
माझा एक जवळचा मित्र आहे. तो नावाजलेला कलाकारही आहे. आम्ही आमच्या आमच्यात वेगळे वागतो मात्र बाहेर
सर्वांसमक्ष मी त्याच्याशी वेगळा वागतो. एकदा त्याने मला प्रश्न विचारला की ‘आपण दोघेच असताना तू खूप मोकळा
वागतोस पण लोकांत असताना अंतर ठेऊन वागतोस असं का?’ मी त्यावेळी त्याला माझं मत व्यक्त केलं की प्रत्येक
व्यक्तीचं , प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक परिस्थितीत वागणं निराळं असणं आणि त्या व्यक्तीची, त्या नात्याची, त्या
परिस्थितीची आणि त्या वेळेची मर्यादा ओळखून वागणं हे ते नातं टिकून राहण्यासाठी आवश्यक असत. मी असं
केल्याने शक्यतो माझ्याकडून माणसं तुटली जात नाहीत. आणि समजा काही तुटलीच नाती तर मला शल्य बोचत नाही
कारण माझी मला खात्री असते की मी माझी मर्यादा ओलांडलेली नाही.’ माझी मीमांसा त्याला रुचल्यासारखी वाटली.
कारण त्यावर तो काहीच बोलला नाही. आमचा विषय तिथेच संपला पण माझ्या मनात मात्र एक विचार प्रक्रिया सुरु
झाली.
माझ्या व्यवसायाच्या कारणाने आणि कार्यक्रमांच्या
निमित्ताने माझी बऱ्याच नवीन माणसांशी ओळख होते. माणसांचे वेगवेगळे नमुने त्यानिमित्ताने पहायला अभ्यासायला
मिळतात.
प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे, परिस्थिती वेगवेगळी, पूर्वपीठिका (background) वेगवेगळी, आशा आकांक्षा वेगवेगळ्या,
सांपत्तिक स्थिती वेगवेगळी, विषयनिपुणता वेगवेगळी, थोडक्यात म्हणजे प्रत्येकच व्यक्ती वेगळी. त्यामुळे प्रत्येकाशी
वागण्याची पद्धतही वेगवेगळी ठेवावी लागते. आणि तसं ठेवणं योग्यही असतं. कारण एकाच पद्धतीनं सगळ्यांशी
वागणं हे प्रत्यक्षात अशक्यही आहे. आपली सगळीच नाती म्हणजे आई, वडील, नवरा, बायको, मुलं, काका, मामा,
मावश्या, मित्र, शेजारी, कामाच्या ठिकाणचे, समाजात असे अनंत लोक आपल्या आजूबाजूला असतात किंवा आपल्याला
भेटत असतात आणि जो तो आपापल्या पद्धतीने जगात वागण्याचा प्रयत्न करत असतो. बरंचसं वाचन, संतवचनांचा
विचार, समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक या सगळ्याचं परिशीलन करून माझ्यापुरतं, माझ्या व्यक्तिमत्वाला
साजेसं माझं जनात वागणं कसं असावं याचे माझ्यापुरते ठरवलेले
काही ठोकताळे आहेत. ते माझ्यापुरते असलेले ‘जनाचे श्लोक’ गद्य स्वरूपात मनात साकारले ते असे.
१. प्रयेकजण हा त्याच्या दृष्टिकोनातून बरोबरच असतो. त्यामुळे समोरच्याचा दृष्टिकोन बदलण्यापेक्षा आपला
दृष्टीकोन समोरच्याला समजावून देण्याचा, निदान नमूद करण्याचा प्रयत्न करणं अधिक सोपं आणि कमी कष्टाचं
असतं. हे मला लक्षात आलं आहे.
२. आपला दृष्टिकोन समजावून देत असताना समोरच्याने तो दृष्टिकोन मान्य केलाच पाहिजे ही अपेक्षा बाळगायची
नाही. त्याने आपल्या दृष्टीकोनातून विचार केला एवढंसुद्धा समाधान आपल्याला असू शकतं.
३. आपलं समोरच्याने मानलं नाही तर तेवढ्यापुरतं ते सोडून देऊन, त्या व्यक्तीविषयी कुठल्याही प्रकारचा आकस न
ठेवणे आणि आपल्या अहंकाराला खतपाणी न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणे. असा मी मनापासून प्रयत्न करायचा
आहे.
४. कुठलंही मत, विनंती, आठवण इत्यादी गोष्टी तीन वेळा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तीन वेळा सांगूनही समोरच्या
व्यक्तीला माझी गोष्ट लक्षात येत नसेल तर तीच गोष्ट तीनशेवेळा सांगूनही फरक पडणार नाही हे मला लक्षात आलं
आहे. समजणाऱ्याला एकदाच सांगून कळतं बाकीचे दोन प्रसंगही ‘माझ्या कडून पुरेसे प्रयत्न मी केले’ हे समाधान
मिळवण्यासाठी असतात. आणि माझ्या मते तीन पेक्षा जास्त वेळा एकच गोष्ट सांगायला लागली तर समोरच्याच्या
लेखी माझ्या मताला प्राधान्य नाही हे मान्य करावं आणि पुढे निघावं असं धोरण उत्तम हे लक्षात आलं आहे. झालेला
प्रसंग शक्यतो नंतर विसरून जावा हेही उत्तम, असंही लक्षात आलं आहे.
५. एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं स्पष्ट मत, मला मुद्दाम विचारल्याशिवाय सांगायच्या भानगडीत पडू नये.
जगाला शहाणपणा शिकवण्याचा मक्ता ना मला कोणी दिला आहे आणि तो स्वतःच घेण्याची ना माझी पात्रता आहे
आणि हे मनातल्या मनात मी स्वतःचच स्वतःला समजावलेलं केव्हाही उत्तम. पण कोणी मुद्दाम विचारलंच तर मात्र
स्पष्ट मत शक्यतो बोचणार नाही अशा भाषेत मांडण्याचा प्रयत्न करायचा. माझं स्पष्ट मत आवडलं नाही तर ते मी
स्वतःहुन न विचारता दिलेलं नसल्यामुळे दुसऱ्याचं मन दुखवण्याचं पाप मला लागणार नाही ही तरी खात्री असते.
६. दुसऱ्याचा दृष्टिकोन उघड्या दिलाने, मनाने आणि बुद्धीने ऐकण्याची तयारी ठेऊन माझं मत दुसऱ्या मताच्या
संदर्भाने तपासून बघण्याची तयारी ठेवायची. पटलं तेवढं आपल्या तब्येतीला साजेसं आत्मसात करायचं बाकी सोडून
द्यायचं. कारण यात स्वतःचं व्यक्तिमत्व अधिक परिष्कृत (refine) करणं हा उद्देश आहे. दुसऱ्याप्रमाणे वागणं किंवा
होणं हा उद्देश नाही.
७. प्रत्येक माणसाला त्याची स्तुती ऐकायला खूप आवडतं. म्हणून समोरच्या माणसातील स्तुती करू शकण्यासारखे
गुणधर्म शोधावे आणि त्याचं कौतुक करावं. मात्र कौतुक करत असताना तारतम्य बाळगावं हेही त्यावेळी लक्षात
ठेवायचं. जितके गुण उत्तम तेवढंच कौतुक करावं. कौतुक करण्यासारखं माझ्या दृष्टीकोनातून काही नाही सापडलं तर
मात्र गप्प बसावं.
८. कुठल्याही माणसाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही काहीही विचारू नये. दुसऱ्याने सांगितलंच तरी अधिक प्रश्न
विचारून खोलात शिरू नये. प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करावा. अगदीच वेळ आली कुणाच्या वैयक्तिक
आयुष्यावर चर्चा करायची तर मी फक्त श्रोता बनावं सल्लागार बनायला जाऊ नये. आणि स्वतःच्या वैयक्तिक
आयुष्याशी तुलना तर अजिबात करू नये.
९. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना सांगत बसू नये. आपल्याला वाटतं तितकं आपलं आयुष्य लोकांच्या
दृष्टीने रसपूर्ण नसतं आणि महत्वाचं तर नसतंच नसतं हे नेहेमी मी लक्षात ठेवायचं आहे. माझ्या वैयक्तिक
आयुष्याबद्दल लोकांना उत्सुकता असेलच तर जितकं विचारलं तितकंच सांगावं. प्रसंगानुरूप एखादा अनुभव सांगणं
वेगळं पण माझ्या जीवनातील बारीक बारीक गोष्टीबद्दल जाणून घेण्यात लोकांना फार स्वारस्य नसतं हे नेहेमी आपलं
आपणच लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा.
१०. असं म्हणतात की उत्तम प्रतीचे लोक कल्पनांची चर्चा करतात, मध्यम प्रतीचे लोक घटनांची चर्चा करतात आणि
कनिष्ठ प्रतीचे लोक माणसांची चर्चा करतात. तेव्हा शक्यतो नवीन नवीन कल्पनांची चर्चा करण्याचा शक्यतोवर माझा
प्रयत्न असावा. प्रत्येक माणूस कुठल्यातरी कौशल्यात प्रवीण असतो त्यासंदर्भात त्यातील कल्पनांच्या संदर्भात चर्चा
त्या माणसालाही आपल्याशी जोडते आणि आपणही आयतेच बहुश्रुत होतो हे मला कळलं आहे.माझ्या जीवनात
लोकांमध्ये वावरताना दशसूत्री असलेले हे ‘जनाचे श्लोक’ मी पाळण्याचा प्रयत्न करतो. कधी सफल होतात कधी पाय
घसरतोही. अर्थात पाय जेव्हा घसरतो तेव्हा या ‘जानाच्या श्लोकातील’ नवीन एक सूत्र मिळतं हेही तितकंच खरं..