
माझ्या ओळखीचं एक दाम्पत्य आहे. त्यातील श्रीमान रात्री झोपल्यावर खूप घोरत असत. इतकं की त्या घोरण्यामुळे श्रीमतींना झोपणं मुश्किल होऊन जात असे. बरेच दिवस त्या दांपत्याने या समस्येवरचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. घोरण्यावरची औषध झाली, नाकाला लावायची क्लिप झाली, कुशीवर निजण्याची सवय लावायचा प्रयत्न झाला पण सर्व उपाय थकले. एक दिवस अचानक गर्मीच्या दिवसांमध्ये एका उकाड्याच्या दिवशी त्यांनी त्यांच्याकडील एक कुलर थंड हवा यावी म्हणून रात्री निजताना लावला. तो कुलर खरा खूप गोंगाट करत होता पण फारच उकडत असल्यामुळे शेवटी तो गोंगाट सहन करायचा असं ठरवून तो कुलर लावून ते दाम्पत्य झोपी गेलं. कुलरने थंडावा किती दिला असेल तो असेल पण दुसऱ्या दिवशी श्रीमती मात्र खूप खुश होऊन उठल्या कारण त्या कुलरच्या एका लयीत होत असलेल्या आवाजामुळे त्या आवाजात श्रीमानजींचं घोरणं त्यांना रात्रभरात फारसं ऐकू आलं नाही आणि खूप वर्षांनंतर त्यांना छान झोप लागली होती. गम्मत म्हणजे त्या दिवसापासून थंडी, वारा, पाऊस, उकाडा अगदी एअर कंडिशनर जरी असला तरी वर्षाचे ३६५ दिवस तो कुलर थंड वारा घालण्यासाठी नव्हे तर घोरण्याला झाकोळून टाकेल असा आवाज करण्यासाठी त्यांच्या बेडरूम मध्ये नेहेमी सुरु असतो.
मी हा किस्सा जेव्हा ऐकला त्यावेळी खदखदून हसलो. कुलरचा असा उपयोग कोणी करत असेल असं माझ्याच काय त्या कुलरची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्याही स्वप्नात आलं नसेल. मी हा किस्सा जेव्हा माझे मार्गदर्शक तत्वज्ञानी स्नेही ( Friend Philosopher Guide) ज्यांना मी काका म्हणतो, त्यांना सहज सांगितला. त्यावेळी काकाही मनापासून हसले आणि त्यावेळी त्यांनी मला एक सुंदर संकल्पना सांगितली. ते म्हणाले, ” राजेंद्र, आपल्या आयुष्यातही आपण खूप वेळा असंच करतो. आपल्या आयुष्यातही खूप प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचे आक्रोश मनात होत असतात. पण ते आक्रोश ऐकू येऊ नयेत म्हणून आपण असे अनेक कुलर आपल्या आजूबाजूला निर्माण करत असतो आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवत असतो की जेणेकरून ते मनातले आक्रोश आपल्या जाणिवेपर्यंत पोहोचणार नाहीत. कुलरच्या मोठ्या गोंगाटामुळे जसा घोरण्याचा लहान आवाज दबला जातो तसेच आयुष्यातला एक गोंगाट ऐकू येऊ नये म्हणून तो आवाज दबला जाईल असा त्यापेक्षा मोठा गोंगाट करणाऱ्या गोष्टी आपण आयुष्यात करू लागतो. पण त्यामुळे आयुष्यात गोंगाटच वाढत जातो आणि असे कितीही गोंगाट वाढवले तरीही त्यामुळे मुळात मनात आक्रोश निर्माण करणारे प्रश्न सुटत नाहीत. महत्वाचं हे आहे की आयुष्यात आपणच निर्माण केलेले हे गोंगाट हे काही काळासाठी जरी उपाय म्हणून योग्य वाटले तरी आपले मुळचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्या साठी लागणारी शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक तयारी आचार्य पतंजलीच्या अष्टांगयोगाचा अभ्यास करून, श्रीमदभगवदगीतेचा अभ्यास करून किंवा संत मंडळींच्या सद्ग्रंथांचं परिशीलन करून करता येऊ शकते”
