
४४.१
पोत्यात माती भरता भरता तो आपल्या बायकोला म्हणाला, “मी सावकाराच्या घरी जातोय खतासाठी पैसे मागायला, आलो परत तर या मातीत खत घालून आणि नाही आलो तर यात माझ्या देहाची राख घालून पसरायची ही माती आपल्या शेतात.”…
४४.२
अर्ध्या चड्डीत फिरतो म्हणून अक्ख गाव त्याला हसायचं. पण जेव्हा धरण फुटलं आणि त्याखाली गाव बुडालं तेव्हा सगळ्यांना मदत करता करता झोपला नाही तो चार दिवस. त्यावेळी त्याला हसणारी तोंडं आणि फक्त वोट मागतानाच्यावेळी दिसणारे ‘हात’ मात्र मदत देताना दिसलेच नाहीत कुणाला.
४४.३
अंघोळीचा प्रचंड आळस असलेला तो अलीकडे कधीही अवेळी अंघोळीला जायचा आणि बाहेर यायचा तेव्हा मात्र नेहेमी डोळे लाल असायचे त्याचे. ती गेल्याचं दुःख आणि अश्रू दोन्ही वाहून जायचे अंघोळीच्या पाण्याबरोबर…
४४.४
कधी त्याच्यावर पडलेल्या कामाचं आणि जबाबदऱ्यांचं खूप दडपण आलं की त्यातून बाहेर पडण्यासाठी जालीम उपाय होता त्याच्याकडे . अशावेळी तो आरशासमोर उभं राहायचा आणि कॅन्सरचं निदान असलेला आपला मेडिकल रिपोर्ट मोठ्याने वाचायचा आणि नंतर तो कॅन्सरमुक्त झाल्याचा…
४२.५
पुरुषप्रधान संस्कृतीच्या पगड्यामुळे त्याने तिला जिवंतपणे कधीच मोकळेपणाने बोलू दिलं नाही. तिचं शरीर अचेतन झाल्यावरसुद्धा अनाहूतपणे त्याने पहिली गोष्ट केली की तिच्या तोंडात कापूस ठेऊन आणि त्यावर तुळशीपत्र ठेवलं…