
४५.१
आपल्या गुरुजींचा पट्टशिष्य म्हणवून घेण्यासाठी त्याने गुरुजींसारखं गाण्याचा खूप प्रयत्न केला. पण गुरुजींसारखं तो कधीच गाऊ शकला नाही. जेव्हापासून गुरुजींसारखं गायचं सोडुन गुरुजींनी शिकवलेलं गायला लागला तेव्हापासून लोक त्याला गुरुजींचा पट्टशिष्य म्हणून ओळखायला लागले.
४५.२
तो मैफिलीत रंग भरत होता. त्याचं स्वरचित्र पूर्ण होत आलं. आणि मग मैफिल ऐकायला नाही तर मैफिलीत ‘दिसायला’ आलेल्या लोकांनी नको तिथे टाळ्या वाजवल्या आणि ते स्वरचित्र पूर्ण विस्कटून टाकलं.
४५.३
त्याच्यात अजिबात नेतृत्वगुण नाहीत असंच तो लहानपणापासून ऐकत आला होता. त्याच न्यूनगंडामुळे असेल कदाचित पण रेल्वेत मोटरमनची नोकरी मिळण्याची शक्यता असूनही गार्ड व्हायचं ठरवलं त्याने.
४५.४
त्याने आयुष्याकडे वळून पाहिलं तेव्हा त्याला लक्षात आलं की आयुष्याच्या सापशिडीत तो नेहेमीच हरला कारण तो दान टाकत संधीच्या शिडीची वाट पाहत राहिला. पण आयुष्याच्या सापशिडीत स्वार्थी मंडळी संधी मिळाली तर सापांचीही शिडी करतात, ती कला साधलीच नाही कधी त्याला.
४५.५
समुद्रावर गेल्यावर त्याला लक्षात आलं की कोरड्या वाळूत पावलांचे ठसे तंतोतंत उठत नाहीत आणि ओल्या वाळूत उठतात पण टिकत नाहीत. तेव्हापासून जनमानसावर स्वतःचा ठसा उमटवायचं वेड गेलं त्याच्या डोक्यातून. माणसाचं मन आणि वाळू यात तसंही खूप साम्य आहेच की.