
डोंबाऱ्याचा तारेवरच्या कसरतीचा खेळ बघणं हा लहापणीचा एक रोमांचक अनुभव असायचा. अर्थात मुंबईच्या रस्त्यांवर
डोंबाऱ्याने खेळापुरतं तात्पुरतं बस्तान बसवावं आणि आम्ही मुलांनी ते घोळका करून पाहावं हे जेव्हा शक्य होतं त्या
काळातली गोष्ट करतोय मी. आता डोंबाऱ्याचा खेळ बघण्यासाठी आवश्यक वेळ, त्याच्या तारेवरच्या कसरतीसाठी
रस्त्यावर पुरेशी जागा आणि मुंबईकराच स्वतःचच दररोजच आयुष्य तारेवरची कसरत झाल्यामुळे त्या खेळात
सामान्यांना वाटणारा रोमांच या तीनही गोष्टी कमी झाल्यामुळे हल्ली परंपरागत डोंबारी मुंबईत दिसत नाहीत फारसे.
आणि आताशा तसंही मुंबईत कुठल्याही रस्त्यावरून चालताना प्रत्येकजणच डोंबाऱ्याचा खेळ करत जणू चालत असतो
हाही भाग परंपरागत डोंबाऱ्याचं महत्व मुंबईत कमी होण्यास कारणीभूत आहेच. असो…
तर लहानपणी जेव्हा जेव्हा डोंबाऱ्याचा खेळ मी पाहत असे त्या त्या वेळी मला 'तारेवरची कसरत' हा त्यांचा खेळ खूप
आवडायचा. बांबुच्या काठ्यांचा त्रिकोण दोन बाजूला उभा करून, मध्ये बारीक तार ताणून बसवून, हातात एक लांब काठी
घेऊन, त्याच्या साथीदाराने वाजवलेल्या ढोलक्याच्या विशिष्ट तालावर तारेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तोल
सावरत जाणारा तो डोंबारी पाहून त्याच्या त्या धाडसी कौशल्यावर मी फिदा झालेला असे. तारेवरून चालत असताना
डोंबाऱ्याच्या मनात भीती असेलही कदाचित पण त्याच्या चेहेऱ्यावर इतका आत्मविश्वास असायचा की तो पाहून नंतर
साध्या रस्त्यावरून चालतानासुद्धा आम्ही तो भाव चेहेऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करायचो. तो डोंबारी कसं काय हे
अजब कृत्य करू शकतो याची क्लुप्ती बालबुद्धी शोधून काढायचा प्रयत्न करायची. त्यावेळी डोंबारी त्याच्या हातात जी
लांब काठी घेतो त्यातच काहीतरी गुपित दडलेलं आहे हे काही प्रमाणात लक्षात येत होतं. त्याने ती काठी हातात घेऊन
तारेच्या एका टोकापासून चालायला सुरुवात केली की आम्ही मुलंच आमचे श्वास रोखायचो. त्याचं लक्ष विचलित व्हावं
म्हणून काही टारगट मुलं त्याला काहीतरी चिडवायची, गोंगाट करायची. पण तो डोंबारी मात्र त्या साथीदाराच्या
ढोलक्याच्या तालावर त्या तारेवर दृष्टी आणि हातात ती लांब काठी घेऊन हळू हळू एकेक पाऊल टाकत अविचल मनाने
पुढे जात असायचा. तो डोंबारी तारेच्या त्या दुसऱ्या टोकावर पोहोचला की आम्ही मुलंच हुश्श करायचो आणि आपल्या
गोंगाटाचा काहीच परिणाम न होता तो डोंबारी त्या तारेच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचल्यामुळे त्या टारगट मुलांना
ओशाळलेलं पाहतानाही मजा यायची. बरं एवढं करून खेळ संपल्यावर डोंबऱ्याच्या झोळीत खेळ पाहणाऱ्यांकडून त्यांना
जितके द्यावेसे वाटतील तितके पैसेही पडतात हे पाहिल्यावर तर मी फारच प्रभावित व्हायचो. शाळेत असेपर्यंत
पॉकेटमनी नावाचा खजिना आईवडिलांतर्फे मिळत नव्हता. नाहीतर त्या डोंबाऱ्याला त्याच्या अद्भुत कौशल्याबद्दल
चार आठ आण्याचा दौलतजादा बहाल केला असता मी, अगदी आलमपन्हाच्या थाटात !. त्या खेळानंतर मला कोणी "तू
मोठेपणी कोण होणार?" असं विचारलं असतं तर बेधडक 'डोंबारी' हा एक करिअर ऑपशन मी छातीठोकपणे सांगून
मोकळा झालो असतो.
आता मोठा झाल्यावर त्या खेळाचं खरं गुपित कळायला लागलं आहे. आणि त्या खेळामधला रोमांच सुद्धा. असंतुलित
परिस्तिथीत संतुलन राखणं हाच तारेवरच्या कसरतीतला रोमांचित करणारा भाग आहे. सरळ सरळ वाट चालण्यामध्ये
मजाच नाही. माणसाच्या आयुष्याची वाट सुद्धा जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये ताणलेल्या तारेसारखी. म्हणूनच
आयुष्य ही "तारेवरची कसरत" अशी म्हण असावी कदाचित. ही तारेवरची कसरत सुरु असताना मनात भीती असली तरी
इतरांसाठी मात्र चेहऱ्यावर त्या डोंबाऱ्यासारखा आत्मविश्वास दिसणं आवश्यक असतं. आपल्या विश्वासू साथीदारांच्या
सोबतीने आपल्या जीवनध्येयाच्या दिशेने चाललेला हा प्रवास अविचल मनानेच यशस्वी करता येतो. अंतर्मनातील
सोहंच्या ढोलकीच्या आवाजाच्या नादात, आजूबाजूच्या गोंगाटाकडे, चिडवणाऱ्यांकडे, नकारात्मकता आपल्यावर
लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडे, आपल्या ध्येयापासून आपल्याला दूर करू पाहणाऱ्या विक्षेपांकडे, तात्पुरत्या मोहांकडे,
आणि अशा सगळ्याच विचलित करू पाहणाऱ्या त्या टारगट पोरांसारख्या असणाऱ्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करून एक
एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत यशस्वी होऊन समाधानी मनाने त्या तारेचं दुसरं टोक गाठायचं आहे. या
खेळादरम्यान प्रारब्ध आपला खेळ पाहून जितकं दान झोळीत टाकेल तितकीच दौलतजादा गोळा करायची असते, इथेही
जितका खेळातला धोका अधिक तितका मोबदलाही. झोळीत पडलेलं चुपचाप प्रश्न न विचारता मान्य करायचं.
आयुष्याच्या तारेवरच्या कसरतीततही पावलोपावली तोल जाण्याचा संभव. आणि तो तोल जाऊ नये म्हणून जशी डोंबारी
हातात काठी घेतो, तशी मी हातात घ्यायची जादूची काठी म्हणजे नामस्मरणाची. नामस्मरणाची काठी हातात असली
की तोल जायची भीतीच नाही. जन्मापासूनचा तारेच्या एका टोकाला सुरु झालेला हा खेळ मृत्यूच्या दुसऱ्या टोकापर्यंत
खेळायचा. दुसऱ्या टोकाला पोहोचलं की डोंबाऱ्यासारखंच आपलं बस्तान उठवायचं, मग दुसरं ठिकाण, दुसरा देह आणि
पुन्हा आयुष्याचा तारेवरच्या कसरतीचा खेळ मांडायचा स्वतःला आणि स्वतःबरोबर दुसऱ्याला रोमांचित करत
राहण्यासाठी. कुठपर्यंत? कोणास ठाऊक?
विचार आला की लहानपणी निवडलेला डोंबारी होण्याचा करिअर ऑपशन खरोखरच या जन्मातच नाही तर
जन्मोजन्मींसाठी फलद्रुप झालाय की!…