
लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीत एका राजाला डुकराचे कान होते. त्यामुळे तो असा फेटा बांधायचा की कुणालाच त्याचे कान दिसायचे नाहीत. पण त्या राजाचे केस कापणारा ‘राजनाभिक’, त्या पासून कसं लपून राहणार हे गुपित! पण राजाने त्याला सक्त ताकीद दिली होती की त्याने जर हे गुपित कोणाला सांगितलं तर त्याचा त्याच दिवशी शिरच्छेद होईल. पण त्याला हे गुपित खूप काळ पोटात ठेवता येणार नव्हतं. मग त्याने केली एक युक्ती. तो आपल्या घराजवळच्या एका झाडाच्या ढोलीमध्ये हळू आवाजात म्हणायचा, ” डू डू डुकराचे कान, राजाला डुकराचे कान”. असं बरेच दिवस चाललं होतं. एक दिवस एका वाद्य बनवणाऱ्या कारागिराने ते झाड त्या न्हाव्याकडून विकत घेतलं आणि त्याचं बनवलं ढोलकं. ते ढोलकं जेव्हा वाजायला लागलं त्यावेळी त्यातून आवाज आला,” डू डू डुकराचे कान, राजाला डुकराचे कान”. आणि सगळ्या राज्यात कळलं कि राजाला डुकराचे कान आहेत म्हणून. हे जेव्हा राजाला कळलं त्यावेळी ही गोष्ट कुणा माणसाला त्या न्हाव्यानी सांगितली न्हवती म्हणून अगदी शिरच्छेद झाला नाही, पण ढोलीत का होईना पण त्याने ते गोष्ट झाडाला सांगितली आणि मग ती बाहेर आली म्हणून त्या राजाने त्या न्हाव्याला शिक्षा मात्र केली.
आम्ही लहानपणी ही गोष्ट अनंत वेळा ऐकली आहे. माझे वडील ही गोष्ट इतकी रंगवून सांगायचे की डोळ्यासमोर पूर्ण चित्र उभं राहायचं. विशेषतः तालासुरात म्हटलं गेलेलं ” डू डू डुकराsssssssचे कान, राजाला डुकराsssssssचे कान”. हे प्रत्येकवेळी ऐकूनसुद्धा आम्ही तितकेच खदखदून हसायचो.
ही गोष्ट नुकतीच पुन्हा आठवली पण वेगळ्या संदर्भात. व्यवसायाच्या निमित्ताने खूप लोकांशी संबंध येतो. खूप गॉसिप होतं. “तुला म्हणून सांगतोय , पण कुणाला सांगू नकोस हं !” या मथळ्याखाली बऱ्याच लोकांनी माझी झाडाची ढोली केलेली आहे. अर्थात माझ्या ढोलीची अजून कुणी ढोलकी केलेली नसल्यामुळे माझ्याकडून कुठल्याच राजाच्या डुकराच्या कानांबद्दल किंवा कुठल्याच अशा गुपितांबद्दल या कानाचं त्या कानाला कळलेलं नाही हा मुद्दा इथे मुद्दाम नमूद करतो. पण जेव्हा जेव्हा कुणी मला असं गुपित सांगतं त्या त्यावेळी मला त्या गोष्टीची आठवण येते आणि मनातल्या मनात ” डू डू डुकराsssssssचे कान, राजाला डुकराsssssssचे कान” असं म्हणून स्वतःच स्वतः हसतो देखील. विनोदाचा भाग सोडून द्या पण थोडा गांभीर्याने विचार केला तर एक नक्की जाणवतं की असं जो कोणी गुपित सांगत असतो किंवा दुसऱ्याची निंदा करत असतो यावेळी त्या निंदा करणाऱ्या माणसात मला कधी असूया दिसते, कधी दुसऱ्याचे दोष काढून स्वतःच्या मर्यादांवर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो, कधी दुसऱ्याचे दोष बघून ते आपल्यात कसे नाहीत हे दाखवण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीचा अहंकार दिसतो, कधी मद दिसतो, कधी मत्सर दिसतो आणि यात सामान गोष्ट ही असते की भावना कुठलीही असो पण निंदा करत असणाऱ्या माणसाचं तडफडणारं अस्वस्थ मन नेहेमी दिसतं. आणि मी हे स्वतःच करत असेन आणि माझ्या मनाला साक्षीत्वाने तपासलं तर अगदी माझ्यातसुद्धा हे होत असलेलं मला जाणवतं.
