
४२.१
कृष्ण सुंदर बासरी वाजवायचा तेव्हा गाई आजूबाजूला ऐकायला गोळा व्हायच्या, असं आजी सांगायची, तेव्हा लहानपणी कृष्णाचं खूप कौतुक वाटायचं. आता मोठा झाल्यावर त्या गाईंविषयी आदर अधिक वाढलाय. चांगलं काय वाईट काय हे ही कळावं लागतं.
४२.२
परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलाला भारतात एकट्याच राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी फोनवरच विचारलं. “तू काही आता परत येत नाहीस तर मी माझ्या ताब्यातल्या सगळ्या प्रॉपर्टीची व्यवस्था लावायला सुरुवात केली आहे. तू पाठवलेले सगळे पैसे तुझ्या अकाउंट मध्ये जसेच्या तसे आहेत. एवढंच सांग की लहानपणच्या तुझ्या पिगी बँकेत अठ्ठेचाळीस रुपये मिळाले. त्याचं काय करू?”
४२.३
तो तिच्याबरोबर चालत असताना ती थोडी अडखळली. “वेंधळी कुठली रस्त्याकडे पाहून चाल की!” असं तो तिला म्हणाला. पुढच्या पावलाला तो अडखळला. तिने त्याला लगेच आधार देऊन सावरलं आणि ती एवढंच म्हणाली. “हल्ली रस्तेच नीट बांधत नाहीत नाही?”
४२.४
लहानपणी तिला बार्बी डॉलचं खूप आकर्षण होतं. इतकं की आपण स्वतः बार्बी व्हावं असं तिला वाटायचं. स्वतःचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती परदेशात गेली. खूप वर्ष गेल्यावर, खूप उशीरा तिला लक्षात आलं की ती तिच्या स्वप्नातली बार्बी बनली खरी पण त्या प्रयत्नात ती निर्जीव झाली होती.
४२.५
नेहमीच्या सिंहसनाधिष्ठित छत्रपतींच्या प्रतिमेऐवजी अगदी सामान्य घरगुती वेशातील रूप असलेलं एक छत्रपतींच चित्र रंगवून घेऊन ते त्याने आपल्या कार्यालयात ठेवलं. त्याला या बद्दल कुणी विचारलं तर तो म्हणाला, “माझी छत्रपती नाही छत्रपतींमधला माणूस व्हायची महत्वाकांक्षा आहे”