काकांची कुलरच्या उदाहरणावरून मांडलेली संकल्पना मला खूप आवडली आणि मग विचार करू लागलो. खरंच माणूस किती असे मानसिक गोंगाट स्वतःहुन निर्माण करतो !. कौटुंबिक प्रश्नांच्या आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून स्वतःला ऑफिसच्या कामात बुडवून टाकणे. ऑफिसच्या कामाचा ताण सहन होत नाही म्हणून नानाविध व्यसनात स्वतःला विसरणे, घरात शांती मिळत नाही म्हणून बाहेरच्या मनोरंजनात मन गुंतवून ठेवणे या सगळ्या गोष्टी म्हणजे एक गोंगाट, एक आक्रोश दाबण्यासाठी निर्माण केला गेलेला अधिक मोठा गोंगाटच नाही का? हे म्हणजे छोटं कर्ज फेडण्यासाठी अधिक व्याजाचं दुसरं मोठं कर्ज काढण्यासारखंच आहे. शेवटी सगळं कर्ज आपल्यालाच फेडायचं आहे. या धोरणामुळे तात्पुरती सुटका मिळेल प्रश्नातून पण यामुळे अधिक मोठे प्रश्न निर्माण होतात हे ही तितकंच खरं.
मग मी स्वतःला प्रश्न विचारला की माझ्या स्तरावर मी हे गोंगाट कसे कमी करायचे? तर उत्तर मिळालं वजाबाकीच्या गणितातून. जी जी कृती मला गोंगाट आहे हे जाणवेल ती ती माझ्या आयुष्यातून वजा करायची. मग माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी तपासून पाहायला लागलो. मी एखादी कृती ही काहीतरी लाभ मिळवण्यासाठी, काहीतरी सिद्ध करण्यासाठी, काहीतरी प्रदर्शन करण्यासाठी करत असेन तर तो आयुष्यात सुरु केलेला गोंगाट आहे असं आता मला लक्षात यायला लागलं आहे, ते वजा करायची आहे. कर्तव्य म्हणून व्यवसायात नफा मिळवणे हे आवश्यक असलं तरी वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी, केवळ कुणाच्यातरी पुढे जाण्यासाठी नानाविध क्लुप्त्या करून धावत सुटणे म्हणजे गोंगाट आहे हे कळू लागलं आहे, ते वजा करायचं आहे. वाट्याला आलेल्या भूमिकेसाठी आवश्यक कर्तव्य पार पडत असताना स्वान्तसुखाय असणारी कृती सोडून इतर कुठलीही कृती हा गोंगाट आहे हे लक्षात येऊ लागलं आहे, ते वजा करायचं आहे. अशाप्रकारच्या गोंगाट करणाऱ्या अनेक गोष्टी हळू हळू लक्षात येत आहेत, त्या हळू हळू आयुष्यातून वजा करायच्या आहेत. निदान तसा प्रयत्न तरी करायचा आहे.
गम्मत अशी आहे की आपली चप्पल तुटलेली असली की दुसऱ्यांच्या चपलांकडे अधिक लक्ष जातं आणि आपल्या तुटलेल्या चपलेचेच विचार मनात घोळत राहतात. तसंच ही आयुष्यातल्या गोंगाटांची संकल्पना लक्षात आल्यावर आता आजूबाजूला किती गोंगाट असतात आणि आपण किती गोंगाटात वावरत होतो हे अधिक प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. आता निदान त्या आवाजांना दाबून टाकण्यासाठी अधिक मोठे आवाज आपण स्वतःहुन करायचे नाहीत याची खबरदारी आपण घ्यायची हे मात्र मी त्या कुलरच्या उदाहरणावरून शिकलो. आणि त्या दाम्पत्याचा घोरण्याच्या आवाजाचा प्रश्न कुलरच्या अधिक मोठया गोंगाटामुळे कायमचा सुटला असला तरी ते उदाहरण म्हणजे नियम सिद्ध करणारा अपवादच होता हे नक्की…