
परवा एका कार्यक्रमानंतर घरी परतलो आणि अंगावरचा कुर्ता काढता काढता सहज मनात आलं की हा कुर्ता पुन्हा धुवून, इस्त्री करून नीट ठेवला पाहिजे म्हणजे पुढे नंतर पुन्हा कधीतरी वापरता येईल. गम्मत म्हणजे हा विचार करता करता भंगवंतांच्या भगवदगीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायामधला २२ वा श्लोक सहज आठवला;
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही ।।
भगवंत अर्जुनाला सांगतात;
टाकिसी जसे तू वस्त्र जुने झालेले।
आत्मा ही त्याजतो शरीर जीर्ण शिणलेले ।
त्याहुनी अर्थ या नसे अधिक शरीराचा ।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।
रे नकोस पार्था मोह धरू देहाचा ।।
आणि मग सहज मनात आलं की आपण नवीन कुर्ता घेतला, की त्याला न धुताच, तो तसाच खूप वापरून जुना जीर्ण झाला की टाकून देऊन दुसरा विकत घेत नाही. मग मनात गम्मत म्हणून प्रश्न आला की जसा आपला कुर्ता आपण धुवून, इस्त्री करून पुन्हा वापरतो तसं मनुष्यदेहाच्या बाबतीत घडतं का? मनुष्य देहासाठी आपल्या पूर्वजांनी एखादं वॉशिंग मशीन निर्माण केलं असेल का? असं वॉशिंग मशीन की ज्यात मनुष्य देह धुवून इस्त्री करून, दररोज अगदी नव्यासारखा करून इप्सित कार्यासाठी पुन्हा पुन्हा वापरता येईल, अगदी तो जीर्ण होऊन टाकायची वेळ येईपर्यंत !
आणि मग नाव सुचलं ते योगाचार्य पतंजली यांचं आणि समोर आला त्यांनी सांगितलेला अष्टांग योग. हल्ली समान्यतः पंतंजली म्हटलं की अष्टांग योग सोडून टूथपेस्ट पासून बिस्किटांपर्यंत सगळं डोळ्यासमोर येतं. आणि आताशा आपण भारतात सुद्धा “योगा करतो”, “आसनाज करतो” आणि अगदीच खूप गंभीर मामला असेल तर “अल्टरनेट नोस्ट्रील ब्रीदिंग एक्सरसाइज” (याला आपल्याकडे अनुलोम विलोम म्हणतात बरं का !!) वगैरे “प्राणायाम्स” पण करतो. अर्थात काहीच न करण्यापेक्षा ते कितीतरी चांगलं.
पण आचार्य पतंजली यांचा अष्टांग योग हा सर्वसामान्य समज आहे त्या पेक्षा कितीतरी खोल, कितीतरी व्यापक, कितीतरी सर्वंकष आहे. आणि आचारायला कितीतरी सहज आणि सोपाही आहे. तो योग्य व्यक्तीकडून शिकला मात्र पाहिजे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही ती योगाची आठ अंग. सकाळी उठल्या पासून रात्री निजेपर्यंत आणि अगदी निजल्यानंतरही या आठही अंगांचा अवलंब करून मनुष्याच्या देह, मन, बुद्धी आणि आत्मा यां चारीं अंगांना सक्षम, स्थीर, सतेज आणि सत्प्रवृत्त ठेवण्याचं काम अष्टांग योग करतो. याचा अभ्यास सुरु केला की लक्षात येतं की योग म्हणजे केवळ शारीरिक आसनं नव्हेत की केवळ श्वासोच्छ्वासाचे प्रकार नव्हेत. पतंजलींचा अष्टांग योग हे जीवनदर्शन आहे. भगवंतांच्या “युक्ताहार विहारस्य..” या वचनाशी, आणि एकंदरीतच ध्यानयोगाशी सुसंगत. राजयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांचा सुरेख मेळ साधणारं. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आदर्श जीवनाच्या “स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स” म्हणजे अष्टांग योग. मनुष्याला आतून बाहेरून धुवून दररोज नवसंजीवनी देणारं असं दैवी वाशिंग मशीन.
सर्वात महत्वाचं म्हणजे मनुष्याचं हे आठ वॉशिंग सायकल्स युक्त “डेली वॉशिंग मशीन”, “लाईफ टाइम वॉरेंटी” सह आणि पतंजली योगसूत्रांच्या “युजर मॅन्युअल” सकट संपूर्णपणे फुकट उपलब्ध आहे. असं डील तर ऍमेझॉन पण देणार नाही. तेव्हा त्वरा करा आणि आजच आपल्या आयुष्यात आणून आपलं मनुष्यरुपी वस्त्र दररोज स्वच्छ ठेवायला सुरुवात करा.
कुणी सांगावं, या मशीनमधून स्वच्छ झालेलं आपलं वस्त्र टाकायची वेळ येईल त्यावेळी ते जीर्णही झालं नसेल…