
तीन चार दिवसापूर्वी एका कार्यक्रमासाठी मुंबईच्या बाहेर जायचं होतं. रस्ता माहिती नसल्यामुळे लगेच मॉडर्न ब्रह्मदेवाला म्हणजे गुगलला पत्ता विचारला आणि घरापासून मुक्कामापर्यंत जाण्याचा रस्ता सुद्धा. गुगलने मी कुठे आहे ते तर ओळखलंच पण माझ्या मुक्कामाला जाण्याचा सर्वात सोयीचा आणि कमी ट्राफिक असलेला रस्ताही दाखवला.
ईश्वराने माणसाचं जीवन सुखकर बनावं यासाठी जी साधन निर्माण केली त्यात हवा, पाणी, फळं, फुलं, औषधी वनस्पती, आणि आता गूगल अशा गोष्टी समाविष्ट होतात. सगळ्याच मुबलक आणि सगळ्याच फुकट. असो..
त्या गुगलमॅप बरोबर थोडा खेळायला लागलो. त्यात एक ‘अर्थ व्ह्यू’ नावाचा पर्याय असतो. त्यात थोड्या उंचीवरून एखादा भुभाग प्रत्यक्ष कसा दिसेल हे पाहता येतं. त्या मॅपकडे पाहताना मला एक गोष्ट लक्षात आली की अगदी माझी बिल्डिंग सुद्धा एका विशिष्ट उंचीवरून त्या मॅपमध्ये दिसते. झूम करून थोडं अधिक वर गेलं, उंची वाढवली तर माझी गल्ली दिसायला लागते, अधिक उंच गेलं तर माझा मोहल्ला, मग माझं गाव मग अक्खी मुंबई दिसायला लागते. अजून उंच गेलं की अक्खा महाराष्ट्र, मग माझा भारतदेश दिसतो आणि अधिक उंचीवरून आशिया आणि नंतर पूर्ण जग दिसायला लागतं. एवढंच कशाला अधिक उंचीवरून बघितलं की पूर्ण पृथ्वीही दिसते.
या खेळात एक गम्मत अशी लक्षात आली की जेवढी तुमची उंची वाढेल, तितकं तुमचं दृश्य व्यापक होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढी उंची वाढेल तेवढया सीमारेषा पुसट होत जातात. काही एका उंचीवर मराठी-अमराठी सीमारेषा पुसटते. अधिक उंचीवर गेल्यावर भारतीय-अभारतीय ही सीमारेषा पुसट होते. अधिक उंचीवर गेल्यावर तर देशांच्या सीमारेषाही पुसट होतात. आणि अंतराळातल्या उंचीवरून तर पूर्ण सस्यशामला वसुंधरा आपली वाटायला लागते असं अंतरळवीरही सांगतात.
या खेळातून मनाने बोध घेतला की उंची जितकी अधिक तितकं दृश्य विस्तीर्ण, तितका दृष्टिकोन व्यापक आणि मनाची विश्व कवेत घेण्याची क्षमताही वाढलेली असते. आणि मनाच्या एका विशिष्ट उंचीवर केवळ मानवतेचं भान उरतं. गूगल मॅप आपल्याला दृश्य तर दाखवू शकेल पण दृष्टिकोन आणि व्यापकता तर आपल्यालाच साधनेने वाढवायची आहे. कारण उंची जसजशी वाढत जाईल तसतसं मन व्यापक होऊ लागेल आणि एका विशिष्ट उंचीवर विश्वाचं आर्त माझ्या मनी प्रकाशेल आणि गुगल मॅप्सच्या पालिकडलं ब्रह्म दिसू लागेल कदाचित..