
३८. १
तो रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल वर थांबला होता . त्याच्या लक्षात आलं एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लाला रस्ता ओलांडता येत नाहीये. त्यांनी त्या पिल्लाला उचललं आणि दोघांनी रस्ता ओलांडला. त्याने त्या पिल्लाला सोडून दिलं आणि आपली आंधळ्यांची काठी उलगडून तो मार्गस्थ झाला. या व्यग्र शहरात कुणी कुणाचा नसतो हे सत्य त्या कुत्र्याच्या पिल्लाला अजून उमगलं नाहीये हे त्या अंधाला लक्षात आलं होतं ना !!
३८.२
शाळेत शिक्षकांनी सर्वांना हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायला सांगितलं. इतर मुलांकडे पाहून मिश्किल भाव त्याच्या चेहऱ्यावर आले. इतर मुलांना शिक्षा झाली पण आपण जन्मतः अधू असल्याने आपल्याला ही शिक्षा झालीच नाही हा विजयी भाव होता त्याच्या चेहऱ्यावर. यालाच सकारात्मकता म्हणत असतील का?
३८.३
एका पार्टीत कुणीतरी सुरु असलेलं संगीत बंद केलं. बेहोषीत नाचत असलेल्या सगळ्यांचाच हिरमोड झाला पण ती दोघ मात्र तशीच एकमेकांच्या आलिंगनात बद्ध राहून नाचत राहिली. त्या दोघांना पाहून सर्वांना हे कळलं की आनंदाने बेहोष होण्यासाठी संगीत बाहेरून आत नाही तर आतून बाहेर यावं लागतं. मग ती दोघ संपूर्णतः कर्णबधिर असली म्हणून कुठे बिघडलं?
३८.४
एका अंध गायकाला कुणीतरी विचारलं, ” अंध असल्यामुळे गैरसोय होते का कधी?” त्यावर तो उत्तरला,” अहो एकाग्र होऊन स्वतःला विसरण्यासाठी वर्षोनुवर्षे रियाझ करताना डोळे मिटून घेतात लोक. माझा तो सगळा वेळ आणि कष्ट वाचले ही सोय झाली की गैरसोय? ”
३८.५
आपल्या पूर्णपणे कर्णबधिर असलेल्या मुलाला वेगळं वागवायचं नाही, सर्वसामान्य मुलाप्रमाणे वागवायचं असं तिने ठरवलं आणि तसंच ती आयुष्यभर वागत आली. त्या मुलाच्या १२ व्या वाढदिवसाला एका नातेवाईकाने त्या मुलाला वाजवायचा बेंजो आणून दिला त्यावेळी डोळे ओलसर झाले तिचे. कारण त्यालाच नाही तर तर सगळ्या जगाला तो सर्वसामान्य मुलगा आहे हे पटवून देण्यात तिला यश आलं आहे हे त्या दिवशी लक्षात आलं तिच्या.