कुटुंब आणि नॉनस्टिक तवा- २३ ऑक्टोबर २०१७

/ / marathi

भारतीय खाद्यपरंपरेत दाक्षिणात्य पदार्थांचा एक वेगळा तोरा आहे आणि इडली, वडा, डोसा ह्या त्रिमूर्तीचं तर भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेशाइतकं अढळ स्थान आहे असं मला नेहेमी वाटत आलं आहे. साधारणपणे इडली करणं त्यामानाने सोपं, वडा थोडा अधिक परीक्षा घेणारा आणि डोसा म्हणजे हात बसलेला नसेल तर पिठल्यापासून ते पापडापर्यंत कुठलंही रूप घेणारा. डोसा उत्तम करता येणारा हा साधारणपणे उच्च दर्जाचा पाकशास्त्री असतो असा माझा ठाम विश्वास आहे.

डोसा बनवताना पाहिलं नं की मला एखाद्या कुटुंबाकडे पाहिल्यासारखं वाटतं. त्यात पीठ म्हणजे घरातल्या कर्त्या मुलासारखं, सासू विस्तवासारखी आणि सून तव्यासारखी. या तिन्हींच मनोमिलन जमलं असेल तरच उत्तम डोसा घडू शकतो आणि मग अशा जमलेल्या डोशाला बाहेरच्या सांबार चटणीचीही गरज नसते चव आणण्यासाठी. पण या तीनपैकी एक जरी काही कारणांनी रुसलं तर डोशाचा तोंडवळा कुठल्या वळणावर जाईल हे सांगता यायचं नाही. आणि डोसा बिघडला तर तव्याला काय किंवा विस्तवाला काय काहीच फरक पडत नाही, कुचंबणा होते ती पिठाची. मग इतकंसं तोंड करून बसून राहतो एकतर गोळा होऊन तरी, तुटून अस्ताव्यस्त होऊन तरी नाहीतर करपून तरी. बाकी तेल, तूप वगैरे मंडळी ही सासऱ्यांसारखी या तिघांच्या मनोमिलनाला खुसखुशीत करण्याइतपतच सक्षम. आणि अगदीच डोसा बिघडला तर तेल तुपाप्रमाणे त्यातल्यात्यात त्या पिठाला खाण्यायोग्य खमंग करण्याचा प्रयत्न करणारी, धीर देणारी. शक्यतो तव्याबरोबर कामापुरता संबंध ठेवणारी आणि विस्तवाशी प्रत्यक्ष संपर्क संपूर्णपणे टाळणे हे श्रेयस्कर मानणारी कारण त्यामागे असते विस्तवाशी संबंध आला तर त्यांचाच भडका उडेल याची त्यांना असलेली खात्री.

या कुटुंबातला कर्ता मुलगा आणि सासू म्हणजे अनुक्रमे पीठ आणि विस्तव हे दोघेही पिढयानुपिढया फारसा गुणात्मक बदल न झालेले आणि आपल्या घराण्यातले गुणधर्म आणि कुळधर्म पिढ्यानपिढ्या राखून ठेवलेले. पण तवा मात्र सुनेसारखा प्रत्येक पिढीनुसार बदललेला. वेगवेगळ्या आकाराचा, धाटणीचा, खोलीचा, वेगवेगळ्या धातूंचा, वेगवेगळ्या जाडीचा, कधीतरी कडाप्पा या दूरच्या नातेवाईकालाही मानलेला भाऊ म्हणून आपल्या कुटुंबात सामावून घेणारा. दुसऱ्या घरातून येऊन सासरच्या घराण्यात मिसळून जाणाऱ्या एखाद्या सुशील सुनेसारखा. घरात नवीन सून आली की तिने नवीन घरात लवकरात लवकर सामावून गेलंच पाहिजे अशी अपेक्षा असते अगदी नवीन ताव्यासारखीच. भावनिक पातळीवर सगळ्या नात्यांमध्ये पटकन लिप्ताळली तर जशी ती चांगली सून मानली जाते तसंच तव्यांनाही सगळ्या पदार्थांच्या घडणावळीत उत्तम परफॉर्मन्स लगेच द्यावाच लागतो तरच तो चांगला तवा मानला जातो. तवेही सुनांसारखे तेलाने ओशट होतात, तुपाने सुवास देतात. ते करपतात, खरवडले जातात, खूप वापरले गेल्यावर झिजतात, आणि क्वचित वेळी पुरेसे न वापरल्याने गंजतात देखील. एवढंच कशाला त्यांना नुसतंच उगाच तापवलं तर लाल होतात किंवा कधीतरी धूरही काढतात. अर्थात तापवल्यावर काय होईल हे त्या तव्याची जडण घडण कशी झाली आहे यावरही खूप अवलंबून असतं म्हणा. पण हेही खरं की डोसा चांगला होण्यासाठी हेच तवे पिठाला आधार देतात, विस्तवाची आवश्यक तेवढीच धग डोशापर्यंत पोहोचवतात त्यांना कुरकुरीत खमंग बनवतात, आणि कधीतरी तवे जास्त गरम झाल्यावर स्वतःवर पाणी मारून घेऊन स्वतःला थंडदेखील करतात.

