
खांब खांब खांबोळी
एकदा ट्रेन मधून दूरच्या प्रवासाला जात होतो. कामानिमित्त दौरा असल्यामुळे एकटाच होतो. माझ्या डब्यात माझ्या
कंपार्टमेंट मध्ये माझ्यासारखेच कामानिमित्त प्रवास करणारे इतर पाच प्रवासी होते. काही नोकरी करणारे काही
व्यावसायिक होते. पल्ला बराच लांबचा होता. हळू हळू परिचय व्हायला लागला, गप्पा व्हायला लागल्या. मला अशी
संभाषणं खूप आवडतात. नवीन छान माणसं भेटतात, त्यांचे अनुभव कळतात. आणि मुख्य म्हणजे मला माणसं
वाचायला मिळतात. माणसांच्या वाचनात मला पुस्तकाच्या वाचनाइतकाच किंबहुना थोडा अधिकच आनंद मिळतो.
एखाद्या माणसामधली एखादी गोष्ट, त्यांनी एखादा अनुभव, त्यांनी बोललेलं एखादं वाक्य काहीतरी अनमोल शिकवून
जातं आपल्याला विचार करायला भाग पाडतं. या सहप्रवाश्यांशी बोलताना एक लक्षात आलं की सर्वजण चांगल्यापैकी
स्थिरावलेले, सधन होते. त्यांच्या त्यांच्या नोकरी व्यवसायात अनुभवाने संपन्न झालेले. गप्पात एक गोष्ट प्रकर्षाने
जाणवली की जीवनाच्या या टप्प्यावर त्यांना बदल हवाय. आर्थिक स्थिरता आली आहे. तसं जीवन सुरळीत सुरु आहे.
जीवनांत फार वेगळं असं काहीच घडत नाहीये. दररोज ‘मागील पानावरुन पुढे चालू’ हीच अवस्था कमी अधिक फरकाने
त्यांची सगळ्यांचीच झाली आहे. काहीतरी बदल हवाय पण तो काय हे कळत नाहीये.
मला आठवलं आम्ही आमच्या लहानपणी एक खेळ खेळायचो. त्याचं नाव होतं ‘खांब खांब खांबोळी’. आमच्या
घरासमोरच्या अंगणात दोन नारळाची झाडं, दोन तीन खांब, एक दोन अशोकाची झाडं अशी झाडं होती. आम्ही त्या
सगळ्यांचा उपयोग आम्ही खांब म्हणून करत असू. तो खेळ साधारण असा होता की जेवढे सवंगडी जमलेले असायचे
त्यात एक मध्ये असायचा आणि बाकीच्यांनी एक एक खांब पकडायचा. आणि मग प्रत्येकाने आपला खांब सोडून दुसऱ्या
खांबाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करायचा आणि तेवढा वेळात मधल्या मोकळ्या भिडूने तुमचा खांब पकडला तर तुम्ही
आउट आणि मग जो आउट होईल त्याने मध्ये यायचं आणि इतरांचा खांब पकडायचा प्रयत्न करायचा. या पद्धतीने जो
जितक्यावेळा खांब बदलेल तेवढे त्या भिडूंचे गुण वाढत जायचे. खेळ थांबायच्या वेळी ज्याचे गुण ज्यास्त तो जिंकला.
खरं पाहता खांब तेच होते. तिथेच होते. ते बदललेच नाहीत कधी. आणि प्रत्येक डावात आम्ही त्याच खांबांभोवती खेळत
असून सुद्धा प्रत्येकवेळी तो डाव नवीन वाटायचा. आऊट न होता आपले खांब बदलत राहणं हाच या खेळाचा गाभा होता.
आणि हातचा खांब सोडून देऊन दुसरा हाती लागेपर्यंत त्या मधल्या धावपळीत, त्या अनिश्चिततेत, दुसऱ्यापेक्षा अधिक
चपळाईने आपला पुढचा खांब मिळ्वण्यात त्या खेळातला आनंद दडलेला होता.
