
अलक ४९.१
काही क्षुल्लक कारणावरून तिचा उच्चविद्याविभूषित मुलगा तिच्यावर चरफडून, तिला वाटेल ते बोलून तिनेच तयार केलेला जेवणाचा डब्बा घेऊन बाहेर पडला.वाईट वाटून ती भरल्या डोळ्यांनी तिच्या दुसऱ्या मुलाजवळ येऊन बसली.त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले, कपाळावरचा घाम पुसला आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि एवढंच स्वतःशी पुटपुटली,”याला लोक मतिमंद का म्हणतात?”
अलक ४९.२
तो दिवाळीत फटाके ऐकायचा. कारण एका दिवाळीत निष्काळजीपणामुळे डोळ्यात गेलेला बाण हा त्याने पाहिलेला शेवटचा फटाका होता…
अलक ४९.३
एका अपघातात त्याच्या समोरच त्याच्या दोन महिन्यांच्या बाळाच्या गळ्यावरून पत्रा चिरत जाताना त्याने पाहिलं. त्यानंतर स्वतःचं चिकनशॉप चालवायची मनस्थितीच उरली नाही त्याची..
अलक ४९.४
ते दोघे वेगळे झाले. सगळ्या वस्तू समसमान वाटायचं ठरलं. घर आवरताना एका कोपऱ्यात मुलाचं काही वर्षांपूर्वी हरवलेलं बालवडीतलं फोटोसकटचं प्रगतीपुस्तक मिळालं.. त्यांना कळेना त्याची आणि त्याबरोबर असणाऱ्या असंख्य आठवणींची वाटणी कशी करायची?…
अलक ४९.५
तो गॅरेजवर आला आणि म्हणाला,”अरे गाडी पुन्हा बंद पडली बघ! माझी पहिली गाडी आहे म्हणून विकवतही नाही आणि टाकवतही नाही. आजच्या आज नीट दुरुस्त करून ठेव.उद्या मला हवी आहे.आई म्हातारी झाल्ये खूप कुरकुर करते. तिला उद्या वृद्धाश्रमात नेऊन टाकायचं आहे”
मराठीत अलक ह्या साहित्यप्रकारास आपण वैभव मिळवून दिले.आपल्या अनेक अलक वाचल्या.
त्यातून अलकची वैशिष्ट्ये मला पुढीलप्रमाणे जाणवली,
– शिर्षक नको.
– वाक्ये जास्तीत जास्त ६ असावीत.
– अखेर कथेला वळण लागलेले असते.
यात काही बदल असल्यास कृपया कळवणे.
– प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