
एकदा एक पालक त्यांच्या ६-७ वर्षाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. मला म्हणाले, “सर ह्याला काहीतरी शिकवायचंय.” मी म्हणालो “काहीतरी म्हणजे नक्की काय?” “काहीतरी म्हणजे संगीतातलं काहीतरी”, पालक म्हणाले. मी म्हणालो ” मी तबला आणि संवादिनी दोन्ही शिकवतो त्यापैकी काय?”. त्यावर पालक म्हणाले, “अहो आता सुट्या लागल्या आहेत. घरी बसला ना की भयंकर मस्ती करतो. या सुट्टीच्या तीन महिन्यात त्याला काय येईल ते शिकवा, तबला पेटी काहीही. बस दररोज दोन तास स्वस्थ बसला पाहिजे घरी. शाळा नसली ना की एकतर आमच्या डोक्याशी कटकट करत बसतो नाहीतर गेम खेळतो मोबाईल वर. आम्ही म्हटलं मोबाईल पेक्षा तबला बरा. शिकवून टाका त्याला या सुटीत काहीतरी”
मी या अनपेक्षित धक्क्यातून थोडा सावरलो. मनात म्हटलं,”शिकवून टाका?” पण चेहऱ्यावरचं स्मित बळजबरीने तसंच ठेऊन मी त्यांना म्हटलं, “अहो असं तीन महिन्यात येत नाही एखादं वाद्य वाजवता. त्यापेक्षा तुम्ही त्याला पोहायला का नाही पाठवत?”. त्या पालकांना माझी सूचना खूप आवडली असावी बहुतेक, कारण मला प्रांजळपणे ते म्हणाले,” सर बेस्ट आयडिया सांगितली तुम्ही. पोहायलाच जाऊदे त्याला. नाहीतरी तबला शिकला तर आमच्याच डोक्याशी बसेल ठणठण करीत. त्यापेक्षा पोहायला बाहेर गेला तर आम्हालाही घरी जरा शांती मिळेल डोक्याला. थँक यु हा सर !” असं माझ्या मौलिक सूचनेबद्दल मलाच धन्यवाद देऊन ते बालक आणि पालक दोघेही निघून गेले आणि मी स्वतःशीच हसलो आणि हुश्श केलं.
ते गेले पण त्या पालकांनी मला विचारात मात्र पाडलं. माझ्या जीवनात संगीत कस आलं याचा विचार करायला लागलो. खरं तर काही अपवाद वगळता सगळ्याच लहान मुलांना संगीत शिकण्याची जबरदस्तीच करावी लागते. तशी मलाही अगदी जबरदस्ती करून आईने तबल्याच्या ‘क्लासला घातला’. जगाच्या पाठीवर जितकी कारणं शोधता येतील तितकी कारणं मी क्लास बुडवण्यासाठी शोधून काढायचो पण आई कधीच बधली नाही आणि माझं संगीत शिक्षण सुरु राहिलं. जसजसा शिकत गेलो तसं संगीत आवडायला कधी लागलं हे माझं मलाच कळलं नाही. एकदा माझे आजी-आजोबा म्हणजे आईचे आईवडील आमच्याकडे राहायला आले होते. माझे आजोबाही सतार आणि तबला वाजवत असत. माझी संगीतातली थोडीफार प्रगती पाहून ते मला एकदा म्हणाल्याचं आठवतंय, “राजेंद्र, आयुष्यात संगीत कधीच तुला एकटं पडू देणार नाही. स्वतःत रमता येणं हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून संगीत शिक.”.
माझ्या बालबुद्धीला त्यावेळी जे काही उमगलं असेल ते असेल पण आता काही पावसाळे उलटल्यावर आजोबांच्या वांक्यातला गर्भितार्थ आणि संगीताचं आयुष्यातलं महत्व लक्षात येतंय. मला नक्की काय मिळालं संगीताकडून याचा विचार करताना काही गोष्टी उमगल्या त्या अशा;
१. शारीरिक पातळीवर; चिकाटीने एका जागी एकाच आसनात ताठ पण स्वस्थ बसण्याची हळूहळू सवय लागली. वाद्य शिकताना मोटर स्किल्स खूप उत्तम तयार झाली. स्वतःच्या शरीराकडून आपल्याला हवी तशी आणि तितकी मेहेनत करवून घेता येते हे लक्षात आलं.
