काही काळापूर्वी माझ्या वाचनात एक छान लेख आला होता. तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यंक्तींपैकी एकावर लिहिलेला मुलाखतवजा लेख होता. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एकाला त्या मुलाखतीत विचारलं होतं की “तुम्ही इतकं प्रचंड आर्थिक साम्राज्य उभारलं. ते करत असताना तुम्हाला अनेकवेळा खूप महत्वाचे आर्थिक निर्णय घ्यावे लागले असतील. प्रत्येक निर्णयावर लक्षावधी डॉलर्सची उलाढाल अवलंबून असायची. अशावेळी तुम्ही निर्णय कसे घेत होतात? कधी दबाव आला नाही का निर्णय चुकेल याचा?” या प्रश्नावर त्या श्रीमंत माणसाने खूप सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला ” माहित असलेल्या गोष्टींची वस्तुस्थिती (facts) , माहित नसलेल्या गोष्टींची संभाव्यता (possibilities) आणि थोडी त्रुटींचा फरकाची तयारी (margin of error) ठेऊन मी निर्णय घेत असे. एकदा निर्णय घेतला आणि तो चुकला तरी त्यावर फार विचार करत न बसता त्यातून शिकत असे आणि पुढे जात असे. मी माझ्या व्यवसायाची आर्थिक उलाढाल हा खेळ मानतो आणि खेळ म्हणूनच खेळतो. मग असं असेल तर त्यात हार जीत ही आलीच. हा खेळ मी पूर्वीही खेळात असे आणि आताही खेळतो. फरक इतकाच की डावावर लागलेली एकावरची शून्य जशी वर्ष गेली तशी वाढत गेली इतकंच”. किती सुंदर तत्वज्ञान किती कमी शब्दात सांगितलं त्याने.
मला आठवतंय की हे वाचून त्यावेळी मी माझ्या स्वतःच्या निर्णयप्रक्रियेचा विचार करू लागलो. आणि त्या श्रीमंत माणसाने मांडलेल्या विचारांच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. पहिली गोष्ट ही की माझे निर्णय हे वस्तुस्थितीपेक्षा भावनेच्या अमलाखाली घेतले जात असत. दुसरी गोष्ट म्हणजे संभाव्यतांपेक्षा स्वप्नरंजनाचा मनावर प्रभाव अधिक असायचा. त्यामुळे एखादी परिस्थिती काय उद्भवू शकते या पेक्षा ती मला कशी उद्भवलेली आवडेल, किंबहुना ती तशीच उद्भवेल या विश्वासावर तो निर्णय अवलंबून असायचा आणि त्यामुळे संभाव्य प्रतिकूल परिणामांचा माझ्या निर्णयामुळे भविष्यात काय परिणाम दिसू शकेल याचा फारसा विचारच केलेला नसायचा. “मला अनुकूल तेच घडेल” असा भाबडा आशावाद ठेऊन निर्णय घेतला जायचा. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्रुटींचा फरकाची (margin of error) तयारी न ठेवलेली असल्यामुळे प्रतिकूल परिस्थिती अंगावर घेण्याची तयारीच झालेली नसायची. आणि या निर्णयप्रक्रियेमुळे व्हायचं असं की माझ्या अपेक्षेप्रमाणे निर्णयाचा परिणाम आला की अहंकार वाढायचा आणि अपेक्षेप्रमाणे परिणाम नाही आला तर प्रतिकूल परिणामाच्या दुःखापेक्षा “माझा निर्णय चुकला म्हणजे मीच कुठेतरी कमी पडलो असणार” या अपराधीभावनेनेच मन व्यापलं जायचं. तेव्हाच लक्षात आलं की भावनेने घेतलेल्या निर्णयाच्या नाण्याच्या दोन बाजू असतात एक अहंकाराची आणि दुसरी अपराधीपणाची. आणि गंमत म्हणजे बाह्यपरिस्थिती ही खूप वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे न वागल्यामुळे निर्णय चुकल्यासारखेच वाटायचे आणि ही निर्णय चुकल्याची अपराधीपणाची भावनाच मनात अधिक घर करून असायची.
मग आयुष्यात आली श्रीमद भगवदगीता. श्रीमद भगवदगीतेच्या अंतरंगात जस जसा शिरू लागलो, तसतसा “कर्मासाठी कर्म करावे” याचा नेमका अर्थ हळू हळू उलगडायला लागला. कर्म हे स्वधर्मावर अवलंबून असतं आणि कुठलंही कर्म हे लहान मोठं नसतं, ते कर्त्याच्या हेतूवर आणि मानसिकतेवर अवलंबून असतं हे लक्षात येऊ लागलं. त्यामुळे एखादं जगाच्या नजरेत भव्यदिव्य ठरणारं काम करून त्यातून होणाऱ्या संपत्ती, प्रसिद्दी या संभाव्य लाभाच्या स्वप्नरंजनातून स्वतःला थांबवून त्यातून स्वतःला बाहेर काढायचा प्रयत्न करायला लागलो. त्या संभाव्य लाभातून मिळणाऱ्या मृगजळासारख्या असणाऱ्या सुखाच्या मागे धावायची उर्मी हळू हळू कमी होऊ लागली आणि या बदलांमुळे आयुष्यातला आटापिटा आणि त्यामुळे होणारी मनाची ओढाताण कमी व्हायला लागली. आता मोठं काम हातात घेण्याऐवजी, हाती आलेलं काम मोठं, उदात्त, उच्च कसं करता येईल याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. हीच “योग: कर्मसु कौशलम” या तत्वामागची संकल्पना आहे हे आता लक्षात येतं आहे. कारण जर ईश्वराला माझ्याकडून काही मोठं करवून घ्यायचं असेल तर तशी आजूबाजूची परिस्थिती, साधनं, आजूबाजूची माणसं, शक्ती, बुद्धी सगळंच तो ब्रह्माण्डनायक देईल आणि ते काम माझ्याकडून करवूनही तोच घेईल ही श्रद्धाही मनात निर्माण झाली आहे. आणि हा विचार जेव्हा जेव्हा मनाचा ताबा घेतो त्यावेळी सकारात्मक शरणागतीतून येणारी एक अनामिक शांती मनात भरून जाते.
जे हिताचं आहे ते माझ्या समोर येईल हे ज्ञान, हे समोर आलं आहे ते माझ्या हिताचंच आहे ही श्रद्धा आणि ज्या अर्थी ते माझ्या समोर आलं आहे त्या अर्थी तेच माझं कर्म आहे आणि कर्म माझं असूनही कर्ता मात्र जगद्नियंताच आहे हे तत्वज्ञान जेव्हा अंगात मुरेल आणि कळलेलं जेव्हा वळू लागेल तेव्हा त्या श्रीमंत माणसाने आर्थिक उलाढालीत केला तसा, पण त्यापेक्षा कितीतरी सात्विक खेळ पूर्ण आयुष्यभर आनंदाने खेळायची संधी मिळेल हीच आशा आणि हीच प्रार्थनाही…