असे का करावे – २ नोव्हेंबर २०१७

/ / marathi

५१ लेख लिहून झाले की थांबायचं असं ठरवलं होतं. कुठेतरी व्यक्त व्हावं असं मनापासून वाटलं म्हणून लिहायला
सुरुवात केली. या पूर्वी व्यक्त होण्यासाठी सुरांची, लयीची निवड केली होती मी. पण सुरांतून व्यक्त व्हायच्या ऐवजी
आसक्त झालो त्यांच्यावर. आणि माझी गत झाली समुद्रकिनारी गेलेल्या छोट्या मुलांसारखी.
शंख शिंपल्यांनी भरलेल्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या छोट्या मुलांना पाहिलं आहे कधी?. अथांग पसरलेला
समुद्रकिनारा, त्यावर पावलापावलाला दिसत जाणारे शंख शिंपले. ते मूल शर्टाच्या खिशात किंवा फ्रॉकच्या ओच्यात
शिंपल्या गोळा तरी किती करणार? मग आपला खिसा भरला की वाळूत उरलेल्यांकडे आशाळभूतपणे पाहत राहतात ती.
खिशात निदान थोडे तरी मावले शिंपले म्हणून निरागस आनंद दिसतो चेहऱ्यावर आणि त्याचबरोबर आपल्या खिशात
इतकेच मावू शकले म्हणून स्वतःच्या खिशाच्या मर्यादेचं शल्य सुद्धा.? आपल्याकडचा छोटा शिंपला पुन्हा वाळूत
टाकून त्यातल्या त्यात थोडासा मोठा शिंपला उचलून अत्यल्प का होईना पण आपली सुबत्ता वाढल्याचं समाधान तरळतं
कधीतरी मधेच चेहऱ्यावर आणि त्याबरोबर क्षणिक श्रीमंती झळाळीही. मग घरी आल्यावर जेवढे खिशात मावले तेवढेच
शिंपले ती मुलं धुवून पुसून शोकेस मध्ये ठेऊन देतात. इतरांना कौतुकाने दाखवतात पण प्राणापलीकडे जपतात त्या
छोट्याश्या खजिन्याला. आणि कुणी कौतुक केलं त्या खजिन्याचं की अभिमानाने किती फुलतो चेहरा त्यांचा? संगीत
नावाचं गारुड मनावर झालेल्या माझ्यासारख्या माणसांचं, शिंपल्यांनी गच्चं भरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर लहान
मुलांचं जे होतं त्यापेक्षा वेगळं काही होतं का? शिंपल्यांची जागा सूर घेतात एवढंच.
मग मला वाटलं सुरांना व्यक्त होण्यासाठी निवडलं ही माझी चूकच झाली बहुतेक. म्हणून सुरांच्या ऐवजी शब्दांना
विनवलं, व्यक्त होण्यासाठी साधन व्हा म्हणून.
पण जे सुरांचं झालं तेच शब्दांचं. शब्द म्हणजे सागरातल्या लाटांसारखे. प्रत्येक लाट पाण्याचीच पण वेगळं रूप घेऊन
येणारी. तसेच शब्दही. त्याच त्या अक्षरांनी बनलेले पण वेगवेगळ्या आवेगाने, वेगवेगळ्या लयीत वेगवेगळी उंची घेऊन
येणारे आणि आपल्यातला अर्थ किनाऱ्याकडे सोपवून फुटून पुन्हा वेगवेगळी अक्षर होऊन त्या अक्षरब्रम्हात सामील
होणारे.
शब्द आणि सुरांच्या विश्वाची एक गम्मत अशी की त्या विश्वात केवळ आत शिरण्याचा मार्ग आहे. तिथून बाहेर
येण्याचा मार्ग कधी बनालाच नाही कारण आत शिरलेल्यांना कधी बाहेर पडावंसं वाटलंच नाही. स्वरांचं गारुड झालंच
होतं माझ्या मनावर आणि ती शिंपल्यांची मनस्थितीही मी अनुभवली आहे कित्येकदा. लिहायला लागल्यावर या
शब्दसागराच्या लाटा अंगावर घेण्याचा अनुभवही मिळाला. मनातील वादळं कागदावर उतरवून मोकळं व्हावं म्हणून
लेखनाचा मार्ग निवडला खरा आणि तो मार्ग “मी” निवडलेला आहे असं वाटून काही लेखांनंतर वादळ शांत झाल्यावर
आपण थांबू असंही मनाशी ठरवलंही होतं. पण लक्षात येतंय कि परतीची वाट नसलेल्या विश्वात शिरलोय आता.
भरती ओहोटी होते समुद्रात पण लाटा थांबल्यात का कधी? मग तसं असेल तर लाटेने उठायचं कधी आणि फ़ुटायचं कधी
हे ठरवणारा तरी  “मी”  कोण हो! लक्षात येतंय की अथांगतेच्या किनाऱ्यावर उभं राहून लिहिला गेलेला प्रत्येक लेख
म्हणजे माझ्या दोन हाताच्या ओंजळीत मावलेला शब्दोदधीचा एक अर्घ्य होता पुन्हा त्या सागरात अर्पण करण्यासाठीच
हाती आलेला. मग ज्याचं त्यालाच अर्पण होत असताना केवळ माझी ओंजळ मध्ये आली त्याचा इतका अभिमान?
आणि म्हणूनच लिखाण कधी सुरु व्हायचं कधी आणि थांबायचं कधी हे ठरवणारा मी कोण?
आम्ही लहानपणी एक कविता म्हणायचो,
असे का करावे , तसे मी करिन।

वृथा कल्पना माणसाच्या अजाण।
स्थितीचा असे किंकर: प्राणिमात्र।
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र।।
म्हणूनच माझ्याकडून लिहिलं जावं अशी ज्याने स्थिती निर्माण केली आणि लिहिण्यासाठी मला पात्र करून ज्याने माझा
बोरू करायचा ठरवलं त्यालाच ठरवू दे आता मला किती शाई पुरवायची ते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *