
२.१
आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
“मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”
२.२.
माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची.”
२.३.
कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं,” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.
२.४.
मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला. म्हणाला, “वेडा रे वेडा !!”
२.५.
लग्न झाल्यावर तिचे शेवटचे दिवस आनंदात गेलेले मी स्वतः पाहिलेत.
मग माझं प्रेम आंधळं होतं असं का म्हणतात लोक?
२.६.
कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’
२.७.
“माणसाची किंमत पैशात करताच येत नाही” असं तोंडाने म्हणत शाहिद जवानांच्या कुटुंबियांना पन्नास पन्नास हजार दिले मंत्रीमहोदयांनी.
२.८.
“सहजीवन रथ असून नवराबायको ही त्याची चाकं असतात” असं घटस्फोट घेणाऱ्या जोडप्याला समुपदेशक सांगत होते. पण रथाला जोडलेल्या दोन्ही चाकांना आपापली गती सोडून एकाच गतीत पळत राहण्याची सक्ती होते हे भौतिकशास्त्र ते विसरून गेले होते.
२.९.
एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं
“जगलास किती दिवस?”
२.१०.
प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं
“माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?”
लाकडं म्हणाली, “मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला?”
२.११.
पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,”बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”
२.१२.
माणसानी देवाला विचारलं संकटं का पाठवतोस ?
देव म्हणाला माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते.
२.१३.
‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे?
दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
२.१४.
दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली
माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, “माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला?”
त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. “माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी?”
२.१५.
नाती का जपायची ?
रेशमाच्या धाग्याचा गुंता सोडवून पहा एकदा…
२.१६.
आठवणींची एक गम्मत आहे.
त्याच्यात गुंतून राहिलात तर नवीन निर्माण नाही होत !!
२.१७.
माणूस देवाला म्हणाला “माझा तुझ्यावर विश्वासच नाही.”
देव म्हणाला “वा !! श्रद्धेच्या खूप जवळ पोहोचला आहेस तू. प्रयत्न सुरु ठेव.”
२.१८.
गवई एकदा तानपुऱ्याला म्हणाला,”तू नसलास तर कसं होईल माझं?”
तानपुरा म्हणाला ,”अरे वेड्या ! माझी गरज लागू नये हेच तर ध्येय आहे.”
२.१९.
विठुमऊली एकदा एकादशीला दमून खाली बसली. मी विचारलं,”काय झालं ?”
विठुराय म्हणाले, “पुंडलिकाचा गजर करतात लेकाचे पण मायपित्यांना एकटं सोडून अजून माझ्याच पायाशी येऊन झोंबतात वेडे कुठले. !”
२.२०.
एकटं वाटलं म्हणून समुद्रावर गेलो एकदा. त्याला विचारलं “कसा एकटा राहतोस वर्षानुवर्ष ?”
तो म्हणाला “एकटा कुठला, मीच माझ्यात रमावं म्हणून ईश्वराने लाटा दिल्या आहेत ना मला.”
मी विचारलं “माझं काय?”
तो हसून म्हणाला
“नामस्मरण आणि माझ्या लाटांमध्ये काहीच साम्य दिसत नाही का तुला ?”