
काही वर्षांपूर्वी एका देवस्थानाला भेट देण्याचा योग आला. त्या देवस्थानात नेहेमीच खूप गर्दी होते भाविकांची. देवाच्या
मूर्तीचं दर्शन घ्यायचं तर तासनतास रांगेत उभं रहावं लागतं. ज्यांना देवासाठी द्यायला तितका वेळ नाही त्यांच्यासाठी
देवस्थानाने एक खास सोय ठेवली आहे. एका विशिष्ठ रकमेचं तिकीट काढून देवाच्या एक्सप्रेस दर्शनाची एक विशेष रांग
असते त्यात तुम्हाला उभं राहून, इतर पैसे न भरणाऱ्या गरीब भविकांपेक्षा देवाचं दर्शन लवकर मिळतं. बरं हे झालं
देवस्थानाने प्रमाणित केलेलं अधिकृत एक्सप्रेस दर्शन. त्याशिवाय ज्या फुलवल्याकडून भाविक फुलांची थाळी घेतात,
किंवा ज्या हॉटेलमध्ये भक्त वास्तव्यास असतात, किंवा ज्या वाहनतळावर भक्त त्यांची गाडी पार्क करतात, या सर्वांकडे
देवाकडे 'डायरेक' एक्सप्रेस कनेक्शन असतं ते वेगळंच. एकाच देवाकडे जाणारे भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग,
कर्ममार्ग इत्यादी मार्ग असतात हे ऐकलं होतं पण देवाच्या रांगेत उभं न राहता, 'डायरेक' दर्शनाची हमी देणाऱ्या या
एक्सप्रेस मार्गाचा मी नवीनच अनुभव घेत होतो. खरं खोटं परमेश्वरासच ठाऊक पण एक फुलवाला तर 'फुलाच्या
थाळीबरोबर देवाचं एक्सप्रेस दर्शन फ्री' असंही मार्केटिंग करतो असं हस्ते परहस्ते मी ऐकलं आहे. बरं एवढं सगळं करून
प्रत्यक्ष मूर्तीजवळ पोहोचल्यावर मूर्तीच्या पायावर डोकं ठेवण्याची सुद्धा उसंत मिळत नाही. मागून ढकलणारा
भाविकांचा लोंढा, "पुढे चला पुढे चला" असे भक्तांच्या अंगावर खेकसणारे देवस्थानचे पहारेकरी आणि गर्भागारातील
उकाड्याने कावलेले आणि घामाने निथळणारे पुजारी यांनी, माझ्या थाळीतील पेढ्याचा पुड्यातील काही पेढे समोरील
स्टीलच्या पिंपात टाकणे, थाळीतील हार मूर्तीवर फेकणे किंवा मूर्तीला चिकटवून माझ्या थाळीत पुन्हा परत ठेवणे.
आणि थाळीतील दक्षिणा दानपेटीत टाकणे इत्यादी गोष्टी क्षणार्धात आटोपल्यामुळे देवाला मनोभावे नमस्कार
करण्यासाठी डोळे मिटायची उसंत सुद्धा न मिळता, पुढे आपोआप ढकलला जाऊन माझं अगदी शब्दशः असलेलं
एक्सप्रेस दर्शन असंच पूर्ण झालं. देवचिये द्वारी खरोखरीच क्षणभरी सुद्धा उभा न राहता मी भाविकांच्या लोंढ्यातून
बाहेर फेकला गेलो आणि त्या गर्दीपासूनतरी मुक्ती नक्कीच साधली.
तो प्रसंग आठवला आणि मनात विचार आला की त्यावेळी मी दर्शन घेतलं म्हणजे नक्की काय केलं? जास्तीचं तिकीट
फाडून मी वेळ वाचवून काय केलं? आणि वेळच वाचवायचा होता दर्शनाचा तर इतके पैसे, श्रम, वेळ घालवून त्या
देवस्थानापर्यंत गेलोच कशासाठी? घरच्या देव्हाऱ्यातले देव दररोज पूजा करून सुद्धा माझ्या मनात जिवंत झाले
नसतील तर या अशा एक्सप्रेस दर्शनाने मी नक्की काय साधलं ? त्या देवस्थानच्या मूर्तीत त्या क्षणभरात मला असं
काय दिसणार होत जे मी माझ्या घरातल्या देव्हाऱ्यातल्या बालकृष्णाच्या मूर्तीत वर्षानुवर्षाच्या सहवासानेही पाहू शकलो
नाही ?
