
आमच्या घराच्या स्वयंपाकघराला एक मोठी खिडकी आहे. त्या खिडकीच्या लगतच ओटा आहे. त्यामुळे खिडकीकडे तोंड करूनच सगळा स्वयंपाक होतो. त्या ओट्याच्या खिडकीबाहेर खूप झाडं आहेत आणि म्हणून तिथे सर्व प्रकारचे पक्षी येत असतात.
ही घटना कधी सुरू झाली कुणास ठाऊक पण स्वयंपाक करण्यासाठी ओट्याजवळ कुणी उभं राहिलं रे राहिलं की एक कावळा कुठूनतरी येऊन त्या खिडकीच्या ग्रीलवर येऊन बसतो. प्रत्येकवेळी तोच कावळा असतो असं ही नाही पण दिवसभरात फक्त एकच कावळा येतो. जे कोणी ओट्याजवळ उभं असेल त्या कडे काक दृष्टीने पाहतो. आधी काहीच आवाज करत नाही पण ओट्याशी असलेल्या व्यक्तीने जर त्याची दखल घेतली नाही तर मग त्याची कावकाव सुरू होते. गम्मत म्हणजे आई ओट्याशी उभी असली तर वेगळा थोडा आर्जव असणारा आवाज काढतो पण मी ओट्याशी असलो की माझ्याशी म्हणजे अरेरावीचाच आवाज. त्यातही कणकेचे किंवा पोळीचे दोन गोळे दिले की तो पहिला तिथेच बसून खातो आणि मग दुसरा घेऊन निघून जातो आणि तो कावळा किंवा इतर कुठलाही कावळा पुन्हा त्या दिवशी परत येत नाही. हे असं आमच्या घरी वर्षानुवर्षे सुरू आहे.
माझ्या चिकित्सक स्वभावामुळे मी त्या कावळ्यांबरोबर खूप प्रयोग केले.एकदा त्याला भाजलेल्या ब्रेडची कडा दिली. त्याने तिची चक्क चव घेऊन तो तुकडा चोचीतून जमिनीवर टाकून दिला. जी गत भाजलेल्या ब्रेडची तीच गत शिळ्या पोळीची. कणकेचा गोळा किंवा ताजी पोळी खाण्याची सवय झाल्यामुळे मी शिळी पोळी दिल्यावर त्याने चक्क मी त्याला जणू ‘बिलो डीग्निटी’ वागणूक दिल्याचा निषेध करण्यासाठी एक लूक दिला आणि तोंडात धरलेला तो शिळ्या पोळीचा तुकडा त्याने चक्क टाकून दिला. मग त्यावर मी त्याला ,”माज आलाय का ? जा काही मिळणार नाही आज” असं म्हणून उडवून लावला तर तोच कावळा त्याच्या झालेल्या या अपमानाचा बदला म्हणून सुरक्षित अंतरावर बसून माझ्याकडे बघत बघत खिडकीत ठेवलेल्या झाडाची पानं “खळ्ळ खट्याक’ करू लागला.
मी गम्मत म्हणून थोडा त्याच्या दृष्टीआड गेलो तर तो पुन्हा त्याच्या नेहेमीच्या पोळी खाण्याच्या जागेवर येऊन बसला आणि आईकडे पाहून पुन्हा मागणी करू लागला. त्याचा कावकावी स्वर आईशी बोलताना मऊ झाला होता. तेवढ्यात पुन्हा मी पुढे आलो तो त्याचा स्वर बदलून निषेध व्यक्त करून तो पुन्हा झाडा जवळ जाऊन पानं तोडू लागला. हा खेळ तीन चार वेळा झाल्यावर शेवटी ताज्या पोळीचा त्याचा दररोजचा खुराक झाल्यावरच तो निघून गेला आणि त्या दिवशीचं काकनाट्य संपलं.
प्रयोगाचा पुढचा भाग म्हणून मी त्याला भाकरी, कांदाभजी, पास्ता, नुडल्स वगैरे देशी आणि कॉंटिनेंटल पदार्थ देऊन पाहिले पण तो पठ्ठा कणकेचा गोळा किंवा ताज्या पोळीचा तुकडा सोडून इतर गोष्टीना चोच पण लावायला तयार नाही. त्यातही तो तेवढ्याच आकाराचा कणकेचा गोळा किंवा पोळी त्याच्याकडे भिरकावली तरच तो चोचीत पकडतो. स्पेसिफिकेशन मध्ये जरा फरक त्याला चालत नाही.
दुसरं निरीक्षण असं की इतर इतके पक्षी आणि खूप कावळे आजूबाजूला असून सुद्धा एका दिवशी एकच कावळा पोळी खायला येतो इतर एकही पक्षी अजून पोळी खायला आलेला नाही.
खरं तर हे काकपुराण पहावं तर अतिशय नगण्य वाटणारं. पण मी त्यातून काही निष्कर्ष काढले ते म्हणजे :
1. पूर्वी पारधी लोक पक्ष्यांशी बोलू शकतात या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. पक्ष्यांची स्वतःची एक भाषा असते आणि खूप निरीक्षण झाल्यावर ती भाषा त्यातील भावभावनांसह अवगत होऊन व्यक्त होऊ शकते यावर माझा या काकपुराणामुळे विश्वास बसला.
2. आपल्याला हवं ते मिळवायचं आहे त्यासाठी जर एक कावळा जर इतकी दृढता दाखवतो तर मी हा गुण माणूस म्हणून माझ्यात निर्माण करणं आवश्यक आहे.
3. स्वयंपाकघरात योग्य व्यक्तीजवळ मार्दवयुक्त आर्जवी स्वरात नीट मागणी केली तर गरम ताजी पोळी मिळते हे कवळ्यालासुद्धा कळतं.
4. कणकेचे दोन गोळे किंवा पोळीचे दोन तुकडे मिळाले की तृप्त असावं आणि हावरटपणा करू नये हे कावळ्यांनाही कळतं.
5. कावळ्यांनाही ‘खळ्ळ खट्याक’ तंत्र अवगत आहे पण त्याचबरोबर ते कधी आणि कुणाबरोबर वापरायचं याचाही विवेक आहे.
सध्या एक नक्की झालं आहे की कावळ्याला गुरू केल्यापासून कवळ्यांशी माझी मैत्री झाली आहे आणि मला ताजी गरम पोळी मिळण्याची शक्यता बरीच वाढली आहे.