२. बौद्धिक पातळीवर; कायदे, रेले, परण, चक्रधार, रागांचे आरोह, अवरोह, चलन, बंदिशी इत्यादी अनेक गोष्टी समजून घेऊन लक्षात ठेवायला लागत असल्यामुळे आकलनशक्ती, स्मरणशक्ती, धारणाशक्ती, वाढली. एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहायची सवय लागल्यामुळे सर्जनशक्ती वाढली.
३. मानसिक पातळीवर ; एकच बंदिश किंवा गत, किंवा एकच पलटा शंभरवेळा वाजवण्यासाठी लागणारी चिकाटी अंगात भिनली. सुरवातीच्या काळात कितीही वेळा चुकत असलं आणि आपणच वाजवलेलं आपल्यालासुद्धा सहन होत नसलं तरीही कधीतरी जमेल म्हणून प्रयत्न करत राहण्याचा प्रयत्नवाद आणि आशावाद मिळाला. न चुकता दररोज नियमित स्वाध्याय करण्याची सवय लागली. दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी निरीक्षणशक्ती आणि दुसरा आपल्यापेक्षा चांगला आहे हे मान्य करण्यासाठी लागणारा मनाचा मोठेपणा अंगात भिनवता आला.
४. भावनिक पातळीवर; सौंदर्य कसं शोधायचं, त्याच रसग्रहण कसं करायचं आणि स्वतःच्या कलाकृतीत ते निर्माण करायचा प्रयत्न कसा करायचा हे शिकलो. दोन शब्दांमधल्या, स्वरांमधल्या, बोलांमधल्या विरामामधली, त्या क्षणार्धामधली, त्यातील स्तब्धतेमधली सृजनशील शांतता अनुभवायला शिकलो. दुसऱ्याबरोबर संवाद साधायला शिकलो. संवादातील सौंदर्य व्यासपीठावरील इतर नांदयात्रींबरोबर आपापसात आणि इतरांबरोबर वाटायला शिकलो. स्वतःला झालेला आनंद जेव्हा उतू जातो तेंव्हा तो श्रोत्यांशी वाटताना कमी होत नाही, उलट वृद्धिंगत होतो हे उलटं गणित शिकलो.
५. अध्यात्मिक पातळीवर; गुरुप्रती समर्पण शिकलो, स्वरांमध्ये स्वस्थ आणि मात्रांमध्ये मध्ये क्षणस्थ राहण्याचा प्रयत्न करायला शिकलो. गहिरेपण आणि अथांगता एकाचवेळी पेलण्याचा प्रयत्न करायला लय आणि नादाच्या अभ्यासातून, अवगाहनातून शिकलो. रंगशारदेची अर्चना शिकलो, व्यासपीठाची प्रार्थना शिकलो. एका निसटत्या क्षणी स्वतःला विसरायला शिकलो आणि तो क्षण पुन्हा पुन्हा आयुष्यात यावा म्हणून कधीच न संपणाऱ्या नादयात्रेचा वारकरी व्हायला शिकलो.
अजूनही या अनाहताच्या नादयात्रेत अनंत गोष्टी शिकायच्या, समजायच्या, अनुभवायच्या शिल्लक आहेत. या नदयात्रेचं अनंतपणच आकर्षक आहे आणि म्हणूनच वाटतं;
संपणारा मार्ग नाही या प्रवासा अंत नाही ।
नादयात्रा संपली नाही तरीही खंत नाही ।।१।।
नादयात्रेचा प्रवासी चालतो नादात मी ।
लागलो नादी जरी चुकलो तरीही खंत नाही।।२।।
सूर मंत्रांचे कधी जर गणित मजला साधले ।
जीवनाच्या बेरजा चुकल्या तरीही खंत नाही।।३।।
वाहवा होण्या स्वतःची सूर मी विकणार नाही ।
कौतुकाची थाप ना पडली तरीही खंत नाही।४।।
सूरभास्कर मी उद्याचा जाहलो ना जाहलो।
नादयज्ञी पेटुनी विझलो तरीही खंत नाही।।५।।
एक झालो मी स्वराशी साधली अद्वैतता ।
अस्तित्व माझे लोपले तेव्हा तरीही खंत नाही।।६।।