तीर्थाटन सांगितलं आहे आपल्या संस्कृतीत. पण ते कसं? पूर्ण प्रवासात ईश्वराचं नामस्मरण करत राहायचं, तीर्थाला
आल्यावर तिथल्या पवित्र जलाने स्नान करायचं, मग भक्तीभरल्या अंतःकरणाने तिथल्या आराध्य मूर्तीच डोळे आणि
मन भरेपर्यंत दर्शन घ्यायचं आणि ते सगुणरूप मनात ठेवून आणि साठवून पुन्हा नामस्मरण करत घर गाठायचं या
संपूर्ण अनुभवला म्हणायचं तीर्थाटन किंवा देवदर्शन. या अनुभवाचा एक कण तरी मला त्या एक्सप्रेस दर्शनात अनुभवता
आला का ?
मग विचार मनात आला की देवाचं, मूर्तीचं दर्शन म्हणजे तरी नक्की काय ? या प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी जेव्हा
संतवाङ्मयाचं परिशीलन केलं तेव्हा असं लक्षात आलं की अनंताला, अपरिमितत्वाला, निर्गुणत्वाला, निराकाराला
सामान्य मानवी बुद्धी आकलनात आणू शकत नाही म्हणून अनंतत्व, अगाधत्व, अपरिमित शक्ती यांचं बुद्धीला
समजण्यासारखं, मानवाच्या अस्तित्वाशी संबंध जोडता येऊ शकेल यासारखं प्रतीक म्हणजे मूर्ती. यासाठीच त्या मूर्तीला
चार हात, तीन डोकी किंवा अष्टभुजासुद्धा प्रतीक म्हणूनच योजलेल्या. आणि त्या अनंतत्वाची, अगाधत्वाची त्या
अपरिमित शक्तीची नतमस्तक होऊन केलेली आठवण म्हणजे दर्शन.
मग विचार आला की मूर्ती आणि दर्शन याची संकल्पना हीच असेल तर मग आता आधुनिक तंत्रज्ञान आणि
विज्ञानयुगात मूर्तीचं स्वरूप वेगळं असू शकेल का ? दर्शनाची पद्धत वेगळी असू शकेल का? या साठी मी एक प्रयोग
करायचं ठरवलं. युट्युबवर जाऊन आकाशगंगा (galaxies), अवकाश (space) शक्ती(energy), अणू (atom) असे
काही किवर्ड टाकून काही विडिओ शोधले. आणि त्यातील खूप सुंदर असे काही विडिओ बघितले. एकटा असताना
शांतपणे बघितले. त्या व्हिडिओतून विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय या साखळीला अनुसरून निर्माण होणाऱ्या, आणि
कालांतराने लयाला जाणाऱ्या ताऱ्यांविषयी जाणलं. ब्लॅक होल सारख्या गूढ संकल्पनांविषयी जाणलं, विश्व हे
प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने कसं प्रसार पावताय ते जाणलं. आणि मनाला साक्षी ठेऊन खरंच सांगतो की त्या
माध्यमातून काही अंशी ब्रम्हांडाचं अनंतत्व, अगाधत्व, अपरिमितत्व, आणि त्यात असलेली अफाट शक्ती हे काही
अंशांश प्रमाणात अनुभवलं आणि त्या दृश्य ब्रह्मांडापुढे आणि त्यामागच्या अदृश्य ब्रह्मांडनायकापुढे मी माझ्या क्षुल्लक
आणि क्षणभंगुर अस्तित्वाच्या जाणीवेने संपूर्ण शरणागत मनाने नतमस्तक झालो.
मग लक्षात आलं की वेळ, पैसे, शक्ति खर्च करून एखाद्या देवस्थानाला जाऊन अधिक पैसे देऊनसुद्धा असमाधान
देणाऱ्या त्या रांगेतल्या एक्सप्रेस देवदर्शनापेक्षा, अगदी घरबसल्या युट्युबवर मिळणारं हे एक्सप्रेस देवदर्शन कितीतरी
अधिक समाधान देणारं आणि अंतिम सत्य समजावणारं नाही का ?
आणि भक्तीने प्रेम करायला घरच्या देव्हाऱ्यातच दुडका बाळकृष्ण आहेच की…