पण हल्ली सगळंच बदलतंय तसे तवे देखील. हल्ली नॉनस्टिक तवा नावाचं प्रकरण रुळायला लागलंय. सुबक, सुटसुटीत, अत्याधुनिक पद्धतीने घडलेले, मल्टिलेअर, मल्टिपर्पज, निर्लेप, नॉनस्टिक तवे. हे तवे ना स्निग्धतेने ओशट होत, ना तुपाने सुगंधित होत, ना खरवडायची गरज, ना झिजण्याचा प्रश्न, ना कधी गंजत, ना करपत ना तापून लाल होत. बाकीच्यांचं ठीक आहे पण दुर्दैवाने डोशाचं पीठही चिकटत नाही याच्यावर. होतात डोसे यावर, नाही असं नाही. पण नॉनस्टिकवर बनलेला डोसा हा गुणात्मकतेच्या दृष्टीने जरी डोसा या नावाशी मिळता जुळता वाटला तरी चवीच्या बाबतीत त्याचं पतमानांकन जेमतेमच असतं ही देखील बाब तितकीच खरी. पोट भरतं कसंतरी अशा डोशांनी पण मन नाही. मग अशा डोशांना चव आणण्यासाठी बाहेरच्या चटणी सांबाराची गरज पडते. नॉनस्टिक तव्यावरचे डोसे खाताना काहीतरी निर्जीव पदार्थ खातोय असंच वाटतं नेहेमी. बरं मला सांगा की जर पीठ तेच, विस्तव तोच, तेल तूप तेच पण तरी डोसा बेचव लागत असेल तर अंगुलीनिर्देश तव्याकडॆच होणार नाही का?

अर्थात बदलेल्या जीवनमानात डोसे बिघडायला लागले तर दोष पूर्णपणे तव्याचाही नाही हेही तितकाच खरं. आपल्यालाच इन्स्टंट हव्या आहेत गोष्टी. आपल्यालाच सुबक सुटसुटीत तवे हवे आहेत ते घराच्या स्टेटस आणि स्वैपाघराच्या इंटिरिअरशी मॅच होतील असे. त्यावर डोसे चांगले होतात की नाही हा प्रश्नच अशावेळी गौण ठरतो. आता तसंही चवीढवीने खाण्यासाठी वेळ आहे का आपल्या कुटुंबांकडे? चांगला डोसा होण्यासाठी साधे तवे एका विशिष्ट तापमानावर ठेवावे लागतात, त्या प्रक्रियेसाठी लागणारा धीर आहे का आपल्याला? स्निग्धतेने ओशट झालेल्या तव्याला काळजीपूर्वक स्निग्धता कमी न करता फक्त ओशटपणा घालवून स्वच्छ करून ठेवण्यासाठी लागणारं कौशल्य आज आहे आपल्याकडे? मग आपणच आपल्या जीवनशैलीला साजेसे नॉनस्टिक तवे आणले असले तर मग डोशाला चव नाही ही तक्रार करण्याचा अधिकार आपल्याला राहत नाही.

अर्थात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे की काळाच्या ओघात सगळंच बदलतंय. डोशाच ओलं पीठ आयतं मिळायला लागलंय दुकानात. परिस्थिती इतकी बिकट आहे की डोशाच्या पिठात उडिद डाळ आणि उकडे तांदूळ हे घटक असतात हेही बऱ्याचशा लोकांना हल्ली माहीत नसल्याचं धक्कादायक सत्य मला नुकतच कळलं आहे आणि त्या धक्यातून मी अजूनही सावरलेलो नाही. आता विस्तवानेही कात टाकली आहे आणि इंडक्शन स्टोव्हच्या रूपात अगदी चटकाही न देणारा विस्तव आता मिळतो. तेल, तुपाची जागा आता बटर चीज ने घेतली आहे मग तवा नॉनस्टिक असला तर काय झालं. बदलत्या काळात, आधुनिक काळात सगळ्या गोष्टी जर बदलत आहेत तर नवीन काळात डोशाचंच रूपडं बदलून इंडक्शन शेगडी, आयतं पीठ आणि नॉनस्टिक तवा यांचं सुंदर मनोमिलन घडेल असाच एखादा पदार्थ रूढ करायला काय हरकत आहे कारण परंपरागत डोसा खाण्याचा अट्टाहास करणं यापेक्षा सद्यपरिस्थितीत आनंदात गोडीगुलाबीने सहभोजन होणं अधिक महत्वाचं नाही का?…

वैधानिक इशारा/डिस्क्लेमर: हे संपूर्ण विचार रूपकात्मक मांडले आहेत आणि संपूर्णपणे काल्पनिक आहेत. कुठल्याही कुटुंबाशी, कर्त्या मुलाशी, सासू, सुनेशी, सासऱ्यांशी, किंवा पिठाशी, विस्तवाशी, तव्याशी अथवा तेल तुपाशी आणि या लेखात मांडल्या गेलेल्या विचारात साधर्म्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा आणि त्याकडे कानाडोळा करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *