
४७.१
तो दारूच्या ग्लासवर पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाकडे पहात होता. अचानक त्याला लक्षात आलं की त्याच्या गेल्या काही वर्षांच्या प्रवासात, ग्लासच्या आत असणाऱ्या दारूची उंची वाढली खरी पण त्याच ग्लासच्या बाहेर त्याला दिसत आलेल्या त्याच्या प्रतिबिंबाची उंची मात्र तितक्याच व्यस्त प्रमाणात घटली होती…
४७.२
त्याने आपल्या पत्र्याच्या छोट्या पेटीतलं मोरपीस हळुवार बाहेर काढलं आणि आपल्या डोक्यावरून हळूच फिरवलं.
आज वाढदिवस होता त्याचा. अनाथाश्रमात राहताना त्याच्या वाढदिवसाला आईचा स्पर्श अनुभवायची ही एकच पद्धत माहीत होती त्याला…
४७.३
तो सतार वाजवत असताना हातातून रक्त निघून लाल झाल्या होत्या तारा पण त्याच्या स्वरविभोर अवस्थेत त्याचंही त्याला भान नव्हतं. त्याला कुणीतरी हलवून भानावर आणलं आणि म्हटलं,”अरे किती वेळ वाजवतोयस. विजयादशमीची शस्त्र पूजा करायची आहे उठ… त्याने आपले रक्ताचे हात पुसले, तारांवरची रक्तलाली पुसली आणि फक्त सूचक हसला…
४७.४
तो कुठेही गेला तरी सांज होता होता घरी परतायचाच. कारण त्याची आणि तिची ती भेटीची वेळ असायची. ती हयात असताना दोघांनी मिळून लावलेला निशिगंध दरवळायचा त्यांच्या घरकुलाच्या परसात दररोज संध्याकाळी…
४७.५
खूप वर्षांनी त्याने त्याच्या घरातल्या माळ्यावरची अडगळ काढली तेव्हा त्याला धूळ खात पडलेली एक जुनी छत्री मिळाली. त्याला आठवलं, परदेशात येताना बाबांची आठवण म्हणून मुद्दाम घेऊन आला होता तो ती छत्री…