
परवा एका पूजेला जाण्याचा योग आला. पूजेचे मंत्र ‘देवभाषा’ म्हणून जी मानली जाते त्या संस्कृतमध्ये म्हटले जात होते. ते ज्या पद्धतीने म्हटले जात होते ते ऐकून विचार आला की देवभाषा जरी संस्कृत असली तरी असे म्हटलेले मंत्र देवाला तरी समजत असतील का? ह्या विचारावरून काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सहज आठवला. माझ्या भाच्याने एकदा कुठल्यातरी स्पर्धेत बक्षीस मिळवलं आणि घरी त्याचं प्रशस्तीपत्रक (सर्टिफिकेट) घेऊन आला. प्रशस्तीपत्रक इंग्रजीत होतं. आमच्या घरच्या शिरस्त्याप्रमाणे त्याला ते देवासमोर ठेवायला सांगितलं. हे सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं आणि त्याने अगदी निरागस प्रश्न विचारला ,” सर्टिफिकेट इंग्रजीत आहे, देवाला इंग्रजी येतं? ” त्या निरागस प्रश्नावर आम्ही सगळे हसलो. त्याला म्हटलं अरे देव सगळ्यांचा आहे मग इंग्रजी लोकांची प्रार्थना त्याला कळण्यासाठी देवाला इंग्रजी तर यायलाच हवी ना ? एवढच काय पण जगातल्या सगळ्या लोकांच्या प्रार्थना ऐकण्यासाठी त्याला सगळ्याच भाषा येतात. हे ऐकल्यावर इतक्या सगळ्या भाषा येतात म्हणजे देव म्हणजे कोणीतरी जबरदस्त सॉल्लिड व्यक्ती आहे हे त्याला मनापासून पटलं आणि तो देवाला मनोभावे नमस्कार करून निघून गेला.
हा प्रसंग आठवल्यावर मनात आलं की खरंच देवाची भाषा कुठली असेल? जगातल्या इतक्या भाषेतल्या प्रार्थना तो कसा ऐकत असेल? एकाच भाषेला देवभाषा म्हणून चिकटून राहील इतका ईश्वर मर्यादित कसा असेल? मग देवाची भाषा तरी कुठली?
मग अचानक एक मुद्दा लक्षात आला की देवाचं कॉम्पुटर सारखं असेल कदाचित. कॉम्पुटर इंजिनिरिंग करताना आम्ही खूप भाषा शिकलो. बेसिक, फोरट्रान, कोबोल, जावा, इत्यादी पण शेवटी कॉम्प्युटरच्या मायक्रोप्रोसेसर ला भाषा कळते ती केवळ शून्य आणि एक ची डिजिटल भाषा. यासाठी हाय लेव्हल लँग्वेज पासून डिजिटल भाषेपर्यंत येण्यासाठी इंटरप्रीटर, कंपायलर इत्यादी निर्माण केले जातात. कंप्युटरच्या इतिहासात आत्तापर्यंत अनंत हाय लेव्हल भाषा निर्माण झाल्या असल्या तरी शेवटी कॉम्प्युटरला कळणारी शून्य आणि एकाची डिजिटल भाषा कधीच बदललेली नाही.
असच काहीसं देवाच्या बाबतीत असेल का?
खोलवर विचार करताना असं लक्षात येतं की देवापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकजण आपापली ‘हाय लेव्हल लँग्वेज’ तयार करतो. मग तो भगवद्गीतेमधला श्लोक असो, बायबल मधली वर्स असो, किंवा कुरणातली आयत असो. या सगळ्या ‘वैखरी’ वाणीमधल्या प्रार्थना जगातल्या कुठल्याही हाय लेव्हल लँग्वेज मध्ये रचलेल्या असतात. ही वैखरीमधील प्रार्थना मग श्रद्धा, ज्ञान इत्यादी इंटरप्रिटर च्या द्वारे ती मग अधिकाधिक सूक्ष्म होत जात असावी आणि तीचं रूपांतर ‘मध्यमा’ आणि नंतर अधिक सूक्ष्म आशा ‘पश्यन्ति’ वाणी मध्ये होत असावं. ‘पश्यन्ति’ वाणीत केवळ एक विशिष्ट स्पंदन असतं असं म्हणतात. आणि पश्यन्ति वाणीपर्यंत ईश्वराप्रति द्वैताचं भान असतं असंही अध्यात्मशास्त्र सांगतं. हेच द्वैत म्हणजे शून्य आणि एक यात व्यक्त होणारी डिजिटल भाषाच नाही का? मानवनिर्मित कॉम्पुटर डिजिटल भाषेपर्यंत येऊन थांबला कारण त्रिगुणात व्यक्त होणाऱ्या सृष्टीचा प्रवास द्वैतापुढे होऊच शकत नाही. पण या पुढे ?
या पुढे, पश्यन्तिच्या पुढचा प्रवास सुरु होतो. पश्यन्तिची स्थिती पार केली की पुढे भाषेची गरजच नसते. त्या स्थानी सर्टिफिकेट कळण्यासाठी देवाला ना इंग्रजीची आवश्यकता ना प्रार्थना समजण्यासाठी संस्कृतातल्या मंत्राची किंवा श्लोकांची गरज. जगभरात देवाशी संभाषण करण्यासाठी वापरलेल्या हाय लेव्हल लँग्वेज इथे येऊन तोकड्या पडतात.
या इथे तर ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी’ घालण्यासाठी लागणारी पश्यन्तिमधील सूक्ष्म संवेदनाही येऊन थबकत असेल. मग तिथे कुठली भाषा उरत असेल?
तिथे असेल फक्त ईश्वराचं ‘परा’ वाणीत व्यक्त होणारं स्वसंवेद्य. तेच स्फुरण की जे अनंतकोटी ब्रह्मांडातील प्रत्येक अणूशी संवाद साधू शकतं आणि आणि तीच असावी बहुतेक देवाची खरी भाषा…