विचार करता लक्षात आलं की लहानपण मागे सुटतं पण खांब खांब खांबोळीचा खेळ तसाच सुरु राहतो नोकरी-व्यवसाय,
घर, गाडी, पगार, नफा-तोटा अशासारख्या खांबांभोवती हा खेळ सुरु असतो
वर्षानुवर्षे याच खांबांभोवती आयुष्य फिरतंय. कधी नवं घर, कधी नवी गाडी, कधी प्रमोशन, कधी परदेवारी, कधी नवीन
नोकरी तर कधी नवीन व्यवसाय किंवा व्यवसायाचा विस्तार हाच काय तो त्या खांबात होणारा बदल. या बदलांमुळे काही
दिवस जातात नवलाईचे, आनंदाचे
पण पुन्हा ‘मागच्या पानावरुन पुढे’ जाणं सुरु होतं. हा खेळ बहुतांशी मंडळी आउट होईपर्यंत खेळत राहतात आणि जीव
रमवतात आयुष्यभर याच खांबांच्या अवतीभवती. हे सगळे खांब जीवन सुरळीत, सुरक्षित आणि लौकिकार्थाने सुखाचं
होण्यासाठी आवश्यक आहेतच या बद्दल वाद नाही. पण त्या खांबांभोवती सुरु असणाऱ्या या खांब खांब खांबोळी खेळाची
मजा येत नाही कारण या खेळातला संघर्ष, चुरस संपलेली असते. मला असं लक्षात आलं की ट्रेन मधल्या माझ्या
सहप्रवाश्यांची व्यथाही थोडी अशीच काहीशी होती.
मी विचार करू लागलो की काय फरक झाला लहानपणीच्या खेळात आणि आताच्या? का खांब खांब खांबोळीचा इतका
साधा खेळ आम्ही लहानपणी बेभान होऊन खेळायचो? आणि आता त्या खेळात मजा येत नाहीये. असं का व्हावं? मग
लक्षात आलं की खांब महत्वाचे नाहीत तर खेळ महत्वाचा आहे हेच विसरलोय. लहानपणी ते खांब आम्हाला खेळापुरतेच
आपले वाटायचे बाकी फार अपेक्षा त्या खांबांकडून आम्हाला कधीच नव्हती. खेळ संपला की त्या खांबांना विसरूनही
जायचो आम्ही. दुसरी गोष्ट की खेळाची मजा खांबांवर अवलंबून नव्हतीच मुळी. खेळाची खरी मजा एक खांब सोडून
दुसरा मिळेपर्यंतंच्या जाणाऱ्या मधल्या काही क्षणांच्या संघर्षात आणि अनिश्चिततेत होती. खांब हाती लागला या पेक्षा
तो खांब मिळवण्यासाठी जी चपळाई केली ती सफल झाली याचा आनंद जास्त होता. मग मुद्दा लक्षात आला. खांब खांब
खांबोळी या खेळाचीच काय पण कुठल्याही खेळाची मजा ही अनिश्चिततेत आहे. ध्येय हस्तगत होईपर्यंत होणाऱ्या
संघर्षात आहे. ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी त्या संघर्षावर मात करण्यासाठी आपण आपल्यात निर्माण केलेल्या कौशल्यात
आहे.
हे तत्व लक्षात आल्यावर माझ्या दैनंदिन जीवनात मी माझ्यासाठी काही दैनंदिन ध्येय ठरवू लागलो. ती साध्य झालीच
पाहिजेत असा अट्टाहास करू लागलो. तसंच कमी कालावधीत साध्य होणार नाही पण ज्याचा दररोज आनंद घेता येईल
असं काहीतरी करायचं ठरवलं. मग ते स्वयंपाकासारखं नवीन काही कौशल्य असेल, एखादा दुसऱ्या व्यक्तित भावलेला
आणि मनापासून आपल्यात बाणावा असं ज्याबद्दल वाटतं असा एखादा गुण असेल. एखादी नवीन परदेशी भाषा
असेल, एखाद नवीन वाद्य असेल, एखादा सामाजिक प्रकल्प असेल, एखादा नवीन संकल्पनेवर आधारित कार्यक्रम
असेल, एखाद्या मोठ्या दासबोधासारख्या सद्ग्रंथाचं परिशीलन असेल, एखाद्या माहित नसलेल्या ठिकाणाची कुठलंही
पूर्वनियोजन न करता केलेली सैर असेल किंवा असं काहीही.
असं केल्यामुळे जीवनातलं स्थैर्य न बिघडवता मला थोडा संघर्ष, थोडी अनिश्चितता दैनंदिन जीवनात अनुभवता येऊ
लागली आहे. आणि या मुळे दैनंदिन आयुष्य अधिक रसपूर्ण, अर्थपूर्ण झालं आहे. त्या ट्रेन मध्ये माझ्याबरोबर प्रवास
करणाऱ्या माझ्या सहप्रवाश्यानी त्यांचा प्रश्न कसा सोडवला मला माहित नाही. पण ‘मागच्या पानावरुन पुढे’ च्या
चक्रातून मी तरी सुटलोय आणि लहानपणीइतकंच भान हरपून माझ्या सध्याच्या जीवनातील ‘खांब खांब खांबोळी’
खेळतोय हे मात्र नक्की.