निर्विकल्प समाधीचा डेमो- 27 सप्टेंबर 2017

/ / marathi

स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध शिकागो व्याख्यानाला 125 वर्ष पूर्ण होतील. हे व्याख्यान म्हणजे नुसत्या स्वामी विवेकानंदांच्याच चरित्रात नव्हे तर भारतीय इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिलेले क्षण आहेत. स्वामी विवेकानंदांच चरित्र वाचनात खूप वर्षांपूर्वी लहानपणी आलं. त्यात त्यांच्या बालपणीचे प्रसंग वाचताना मजा वाटायची. लहानपणी एका झाडाला ब्रह्मसमंध बाधा झाली आहे हे कळल्यावर त्या झाडावर ते रात्री बारा वाजता चढले होते, खरच ब्रह्मसमंध झाडावर भेटतो का ते पाहण्यासाठी. अर्थात तो ब्रह्मसमंध त्यांना काही दिसला नाही पण माझ्या बालमनाला मात्र ‘स्वामी विवेकानंद’ या नावाची बाधा तेव्हाच झाली. स्वामीजींच्या लहानपणीचा तसाच दुसरा प्रसंग म्हणजे त्यांचे सगळे मित्र एकत्र बसून ध्यान करताना समोर नाग येण्याचा. तो नाग बघून सगळे इतर मित्र पळून जातात पण बिले (स्वामीजींना लहानपणी ‘बिले’ हे टोपणनाव होतं) मात्र जागचा हलत नाही कारण त्याची खरंच तंद्री (की समाधी?) लागलेली असते. त्याही प्रसंगाने माझ्या मनावर गरुड केलं आणि ‘स्वामी विवेकानंद’ या नावाने हृदयाच्या एका कोपरा आदर आणि एकप्रकारच्या आपलेपणाने भरून गेला.

मोठा झाल्यावरही ‘स्वामी विवेकानंद’ हे नाव हृदयाच्या त्या कोपऱ्यातून कधीच हललं नाही. आयुष्याच्या अवघ्या ३६ वर्षात आपल्या भक्ती, ज्ञान, बुद्धी आणि वैराग्याने जग जिंकून स्वतःची छाप संपूर्ण विश्वावर सोडून जाणाऱ्या या महापुरुषाच्या जीवनचरित्राची पारायणे करताना आणि त्यांचे वेदान्ताचे विचार वाचताना माझ्या बुद्धीच्या त्यात्यावेळच्या प्रगल्भतेइतपतच मला स्वामी विवेकानंद कळायचे. पण जितके कळायचे तेही खूप काही सांगून, शिकवून जायचे.
त्यांच्या चरित्रातील एक प्रसंग मला एका वेगळ्या संदर्भात नेहेमी आकर्षित करायचा. अगोदर ब्राह्मोसमाजाच्या विचारांचे पुरस्कर्ते असणारे स्वामीजी म्हणजेच त्यावेळचे नरेंद्र दत्त जेव्हा श्रीरामकृष्ण परमहंसांच्या सहवासात येतात, त्यावेळी “तुम्ही देव पहिला आहे का?” असा रोकडा सवाल त्यांना करतात. इतकच काय पण “तुम्ही म्हणता त्यावर मी विश्वास ठेवणार नाही, मला स्वतःची अनुभूती हवी” असा स्पष्ट आग्रह ते श्रीरामकृष्णांकडे करतात. त्या भेटीदरम्यान एकवेळा श्रीरामकृष्ण शक्तिपाताने त्यांना निर्विकल्प समाधीचा आणि निर्गुणी परमेश्वराचा एक अनुभव देतात. हा प्रसंग मला खूप मोहित करतो. खरं तर आजकालच्या जमान्यात आपण कुठलीच गोष्ट त्या वस्तूचा ‘डेमो’ बघितल्याशिवाय घेत नाही. पण ईश्वरानुभूतीचा, निर्विकल्प समाधीचा ‘डेमो’ त्या काळात मागणारे स्वामीजी आणि त्यांना तो देणारे श्रीरामकृष्ण दोघेही तितकेच विरळा, तितकेच थोर आणि तितकेच अद्भुतही वाटतात मला. इतकंच नाही तर हा अनुभव एकदा दिल्यावर श्रीरामकृष्ण त्यांना म्हणतात “अरे निर्विकल्प समाधी तुझ्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. पण समाधीत लिन राहून केवळ स्वतः आनंद घेण्याइतक्या स्वार्थी विचाराने तू जन्माला आला नाहीस. म्हणून मी हा अनुभव कुलुपात बंद करून माझ्याकडे त्याची चावी ठेवणार आहे आणि योग्य वेळी ती तुला परत देणार आहे. नरात नारायण बघून या नरनारायणाची पूजा बांधण्यासाठी तू आला आहेस. जा आपलं कार्य कर”.

काय प्रसंग असेल तो ? या प्रसंगाची नुसती कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या दोघांच्या मनात त्यावेळी नक्की काय चाललं असेल? ईश्वरानुभूतीचा अनुभव मागणारे स्वामीजी आणि त्यांना तो ताबडतोब देणारे श्रीरामकृष्ण ह्या किती उच्च विभूती असतील? अंतिम ध्येयाच्या वाटेवर कितीही मोहक क्षण आले, अगदी अंतिम मुक्ती देणाऱ्या निर्विकल्प समाधीचा अनुभव जरी मिळाला तरी तो बाजूला ठेऊन, आपल्या अंतिम ध्येयाप्रति निष्ठा ना ढळू देता मार्गक्रमणा करीत राहण्याचा वस्तुपाठच या प्रसंगातून मिळतो.

भक्तीच्या वाटेवर मला अंती नक्की काय मिळवायचं आहे आणि मी अंतिम कुठलं ध्येय गाठणार आहे, त्याचा पाठपुरावा साधारणतः ‘शब्द प्रमाण’ किंवा ‘अनुमान प्रमाण ” यावर विश्वास ठेऊन सुरु असतो. पण एक क्षणार्धापुरतं का होईना पण ‘प्रत्यक्ष प्रमाण’ मिळावं अशी मनात आस मनात असतेच. पण प्रत्यक्षात , “आपली नाही तितकी लायकी किंवा (चांगल्या शब्दात) पातळी ” अशी स्वतःचीच समजूत करून घ्यावी लागते.
पण खरंच सांगू? अजून ‘प्रत्यक्ष प्रमाण’ अनुभवायची आस सुटलेली नाही. पण हे ही पक्क माहिती आहे की तो ‘डेमो’ हवा असेल तर आधी नरेंद्र दत्त व्हावं लागेल. त्यासाठी जन्मोजन्मी साधनेचं “बहुपुण्य” करावं लागेल. कुठल्यातरी भाग्यवान जन्मी श्रीरामकृष्ण भेटावे लागतील, आणि तो ‘डेमो’ मिळाल्यानंतरही तो अनुभव परत कुलुपात बंद करून नरनारायणाची सेवा करावी लागेल.
माझं मलाच विचारलं. आहे इतकी माझ्या मनाची या ‘डेमो’ साठी तयारी झालेली? नाही ना ? मग स्वामीजींच्याच शब्दात मनाला समजावलं. रे मना ! “उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत” असं म्हणायचं आणि चुपचाप कामाला लागायचं…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *