
४०.१
सफाई कामगाराने कंटाळून शेवटी तळ मजल्यावर बिल्डिंगच्या लिफ्टच्या बाहेर असलेली ‘इथे थुंकू नका’ ही पानाच्या पिंकांनी रंगलेली पाटी काढली आणि त्या जागी देवाचं छानसं चित्र असलेली टाईल लावली.
आता लोक टाईलचा तेवढा भाग सोडून आजूबाजूला थुंकतात…
४०.२
देशाची सराहद्द राखणारा एक जवान सुट्टीवर घरी आला. आल्यावर कळलं की त्याच्या सख्ख्या भावाने शेतीत वाटा मागितला होता आणि त्यांच्या दोघांच्या शेतीच्या बरोबर मध्ये तारांचं कुंपण करायची मागणी केली होती. जवानाला प्रश्न पडला, तो सरहद्द राखतो म्हणजे नक्की काय करतो ?….
४०.३
स्मशानात चितेची लाकडं रचून तो त्या प्रेताच्या शोकमग्न मुलाकडे गेला आणि समोर निलाजऱ्या नजरेनं आशाळभूत पणे उभा राहिला, मुलाने प्रश्नार्थक नजरेनं पाहिल्यावर तो म्हणाला ,”तुमच्या खुशीनं काही द्या साहेब!”
४०.४
तो शाळेत दररोज यायचा आणि आपले ओल्या मातीच्या चिखलाने भरलेले हात नळावर धुवायचा आणि मग वर्गावर शिकवायला जायचा. कुणितरी एकदा त्याला हटकून याबद्दल विचारलं तर तो एवढंच म्हणाला,”माझ्या समोर वर्गात मुलं नाहीत तर ओली माती आहे याची आठवण राहावी यासाठी वाटेवरच्या कुंभाराकडे जाऊन हात ओल्या मातीने बरबटवून घेतो नेहमी शाळेत येण्यापूर्वी…
४०.५
तातडीचं ऑपरेशन आलं म्हणून तो घरची देवपूजा न करता तसाच बाहेर पडला. पूर्ण ऑपरेशनभर देवपूजेचा विचार काही डोक्यातून गेला नाही त्याच्या. ऑपरेशन यशस्वी करून संध्याकाळी घरी आल्यावर बायको म्हणाली,”आता मात्र कमाल झाली हो तुमची!!. अहो देवपूजेत फुलांऐवजी बँडेज वाहतं का कुणी?” हे ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू कधी ओघळले ते त्याचं त्यालाही कळलं नाही..