लहानपणी ऐकलेल्या या इसापनीतीतल्या किंवा तत्सम संस्कार कथा मला हल्ली वेगळ्याच संदर्भात खूप वेगळ्या दृष्टीकोनातून कळायला लागल्या आहेत. त्याचे खोल अर्थ जाणवू लागले आहेत आणि या गोष्टी या वयातही अजूनही तितक्याच बोधाच्या आहेत असं वाटायला लागलंय. या डुकराच्या गोष्टीतून मी बोध घेतले ते असे;
पहिला बोध म्हणजे आपण आपलं व्यंग, आपला कोतेपणा, आपल्या मर्यादा, आपल्या त्रुटी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी आज ना उद्या त्या जगापुढे उघड्या पडणारच आहेत. मग असं जर असेल तर आपल्यात असणारा कमीपणा आपण मान्य करून तो लपवण्याचा प्रयत्नच केला नाही तर? काही त्रुटी या नैसर्गिक असतात आणि त्या संदर्भात आपण काहीच करू शकत नाही. मग त्यात लपवण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं काय आहे? त्या राजाने स्वतःच आपल्या कानाबद्दल प्रजेला सांगितलं असतं तर? असं त्या राजाने केलं असतं तर हसण्याऐवजी उलट राजाच्या प्रामाणिकपणाबद्दल प्रजेने त्याला समजून घेऊन त्याला पाठिंबाच नसता दिला का? कोणी इतर राजाला हसलं असतं तर प्रजाच राजाच्या बाजूने उभी राहिली नसती का? शारीरिक व्यंगावर हसणाऱ्या लोकांपेक्षा त्या व्यंगावर मात करण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करायला पुढे सरसावणारे हात संख्येने अधिक असतात असं माझं निरीक्षण आहे. ज्या नैसर्गिक नाहीत पण आपल्यातल्या त्रुटी आहेत त्या मान्य केल्या, तर माझा अनुभव असा आहे की त्या आहेत हे मान्य करण्यातच त्यावर मात करण्यासाठी लागणारं अर्धाधिक बळ मिळतं आणि उरलेलं बळ, आपला त्यावर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बघून आजूबाजूचं जग आपल्याला देतं. मग असं असेल तर त्रुटी लपवून आयुष्यभर त्रुटींसोबत राहण्याऐवजी त्या मान्य करून दुसऱ्यांचा मदतीने त्यांना आयुष्यातून काढून टाकणं जास्त संयुक्तिक नाही का?
दुसरा बोध असा की मी निंदा किंवा गुपित अगदी ढोलीत जरी सांगितलं तरी वैश्विक नियम असा आहे की ती निंदा, ते गुपित फिरून माझ्याचकडे परत येणार आहे आणि ते सुद्धा कित्येक पटीने. त्यामुळे केलेलं गॉसिप, केलेली निंदा, विचारात आलेली नकारात्मकता, दुसऱ्याबद्दल वाटणारी असूया, मत्सर, मद यामुळे अल्पकाळापुरता जरी माझा अहं सुखावत असला तरी त्या सर्व गोष्टी कित्येक पटीने माझ्याकडेच परत येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून ढोलीत जरी मी कुणाची निंदा केली तरी कधीतरी ते ढोलकं बनून वाजू लागेलच आणि त्यावेळी त्यावर माझं काहीही नियंत्रण नसेल. त्यामुळे ढोलीतसुद्धा निंदेचे शब्द बोलायचे नाहीत इतकंच माझं नियंत्रण आहे त्यापलीकडे नाही.
अर्थात कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी मी माणूस आहे आणि माझा अहं काही नक्कीच मेलेला नाही, आणि तसा दावाही करण्यात काहीच अर्थ नाही. मग मला गॉसिप करावंसं वाटलं कुणाविषयी नकारात्मक बोलावसं वाटलं, अगदी निंदा करावीशी वाटली तर त्यावेळी मी काय करायचं? मला झालेला तिसरा बोध आणि मला सापडलेलं उत्तर असं की माणसांबरोबर गॉसिप करण्याचं प्रमाण हळू हळू कमी करून देवाबरोबर गॉसिप करायला सुरवात करायची. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील काही अभंगात नकारात्मकता जाणवते. काही अभंगात तर अभद्र आणि काही वेळा तर अगदी शिवराळ भाषासुद्धा वापरली गेली आहे. असं का असावं याचा उलगडा आता मला या विचाराच्या संदर्भाने झाला. तुकोबाराय देवाला सगळंच सांगत होते. त्यांच्या आयुष्याबद्दलचं, त्यांच्या अनुभवांबद्दलचं, त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांच्या अनुभवांबाबतचं असं सगळंच. तुकोब्बारायांचं अभंगांच्या माध्यमातून देवाबरोबर चाललेलं हे गॉसिपच नव्हतं का? नवविधा भक्तींपैकी एक आत्मनिवेदनभक्ती हीच नाही का? संत तुकाराम महाराजांनी जसं गॉसिप केलं तसं आपणही देवाबरोबर गॉसिप करून बघायला काय हरकत आहे? देवाच्या, सद्गुरुंच्या मूर्तीशी किंवा तसबीरीशी बोलायचं, चांगलं असो वाईट असो, मन मोकळं करायचं. असं झालं तर हळू हळू गॉसिप, निंदा करायची उर्मी शांत होईल कदाचित, हळू हळू त्याची जागा गप्पा घेतील कदाचित, आणि पुढे न जाणो माझा देव माझ्यापुरता तरी सजीव होईल कदाचित.
सध्या जरी माझा देव तसबीरीत मूर्तीत असला, निर्जीव असला तरी, “डू डू डुकराsssssssचे कान” म्हणत माझं गुपित जगला सांगणार नाही इतका तरी फरक त्या झाडाच्या ढोलीत आणि माझ्या देवात नक्कीच आहे…