
९.१
घरेलू बायको म्हणून पार्टीज मध्ये तिला तो घेऊन जात नसे. पण त्याला अर्धांगवायू झाला तेव्हा त्याला आणि त्याच्या व्यवसायालाही घरीच बसून सांभाळलं तिने.
९.२
हौदात दिसणाऱ्या पाण्याच्या नितळतेबद्दल सगळे हौदाचं कौतुक करायचे आणि पाण्याचं गुणगान. कोणीतरी आला आणि तळ हलवून गेला काठीने. तेव्हा कळलं लोकांना हौदाने आणि पाण्याने मिळून किती चिखल दडविला होता तळाशी.
९.३
मोर्चात सामील झालेल्या एका कृश झेंडाधारकला एका पत्रकाराने विचारलं ,” काय बाबा कशासाठी झेंडा हाती धरलाय?”
त्या बाबाने त्या पत्रकाराकडे रिकाम्या नजरेने पाहिलं आणि म्हणाला ,” त्ये काय म्हायती न्हाई दादा. पर मोर्चा संपला की झेंड्याचा दोन लंगोट्या होतात माज्या पोरास्नी. मग लै खुश असतात सालभर”
९.४
एक मुलगा रस्त्यावर पेनं विकत होता. एका माणसानं त्याला हटकलं आणि म्हणाला,” रस्त्यावर पेनं विकण्यापेक्षा शिक्षण घे म्हणजे रस्त्यापलिकडे जी मर्सिडीज उभी आहे ना ती पण विकत घेऊ शकशील कधीतरी .” तो मुलगा म्हणाला,” त्या मर्सिडीजमध्ये माझे बाबा आहेत, “मर्सिडीज कशी मिळवायची ते तुला शिकवतो”असं म्हणून माझ्या हातात ही पेनं दिली आणि म्हणाले,” जा ! रस्त्यावर उभं राहून ही विकून ये.”
९.५
आपला चेहरा लोकांनी ओळखावा म्हणून खूप मेहेनत केली त्या नटाने. आता लोक ओळखतील म्हणून लोकात फारसा मिसळत नाही तो. मला प्रश्न पडलाय त्याला हवं ते मिळालं की नाही ?