
४६.१
बहिण पोस्टाने राखी पाठवायची तेव्हा तो तिला अंधश्रद्धाळू म्हणायचा. तीच राखी हातातून खाली पडली म्हणून परत उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि सीमापार असणाऱ्या शत्रूच्या गोटातून सु सु करीत आलेली लक्ष्यवेधी गोळी त्याच्या डोक्यावरून त्याला इजा न करता निघून गेली….
४६.२
दरवाज्यावर कुणाची तरी टकटक झाली तेव्हा तिने दार उघडल्यावर बाहेर अपेक्षा होती तोच होता. तिने पटकन आत परत जाऊन बाळाच्या अंगावर ठिगळं लावलेल्या आपल्या मऊ साडीचं दुपटं पांघरलं. आणि बाहेर येऊन त्याला म्हणाली,”यमा! माझ्या पिलाऐवजी मी यत्ये तुझ्याबरोबर पण तू वचन दिलयस तसा उद्या पर्यंत ताप उतरेल ना माझ्या बाळाचा ?”
४६.३
‘माझ्या बाबांची एक अविस्मरणीय आठवण’ या विषयावर निबंध लिहायला बाईंनी सर्व मुलांना सांगितलं. त्या छोटुकल्याने दुसऱ्या दिवशी कागदाला खूप छिद्र पाडून आणली. बाईंनी कारण विचारल्यावर तो म्हणाला, “दारूला आईने पैसे नाही दिले की तिच्याकडून ते वसूल करायला माझा बा मला सिगारेटचे चटके द्यायचा, एवढंच आठवतंय मला माझ्या बा बद्दल”…
४६.४
रस्त्यावरून जाताना त्याने तिचा नकळत हात धरला. “लोक काय म्हणतील” असं म्हणून ती त्याच्या हातातून हात नेहमी लगेच सोडवून घ्यायची. आज तसं केलं नाही तिनं. पण आज लोकांनी सांगितलं म्हणून त्यालाच सोडावा लागला होता तिचा हात. कारण स्मशान आलं होतं तोपर्यंत…
४६.५
अनुग्रह देण्यासाठी तो त्याच्या श्रीगुरूंच्या खूप मागे लागला होता. एकदा श्रीगुरु अचानक म्हणाले,”चल आत्ता देतो.” अचानक आलेल्या प्रसंगाने बावचळून तो म्हणाला,”पण मी काहीच तयारी केली नाहीये” श्रीगुरु फक्त एवढंच म्हणाले,”बरं झालं स्वतःलाच कळलं… जाऊदे पुढच्या संधीची वाट पहा”..