किंमत मूल्य आणि अमूल्य- २६ सप्टेंबर २०१७

/ / marathi

माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनात भाग घेण्याचा योग आला. आमची उत्पादनं तिथे विक्रीला असायची. तिथे येणाऱ्या ग्राहकाला आमच्या उत्पादनांबद्दल माहिती द्यायचो आणि इतर काही शंका असतील तर त्यांचीही, त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तरं देण्याचा प्रयत्न करीत असू. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात काही वर्ष मी स्वतः स्टॉलवर उभा राहून विक्री करत असे, ग्राहकाशी बोलत असे. त्यानिमित्ताने मनुष्यस्वभावाचे खूप कंगोरे जवळून पण त्रयस्थाच्या नजरेतून पहायला मिळाले. माणसांचे स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, एकाच गोष्टीकडे पाहण्याचा वेगवेगळ्या लोंकांचा वेगवेगळा दृष्टिकोन, वस्तूची किंमत आणि वस्तूचं मूल्य यातील फरकाचं लोकांचं आकलन, आणि त्याप्रमाणे ठरणारे त्यांचे खरेदीचे निकष या सर्वांचं जवळून निरीक्षण करायला मिळालं. आणि त्या निरीक्षणामधून किमती वस्तू निवडणारे लोक वेगळे असतात आणि मूल्यवान वस्तू निवडणारे लोक वेगळे असतात असं माझं अनुमान झालं. याचा परिणाम म्हणून साहजिकच आमच्याही बाबतीत उत्पादनाच्या किमतीपेक्षा उत्पादनाच्या मूल्याकडे आम्ही ग्राहकांना अधिक आकर्षित करायला लागलो. गंमत म्हणजे अलिकडल्या काळात “मूल्याधिष्ठित बाजारभाव” (value based pricing) हे संकल्पना समोर येत आहे त्यामागे थोड्या अधिक फरकाने हाच विचार असावा असं दिसतं. याचा खोलवर विचार करता असही लक्षात आलं की व्यवहार संपला की किमतीचं महत्व संपत पण मूल्याचं महत्व ती गोष्ट अस्तित्वात असे पर्यंत टिकून राहतं

किंमत आणि मूल्य यातील फरक मला स्वतःला लक्षात आल्यामुळे आता मी माझ्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट याच निकषावर तोलून पाहण्याचा प्रयत्न करत असतो कारण असं प्रकर्षानं जाणवलं आहे की माझ्या आयुष्यात, माझ्या आजूबाजूला, किमती गोष्टी जमवण्यात दंग असणाऱ्या व्यक्ती असण्यापेक्षा मूल्यवान गोष्टी जमवणारी, मूल्य जपणारी मंडळी असण्यात माझा अधिक उत्कर्ष आणि उद्धार आहे. माझ्याही बाबतीत, सुबत्ता, साधनसंपत्ती यावरून माझी किंमत ठरवून जवळ आलेल्या मंडळींपेक्षा माझ्या मूल्यांकडे बघून जवळ आलेले सुहृद आणि त्यांची मनं राखण्याकडे माझा मनाचा कल अधिक होऊ लागला आहे. आणि या दोन व्यक्तींस्वभावातील फरक कसा ओळखायचा तेही मी शिकलो आहे. मला लक्षात आलं आहे की मला नेहेमीच आवडेल ते बोलणारे माझी किमंत ठरवून जवळ आलेले असतात आणि मला जरी आवडलं नाही तरी जे योग्य आहे तेच सांगणारे जवळ आलेले असतात ते माझं आणि माझी मूल्य बघून.

किंमत आणि मूल्य यांच्यातला फरक नीट लक्षात आल्यामुळे आता माझं मन कपड्यांपेक्षा शालीनतेकडे अधिक आकृष्ट होऊ लागलं आहे. प्रसिद्धीपेक्षा सिद्धीमागे आकृष्ट होऊ लागलं आहे. संपत्तीपेक्षा सद्गुणांकडे आकृष्ट होऊ लागलं आहे. आता मन पेनांपेक्षा कवितेकडे, व्यासपीठापेक्षा सुरांकडे, आणि स्व-प्रदर्शनापेक्षा स्वाध्यायाकडे अधिक आकर्षित होऊ लागलं आहे.

मूल्याचा विचार करताना आणि मूल्यकेंद्रित जीवनशैलीचा विचार व्हायला लागल्यावर एका क्षणी जे अमूल्य तेही लक्षात यायला लागलं आहे. काहींची ना किंमत करता येत ना मूल्य ठरवता येत. उत्तम आरोग्य, जीवाला जीव देणारी माणसं, भाव, भक्ती, ज्ञान, दया , क्षमा, शांती, आणि अशा जीवनाच्या उच्च मूल्यांचं मूल्यमापन कसं होऊ शकेल? क्षण क्षणाने हातातून निसटून चाललेल्या आणि पुन्हा कधीही परत न मिळणाऱ्या वेळेचं मुल्यमापन कसं करणार?

या विचाराने खडबडून जागं झालेलं मन म्हणालं क्षणांचे तास, तासांचे दिवस, दिवसांची वर्ष करत काहीच वर्षांचं आयुष्य जेव्हा सरून जाईल त्यावेळी शेवटी देहाची किमंत शून्य झालेली असेल पण अनुसंधान आयुष्यभर टिकलं असेल तर शेवटच्या श्वासात सामावलेल्या समाधानाचं मोल अमूल्य असेल त्या क्षणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *