
मागच्या आठवड्यात मी माझा लॅपटॉप आतून स्वच्छ करण्याचा घाट घातला. आतून स्वच्छ करणे याचा अर्थ असा की
नवीन फाईल साठवण्यासाठी जागा करणे. लॅपटॉप घेतल्यापासून मी त्याच्या हार्ड डिस्क मध्ये केवळ फाइल्स साठवतच
गेलो. माझ्या लॅपटॉपची साठवणुकीची क्षमता जेव्हा मी घेतला त्यावेळी ५०० घबाड इतकी होती (१ घबाड = १ GB असं
या एककाला मला सुचलेलं मराठी नाव. हल्लीची लॅपटॉप मधली स्टोरेज कॅपॅसिटी पहिली की घबाड हाती लागल्यासारखं
वाटतं म्हणून हे नाव). तर इतकी प्रशस्त जागा उपलब्ध आहे म्हटल्यावर साठवत गेलो फाइल्स. फाईलचं व्यवस्थापन
करण्याचं, मधूनमधून नको असलेल्या फाईल काढून टाकण्याचं अनेकवेळा ठरवलं पण रडक्या बाळाला जसं आधी
उचलतात आणि शांत बाळ दुर्लक्षित राहतं, तशी दिवसातली इतर तातडीची रडकी बाळं उचलून घेऊन त्यांना शांत
करण्यात पूर्ण दिवस जायचा आणि त्या दिवशीचा कॉम्पुटर स्वच्छतेचा बेत दुसऱ्या दिवसावर पडायचा. या पद्धतीने
बरेच महिने गेले. जागा भरत चालली आहे असं कॉम्पुटरने कधीच ओरडायला सुरुवात केली होती पण मी त्याला तसाच
दामटला. आणि एक दिवस मात्र लॅपटॉपने स्टोरेज संपलं असा निर्वाणीचा संदेश देऊन लाल निशाण उभारलं. आता मात्र
नाईलाज झाला कारण या बाळाने तर भोकाडंच पसरलं होतं. बस ! मग लगेच पुढचाच रविवार ठरला. सकाळी एका
हातात चहाचा कप, दुसऱ्या हातात कॉम्पुटर आणि मनात कॉम्पुटर स्वच्छ झाल्याशिवाय जागेवरुन उठायचं नाही असा
दृढसंकल्प या तिन्ही गोष्टी घेऊन मी बेडरूममध्ये शिरलो.
स्वच्छतेसाठी फाईल मॅनेजर उघडला आणि जणू अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखं झालं. काही वर्षांपासूनचा खजिना
एक एक करून बाहेर पडत होता. माझ्या संवादिनीच्या काही वर्षांपूर्वीच्या सोलो कार्यक्रमांची रेकॉर्डिंगज्, माझ्या
मुलाच्या बालपणीचे फोटो, मुंजीचे फोटो आणि विडिओ, आम्ही फिरायला कोकणात गेलो होतो त्याचे फोटो आणि
विडिओ, माझ्या अमेरिका दौऱ्याचे फोटो आणि विडिओ, माझ्या जुन्या व्याख्यानांच्या पॉवर पॉईंट स्लाईड्स, अशा एक
ना अनेक गोष्टी होत्या त्यात. एकेक फोल्डर आणि त्यासोबत आठवणींचे पापुद्रे उलगडत होतो. पूर्वीचे दिवस पुन्हा
जगत होतो. काय काय ठेऊन दिलं होत मी त्या कॉम्पुटर मध्ये. दररोज निदान आठ ते दहा तास ज्या कॉम्पुटरसमोर
असतो त्याच कॉम्पुटरमध्ये असणाऱ्या माझ्या फाईलस् मी वर्षानुवर्षे उघडून बघितल्या नव्हत्या.
फोटोवरून आठवलं. पूर्वी कोडॅक कॅमेरा असताना तो घेऊन २४ किंवा ३६ फोटोंचा रोल खूप काळजीपूर्वक वापरून विचार
करून एकेक फोटो काढायला लागायचा. मग तो फोटो लॅब मध्ये डेव्हलप करायला द्यायला लागायचा. दोन दिवसांनी
फोटो प्रिंट होऊन आले की ते फोटो पाहणे हा घरात सोहोळा असायचा. ३६ पैकी ३६ फोटोज अगदीच क्वचितच व्यवस्थित
यायचे मग जे नीट एक्सपोज झाले नाही त्यांच्या निगेटिव्ह ट्यूबलाईट समोर धरून उगाच मला त्यातलं फारच कळतं हा
आविर्भाव तोंडावर ठेऊन त्या बघण्याचा अभिनय व्हायचा. ‘शी !! माझे फोटो नीट येतच नाहीत’ किंवा ‘नेमके डोळे
मिटले बघ मी या फोटोत’ वगैरे एक-दोन हळहळणारे डायलॉग असायचेच. एकंदरीतच त्या ३६ फोटोंच्या आजूबाजूला
पूर्ण घर एकत्र यायचं आणि फोटो काढतानाचा प्रसंग पुन्हा नव्याने अनुभवायचं.
आणि आता? आता कॅमेऱ्यात टिपलेले असंख्य फोटो, विडिओ तसेच न बघता, ‘नंतर शांतपणे बघू’ असं स्वतःला
आश्वासन देऊन मी कम्प्युटरमधे ढकलून देतो आणि कॅमेऱ्यातील मेमोरी कार्ड रिकामं करून पुढच्या फोटोंनी
भरण्यासाठी पुन्हा कॅमेऱ्यामध्ये सरकावतो. आम्ही घरच्या सगळ्यांनी मिळून आमचे फॅमिली फोटो किंवा विडिओ
शेवटचे कधी बघितले हे आठवावंच लागेल. कम्प्युटर साफ करायला बसलो तेव्हा लक्षात आलं की कित्येक फोटो,
विडिओ तर शूट केल्यानंतर मी बघितलेच नव्हते. त्या गुहेत अजून एक गोष्ट सापडली. मी पूर्वी अमेरिकेतून फॅक्स
मशीनवरून एक पत्र पाठवलं होतं घरी, त्याची डिजिटल प्रत मिळाली आणि लक्षात आलं जे फोटोंचं झालं तेच लिखाण
संस्कृतीचंही. मी माझं भाग्य समजतो की पत्र लिहिणं हा सोहळा मी माझ्या आयुष्यात अनुभवलेला आहे. अमेरिकेत असताना मी घरी पत्र लिहीत असे कारण कम्प्युटर नावाच्या जादूच्या दिव्यातले ई-मेल, व्हाट्स ऍप, चॅटिंग, विडिओ, कॉल, स्काईप असे जीन-राक्षस त्यावेळी अस्तित्वात आले नव्हते. एक पत्र भारतात १५-२० दिवसांनी पोहोचायचं आणि पत्रोत्तर तितक्याच कालावधीनंतर. पत्र मिळेपर्यंत पत्रातील बहुतांशी बातम्या शिळ्या झालेल्या असल्या तरी ते पत्र मात्र वारंवार वाचूनही ताजच असायचं. आणि पत्र लिहिताना तर माझं सगळं मनच शाईच्या थेंबा थेंबातुन कागदावर झरायचं.
ती पत्र लिहिताना जसं मन उचंबळून यायचं तसं ई-मेल लिहिताना होतच नाही कधी. आता तर पत्रही लिहिणं बंद
झालंय. का होत असेल असं? माझा उत्साह कमी झाला आहे की तंत्रज्ञानाने दिलेल्या डिजिटल सुबत्तेमुळे एक प्रकारचा
निष्काळजीपणा आलाय माझ्यात? की अध्यारूत धरायला लागलो आहे मी सगळ्या गोष्टींना? सधनता आली की
साधनं वाढतात पण साधना कमी होते आणि समाधान दूर जातं तसंच काहीसं डिजिटल सुबत्तेमुळे होत नाहीये ना माझं?
पूर्वी मित्र भेटला की बोलायला विषय असायचे, नवीन बातम्या असायच्या, किती बोलू किती नको असं व्हायचं. आता
मित्रानी काल सकाळी सुरणाची भाजी बनवल्याची आणि रात्री कांदाभजी खाल्याचीही बातमी फोटोसकट फेसबुकवर
पाहायला मिळते मग भेटल्यावर बोलणार काय? व्हॉट्सऍप वर ग्रुप बनवून दिवसरात्र किंवा रात्रीचा दिवस करून गप्पा
सुरु असल्यामुळे असेल का की आता कोणाकडे समाचाराला जावंसं वाटत नाहीये मला?. ‘अरे या बाजूला आलो होतो,
बऱ्याच दिवसात भेट नाही, म्हटलं बघूया आहेस का, म्हणून न सांगता आलो! ‘या प्रसंगातला आणि वाक्यातला स्नेह
दिवसभर चॅट करूनसुद्धा मिळत नाहीये मला! मोजक्या पण संगीतवेड्या रसिक श्रोत्यांसह, म्हणजे असे श्रोते की
ज्यांना टाळया नक्की कुठे वाजवायच्या हे कळतं आणि समेवर मान हलण्यासाठी दुसऱ्यांकडे पाहावं लागत नाही, अश्या
श्रोत्यांच्या सान्निध्यात कोणा पंडितजींचा किंवा उस्तादजींचा स्वरवर्षाव एखाद्या कलागारात ऐकण्याचा जो कैफ आहे
तो यु ट्युब च्या नळीतून कितीही संगीत ऐकलं तरीही चढत नाहीये मला! हल्ली बारा महिने कधीही आणि कुठेही
चकल्या मिळत असल्यामुळे अभ्यंग स्नानानंतर फराळ खाण्यातली अधीरता आता अनुभवायला मिळत नाही तसंच
डिजिटल सुबत्तेमुळे जगण्यातली उत्कंठा, अधीरता, औत्सुक्य संपत चाललंय असं होतं नाहीये ना माझं?
मी विचारात पडलो, स्वतःला चाचपलं, थोडं आतल्या बाजूला डोकावलो. लक्षात आलं की खरं तर मी आधुनिक युगाचा
भोक्ता आणि भक्त दोन्ही आहे. डिजिटल युगाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र आणि सकारात्मकच बदल घडवला
आहे हे मी मनापासून मानतो. आमच्यावेळचं पूर्वीचं कसं छान होतं पण आता सगळं कसं बिघडलंय असा सूर
लावण्याइतके डोक्यावरचे केस पांढरेही झाले नाहीयेत माझे अजून आणि बाहेर परिस्थितीही तितकी वाईट नाहीये असं
माझं प्रामाणिक मत आहे. मी माझं हे मनोगत जगभरातल्या माझ्या सुहृदांपर्यंत एका मिनिटात पोहोचवू शकतो ते ई-
मेल, व्हॉट्सऍप या जीन-राक्षसांमुळेच ना ! हवी असलेली माहिती अगदी क्षणार्धात गुगलमहाराज मला देतात ते
कशामुळे तर या डिजिटलीकरणामुळेच ना ? शाळेतले हरवलेले सवंगडी परत मिळाले ते फेसबुकच्या कृपेनेच ना ! हे जर
खरं आहे आणि या डिजिटल संपदेने मला सुसंपन्न नककीच केलं आहे हा जर माझा अनुभव आहे तर मग माझं चुकतंय
कुठे?
या प्रश्नाचं मला मिळालेलं उत्तर हे की माझं ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या उक्तीप्रमाणे होतंय. खूप सहज, खूप मात्रेत,
आणि त्यामानाने कमी खर्चात उपलब्ध झाल्यामुळे मी ही डिजिटल संपदा मला हवी तशी ओरबाडतोय. उपकरणं म्हणून
जी माझ्या हाती आली आहेत, त्यांनाच मी माझ्याच हाताने आत्मघाती शस्त्र बनवतोय. यावर उपाय म्हणजे आता मला
आवश्यकता आहे ती या डिजिटल सुबत्तेचा नीट विचारपूर्वक वापर करण्याची. मग विचार आला की मी माझ्या स्तरावर
काय करू शकतो. माझ्या जीवनात ही डिजिटल सुबत्ता योग्य पद्धतीने कशी वापरू शकतो? विचारांती काही उपाय
सुचले. उदाहरणार्थ डिजिटल फोटो उत्तम येतातच प्रश्नच नाही, लगेच पाहायलाही मिळतात पण म्हणून भारंभार न
काढता कोडॅक फिल्म प्रमाणे मोजकेच विचार करून काढले तर? एखादा दिवस ठरवून सगळ्या कुटुंबाने ते फोटो
टीव्हीवर एकत्र बसून पहिले तर? थोडा सीरिअलचा वेळ कमी करून हा आनंद नाही का घेऊ शकणार सगळं कुटुंब एकत्र
मिळून? मला व्हॅट्सऍप ग्रुप सोडायची गरजच नाही, पण मनाशी मुद्दाम ठरवून व्हॅट्सऍप ग्रुपवरचा माझा सहभाग
कमी करून माझा जो वेळ वाचेल त्या वेळात कधीतरी सहज त्या ग्रुपमधल्या एखाद्याबरोबर सहज बोलावसं वाटलं
म्हणून फोन नाही का मला करता येणार? फेसबुकचा वेळ दिवसातून एकदाच बजेट करून नाही का वापरता येणार?
गंमत म्हणून एखाद्या सुहृदाला पत्र लिहून ते स्कॅन करून ई-मेल करायला काय हरकत आहे? मी पुढाकार घेऊन,
निवडक श्रोत्यांचा ग्रुप करून, ठरवून एक दिवस सगळ्यांनी एकत्र येऊन यु ट्यूब वरचं एखादं अप्रतिम रेकॉर्डिंग मोठ्या
HD टीव्हीवर पाहायला, ऐकायला, सगळ्यांनी मिळून रसास्वाद घ्यायला काय हरकत आहे? असे अनेक छोटे छोटे उपाय
करून मी मला उपलब्ध असलेली डिजिटल संपदा पूर्वीइतक्याच उत्कटतेने, अधीरतेने, कैफाने उपभोगू शकेन. आणि
मला जेव्हा हे चांगलं साधायला लागेल त्यावेळी उपकरणांच्या गराड्यात राहूनही मी स्वच्छंदपणाने जगू शकेन.
माझं हे मनोगत ज्या माझ्या सुहृदांच्या वाचनात येईल त्यांना मी व्हॅट्सऍप ग्रुपवर इतका ऍक्टिव्ह नसण्याचं कारण
लक्षात येईल आणि त्यांना इतकीच विनंती आहे की कधीतरी माझा फोन अचानक खिशात वाजायला लागेल तेव्हा तो
उचला म्हणजे झालं…
ता. क. (ताजा कलम): त्या दिवशी अलिबाबाच्या गुहेत शिरल्यामुळे माझा कॉम्पुटर मला हवा तसा अजूनही आतून
स्वच्छ झालेला नाही हे इथे नमूद करतो.