरीमालक आठवत राहिला आणि आठवत राहिली ती त्याची मुखरसपूर्ण अदा. एकंदरीत तो प्रसंग आठवून अंगावर रोमांच उभे राहिले. ( ‘शिसारी’ हा खरा योग्य शब्द असला तरी प्रसंगाची नजाकत पाहता तो शब्द फारच असंसदीय आहे हे लक्षात आल्यामुळे त्याचा प्रयोग जाणीवपूर्वक टाळला आहे. ). या प्रसंगामुळे निर्माण झालेल्या विचार शृंखलेचा परिणाम म्हणून आठवू लागली ती मुखारसाचा विविध ठिकाणी उपयोग करणारी माणसं. पुस्तकाची किंवा वहीची पानं उलटणे, लिफाफ्याला पोस्टाचं तिकीट किंवा बिलावर रेव्हेन्यू स्टॅम्प चिकटवणे. लिफाफ्याच्या डिंकाला ओलं करून लिफाफा बंद करणे. क्रिकेटमध्ये सिझन बॉलला झळाळी देणे, बसमध्ये तिकीट देणे या सारखे अनेक प्रसंग डोळ्यासमोर येऊ लागले. एवढंच काय तर केस सारखे करायला थोडा ओलेपणा हवा म्हणूनही मुखारसाचा उपयोग करणारे महाभाग मला माहित आहेत. बरं या महाभागांमध्ये सुशिक्षित किंवा अशिक्षित असा भेदभाव नसतो बरं का !! सर्वच स्तरावर हा मुखरसविलास सुरु असतो.
मेडिकल क्षेत्रात एक ‘पॅथॉलॉजि’ नावाची शाखा आहे. पॅथॉलॉजि याचा अर्थ म्हणजे ‘ज्या मार्गांनी रोग पसरू शकतो त्या मार्गांचा अभ्यास. यासाठीच, थुंकी, रक्त, इत्यादी गोष्टी तपासल्या जातात. एकंदरीत नोटांच्या वापरण्याची, आणि विशेषतः भारतातील नोटा वापरण्याची पद्धत पाहता डॉक्टर थुंकी,रक्त यांचे नमुने मनुष्यशरीरातून गोळा करून जे तपासतात त्याऐवजी त्यांनी लोकांच्याकडच्या नोटा तपासायला सुरुवात केली तर हे एक वेगळंच निदानशास्त्र निर्माण होईल असा एक गमतीशीर कल्पना मनास चाटून गेली.
आपल्या मुखरसाचा असा वापर करणे हा प्रकार अशिष्ट तर आहेच पण खूप अनारोग्यकारी आहे हे सुशिक्षित म्हणवणाऱ्या मंडळींना लक्षात येत नाही हे पाहून तर माझ्या आश्चर्याला पारावार नाही. या निमित्ताने मी थोडं संशोधन करायचं ठरवलं. ‘गुगल’ नावाच्या आधुनिक ब्रह्मदेवाला सवाल केला आणि क्षणार्धात उत्तर हजर झालं. विविध देशात विविध स्तरात या संदर्भात सर्वेक्षण, संशोधन झालेलं आहे आणि या सर्वेक्षणाचे किंवा संशोधनाचे अहवाल डोळे खाड्कन उघडतील असे भयानक आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालातील काही ठळक मुद्दे असे;
१. भारतातील वापरातील १०० टक्के नोटा या खूप गंभीर रोगजंतूंनी भरलेल्या असतात.
२. दक्षिण आफ्रिकेतील ९० टक्के नोटांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारची आरोग्यास हानिकारक अशी बुरशी आढळते.
३. अमेरिकेच्या ९२ टक्के नोटांवर ‘हिपॅटॅटीस सी’ या दुर्धर रोगाला कारणीभूत असणारे कोकेन या अमली पदार्थाचे अंश सापडले.
४. भारतातील बहुतांशी नोटा या क्षयरोग(TB), मॅनिन्जायटिस, टॉन्सिलायटिस, गुप्तरोग, ‘हिपॅटॅटीस सी’ इत्यादी दुर्धर रोगांच्या जंतूंनी बाधित असतात.
५. अंगावरील जखमा खाजवून हात न धुणे, शिकल्यावर किंवा खोकल्यावर हात न धुणे, किंवा शौचाला किंवा लघुशंकेला जाऊन आल्यावर हात न धुणे इत्यादी अनारोग्यकारी सवयींमुळे जंतू नोटांवाटे किंवा जिथे जिथे मुखारसाचा उपयोग केला जातो त्या सर्व ठिकाणी रोग पसरण्याची खूप शक्यता असते.
विषयाचं गांभीर्य पाहून मला एक लक्षात आलं आहे की प्रत्येक व्यक्ती काही अशा गोष्टी पाळू शकते ज्या आचरणासाठी सोप्या आहेत पण ज्यामुळे खूप चांगला परिणाम साधू शकेल.
१. दिवसभरात जितक्यावेळा शक्य आहे तितक्यावेळा साबण वापरून हात धुणे.
२. नेहेमी हातरुमाल जवळ बाळगणे. व त्याचा वापर शिंकताना, खोकताना इत्यादीवेळी करणे.
३. नोटा केवळ आपल्या पाकीट किंवा पर्समध्येच ठेवणे. अंगाला सरळ स्पर्श होईल अशा तऱ्हेने त्या न ठेवणे.
४. मुखरसाचा वापर वह्यापुस्तके, नोटा, स्टॅम्प्स, वर्तमानपत्र इत्यादी ठिकाणी पानं उलटण्यासाठी, काही चिकटवण्यासाठी किंवा चिकटवलेले सोडविण्यासाठी न करणे. त्याकरिता पाण्याचा स्पंज किंवा दुसरं काही ओलं माध्यम मुद्दाम वापरणे.
५. एकंदरीतच आरोग्याच्या चांगल्या सवयी अंगीकारणे.
सगळीच यादी द्यायची झाली तर जागा आणि वेळ दोन्ही कमी पडेल आणि असे अनेक मुद्दे मांडता येतील. पण या सगळ्याचा मथितार्थ हा की वैयक्तिक आरोग्याबद्दल सजग होऊन चांगल्या सवयी जोडून निदान आपण आपल्या मुखरसपानाचा स्वाद दुसऱ्यांना देत नाही ना याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे . त्यायोगे आपलं वैयक्तिक आरोग्य सांभाळता येईल आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडून थोडातरी हातभार लावता येईल.
आणि माझं विचाराल तर त्या डेरीवाल्याकडून नोटा किंवा नोटांची बंडलंच काय पण आता दूध घेण्यासाठीसुद्धा माझी छाती होत नाही…