
बोहारी नावाचा एक विशिष्ट समुदाय असतो. जुने कपडे किंवा जुनी भांडी घेऊन त्या बदल्यात नवीन वस्तू देणे असा
त्यांचा व्यवसाय असतो. लहानपणी आमच्या चाळीत अशीच एक बोहारीण येत असे. तिच्या बांबूच्या विणलेल्या
टोपलीत तवे, भांडी, पातेल्या, टोप, पोळपाट, लाटणी, डाव, ओगराळी, चमचे अशा नानाविध गृहपयोगी वस्तू असायच्या.
एखाद दुसरा ‘लेटेस आयटम’पण असायचा. प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या त्या चकचकीत वस्तू खरंच आकर्षक
दिसायच्या. बोहारीण येण्याचा दर दोन तीन महिन्याआड एक विशिष्ट दिवस ठरलेला असायचा. साधारण तिचं
गिऱ्हाईक म्हणजे चाळीतल्या ताई, माई, अक्का हीच मंडळी असल्यामुळे ती साधारण दुपारची निवांत वेळ बघून
यायची. बोहारीण आली आणि तिने तिच्या आवाजात ‘ए भांडीsssss यं !, ए भांडीवाली भांडीsssss यं !’ अशी विशिष्ट
स्वरात लांबूनच आरोळी दिली की बोहारीण आल्याची लगबग चाळीत सुरु व्हायची. ठरवून राखून ठेवलेली जुन्या
कपड्यांची बोचकी आणि जुनीपानी तुटलेली भांडी बाहेर पडायची. आणि मग सगळ्या ताई, माई अक्का एका
कुणाच्यातरी दाराशी एकत्र यायच्या आणि तिथे ही ‘एक्सचेंज ऑफर’ ची जत्रा भरायची. या बोहारणी पण हुशार असतात.
त्या प्रत्येक घरापाशी न जाता सगळ्या ताई, माई, अक्कांना एकाच ठिकाणी बोलावतात. कारण एक तर त्यांची प्रत्येक
दाराशी जाण्याची दगदग वाचते आणि एखाद्या भांड्यासाठी त्या ताई माई, अक्कांमध्ये स्पर्धा लावून देणे बोहारणीला
सोपं पडत असं माझ्या लक्षात आलं होतं. आणि यामुळे एखाद्या नवीन भांड्यासाठी जास्त कपडे किंवा चांगली साडी
किंवा वजनदार जुनं भांडं तिला हस्तगत करता यायचं हेही माझ्या चाणाक्ष बालबुद्धीला उमगलं होतं. गम्मत म्हणजे
‘मागच्यावेळचा तुझा स्टीलचा डबा दोन आठवड्यात फाटला आणि वाया गेला’ अशी तक्रार करणारी एक माई, या वेळी
तरी ती चांगली वस्तू देईल, या आशेवर तिच्या अजून एका चांगल्या साडीसह एक्सचेंज ऑफर साठी तयार असायची.
एका गोष्टीबाबत मात्र मला नेहेमी आश्चर्य वाटे की जुनी पण अगदी चांगल्या स्थितीतली साडी जरी बोहारणीला दिली
तरी, कुठल्याच साडीने तिचं समाधान होत नसे आणि ‘ताई जरा बरी साडी काढा की, म्हणजे तुम्हाला पन जरा चांगलं
भांड मियेल’ अशी तिची नेहेमीच तक्रारवजा विनंती असे. आयुष्यात एखादवेळा तरी, ‘वा ताई, काय छान साडी दिल्ये
तुम्ही !! हे घ्या माझ्यातर्फे तुम्हाला अजून एक कढई देते’ असा संवाद एखाद्या बोहारणीकडून ऐकला तर मी भर चौकात
जाहीर सत्कार करायला तयार आहे त्या बोहारणीचा. पण अजून तरी तो योग आलेला नाही. तसंच बोहारणीविषयी दुसरी
कुतूहलाची गोष्ट म्हणजे तिचं बिझनेस मॉडेल. जुने कपडे, साड्या आणि किटलेली तांबे-पितळ्याची भांडी घेऊन ही
बोहारीण नव्या चकचकीत वस्तू एक्सचेंज मध्ये कसं काय देऊ शकते हे बालबुद्धीला न सुटलेलं अगम्य कोडं होतं. ती
जुन्या वस्तू का घेते आणि नवीन चकचकीत वस्तू देण्यात तिचा काय फायदा हे कळायचंच नाही. तिला बिझनेस
कळतच नाही असं मी ठरवून टाकलं होतं माझ्या मनाशी.
आता मात्र कळतंय की ती बोहारीणच सर्वात चांगला बिझनेस करत होती. क्षुल्लक म्हणून जे टाकलं जात होतं त्याची
खरी किंमत तिलाच कळत होती. किटलेली असली तरी तांब्यापितळ्याच्या भांड्याची किंमत तिलाच माहित होती. नवीन
पॉलीस्टरच्या चकचकीत साडीपेक्षा जुनी रेशमी साडी अधिक मूल्यवान आहे हेही तिला माहित होतं. मला असं वाटलं की
अमेझॉनच्या जमान्यात बोहारणी हल्ली अस्तित्वात नसतील पण थोडा खोलवर विचार केला तर लक्षात येतंय की उलट
खूप बोहारणी दररोज घरी येत असतात आपल्या. आपण स्वतः अगदी बोलावणं करून घरी घेऊन येतो त्यांना. एक
गुगल नावाची बोहारीण येते. आपल्याला एक फुकट ई-मेल देते आणि आयुष्यभरासाठी अंकित करते आणि आपली
खडानखडा माहिती गोळा करून त्याच्या आधाराने जाहिराती आपल्या डोक्यावर मारते, जाहिरातदाराकडून पैसे घेऊन.
एक फेसबुक नावाची बोहारीण येते आपलेच फोटो, माहिती, सगळं सगळं आपल्याचकडून गोळा कडून आपल्या
मित्रमंडळींनाच फुकट दाखवते आणि त्याबदल्यात ती घेते जगभरातल्या जाहिरातदारांना पुरवण्यासाठी आपला आयता
डेटा. आणि हाच डेटा वापरून अब्जाधीश पण बनते. याच धर्तीवर काम करणाऱ्या युट्युब काय, इंस्टाग्राम काय, ट्विटर
काय, या सगळ्या आधुनिक बोहारणीच नाहीत का?
तरी या बोहारणी स्वागत करण्यासारख्या तरी आहेत कारण यांच्याकडून आपल्याला आयुष्य अधिक सुखमय
होण्यासाठी सोयी तरी मिळतात विनामूल्य आणि विश्वासार्ह.
पण काही अशा बोहारणी आपण बोलावतो ज्या अक्षरशः जुनं ते सोनं घेऊन जातात आणि बदल्यात हातात काहीच ठेवत
नाहीत आपल्या. एक ‘कॉम्पुटर गेम’ नावाची बोहारिण येते विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ घेऊन जाते. पण बदल्यात हातात
काय ठेऊन जाते? ‘दुर्दर्शन मालिका’ नावाच्या बोहारणीने तर कहर केला आहे. या बोहारणीला तर जणू घरी राहायलाच
बोलावलं आहे कित्येक घरात. मी मालिकांच्या किंवा करमणुकीच्या विरुद्ध अजिबात नाही. किंवा समाजातील
वास्तवतेचा कधी कधी काही मालिका म्हणजे आरसा असतात असं मला मनःपूर्वक वाटतं. पण आपल्या कधीही पुन्हा
परत न मिळणाऱ्या आयुष्यातल्या अमूल्य वेळेच्या आहुतीच्या बदल्यात आपल्याला ही बोहारिण काय देते याचा
गांभीर्याने विचार नको का व्हायला? या बोहारणीला आपण संध्याकाळचा शुभंकरोती, रामरक्षेचा वेळ देऊन टाकला, कथा
कीर्तन प्रवचनाचा वेळ दिला, सांस्कृतिक कार्यक्रमांचा वेळ दिला, एकत्रित होणाऱ्या कौटुंबिक जेवणखाण्याचा वेळ दिला,
अभ्यास साधनेचा वेळ दिला. शांतता दिली, स्वस्थता दिली, पण बदल्यात आपल्या हातात काय पडलं? विचार केला
आहे का आपण कधी? जुनीपानी म्हणून सांस्कृतिक मूल्य देऊन टाकली आपण पण बदल्यात या बोहारणीने आपल्या
पदरात काय घातलं आहे याचा विचार केला आहे का आपण कधी? मी जितक्या काटेकोरपणे मालिकांच्या वेळा पाळतो
तेवढ्या काटेकोरपणे नामस्मरण, अभ्यास, साधना, इत्यादींच्या वेळा पाळतो का? जितकं मालिकांमधल्या पात्रात मन
गुंतत आपलं तेवढं मन आपल्या माणसात गुंतवलं जातंय का ? जितका विचार एखाद्या बिचाऱ्या पात्राच्या दुःखाबद्दल
करतो तेवढा विचार आपल्या आजूबाजूला प्रत्यक्ष अस्तित्वात असणाऱ्या दुःखांविषयी करतो का आपण? आणि एवढं
करून फायदा कोणाचा होतोय याचा विचार केला आहे का कधी? हिशोब मांडलाय का कधी? माणसाच्या हातात
असणाऱ्या वेळेचा विचार केला तर आधीच आपली स्वप्नं आकांशा पूर्ण करण्यासाठी हातात असणारा वेळ अपुरा आहे हे
लक्षात येतं. कोणालाही विचारा ‘अजिबात वेळ नाही मला’ हे रडगाणं प्रत्येकजण गातोय मग या पार्श्वभूमीवर हा
अमूल्य वेळ कुठल्या बोहारणीला कशाच्या बदल्यात आपण देऊन टाकतोय याचा हिशोब प्रत्येकाच्या मनात नको का
व्हायला?
मला आता एक नक्की पटलंय की परंपरागत बोहारणींना तांब्यापितळीची भांडी, रेशमी कपडे काढून देणाऱ्या आमच्या
चाळीतल्या ताई, माई, अक्का काय किंवा आपली मूल्य आणि आपला अमूल्य वेळ देऊन टाकणाऱ्या आधुनिक आंटी,
अंकल काय दोघांनाही या सौद्यात फायदा हा बोहारणीचाच होतो ही गोष्ट लक्षात आली नाहीये हेच या बोहारणींच्या
बिझनेस मॉडेलच यश आहे…