
शेजारच्या परसातील गवताच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे आपला गोठा जळला असा समज करून त्याने शेजाऱ्याचं अख्ख घर जाळलं. या गदारोळात कुणाच्याच लक्षात आलं नाही की यात ज्याचा सर्वाधिक फायदा झाला त्याला गंजी पेटवायला केवळ एक काडीचा खर्च आला.
हल्ली आमच्या घरातला देव्हारा खूप खराब झालाय हे असे लोक आम्हाला सांगतायत की ज्यांच्या घरात देव्हाराच नाही किंवा जे मुळात देवालाच मानत नाहीत. गम्मत म्हणजे आम्ही ते सहन करतोय कारण आम्हाला शांतपणे राहायचं आहे.
मी देवाला प्रश्न विचारला,” तुझ्या नावात असा काय फरक झाला आहे की पूर्वी तुझ्या नावामुळे लोक एकत्र यायचे आता त्याच नावाने दूर जातात?”
देव उत्तरला,”फरक नावात नाही जे नाव घेतात त्यांच्या नियतीत झाला आहे”.
६.४
विळयाने हातोड्याला प्रश्न विचारला,” आपली ताकद पूर्वीसारखी नाही राहिली. असं का?”
हातोडा उत्तरला,” पूर्वी रिकामी पोटं असंतोषाने आपल्याला घेऊन रस्त्यावर उतरायची. आता भरलेल्या पोटात असंतोष असतो आणि रिकामी पोटं त्यांचं ऐकून आपल्याला घेऊन रस्त्यावर उतरतात.”
६.५
पूर्वी भगव्या रंगाचा प्रवास आतून बाहेर असायचा. आता आत बाहेर सगळीकडेच रंगपंचमी सुरू आहे.
६.६
लहानपणी शाळेच्या क्रीडामोहोत्सवात संघ वेगवेगळे असले तरी एकाच गणवेशात सगळे खेळायचो. आता चार रंगाची चार हाऊस करून एकोप्याने खेळा म्हणतात. गम्मत आहे नाही ?
६.७
लिहीत असताना खरंतर झरून झरून आटत असते शाई. आणि कागदावर टिकूनही राहते शाईच. पण कौतुक मात्र लेखणीचं होतं. झिजतात त्यांचं पडद्याआड राहण्याचंच प्राक्तन असतं बहुतेक.
६.८
जीवनाच्या झोपाळ्यावर बसलो असता जाणीव आणि नेणिवेदरम्यान झोके सुरू होते. झोपळ्याचा वेग वाढला तेव्हा घाबरून लहान मुलासारखं मागे पाहिलं. सद्गुरू झोका देत आहेत हे पाहिल्यावर लहान मुलासारख्या मीही फुशारक्या मारल्या निडर चेहऱ्याने त्या उंच जाणाऱ्या झोक्यावर.
६.९
कधी त्याला स्वतःकडे बघून अहंगंड व्हायचा कधी न्यूनगंड. गम्मत म्हणजे दोन्हीवेळा आरसा तोच असायचा समोर.
६.१०
बँकेत पेन्शन मिळण्यासाठी आवश्यक असलेलं लिविंग सर्टिफिकेट देण्यासाठी तो जेव्हा जायचा तेव्हा त्याला नेहमी वाटायचं की बँकेला फक्त देह जिवंत लागतो हे बरं आहे. मनाची स्थिती विचारात घेतली असती तर त्याचं पेन्शन सौ. गेली त्याच दिवशी बंद झालं असतं.