
कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे.
३६.१
‘क्ष’ व्यक्तीच्या आशीर्वादाने, ‘य’ व्यक्तीच्या आदेशानुसार, ‘ज्ञ’ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली, ‘फ’ व्यक्तीच्या प्रेरणेने, ‘स’ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार, ‘छ’ व्यक्तीच्या सहकार्याने, ‘ढ’ व्यक्तीची आमच्या बिल्डिंगच्या क्रिकेट टीममध्ये बारावा खेळाडू म्हणून निवड झाली म्हणून त्याच्या शुभेच्छूक मित्रपरिवाराने सर्व टीम आणि त्यांच्या परिवारातील दीड वर्षाच्या कर्ट्या पासूनचे सगळे फोटो असलेला एक मोठा फलक आमच्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर लावला तेव्हाच कळलं की आता ही ‘ढ’ व्यक्ती कुठल्या क्षेत्रात ‘करिअर’ करणार ते….
३६.२
त्याचा मुलगा त्याच्याकडे धावत धावत आला आणि म्हणाला, “कोपऱ्यावर स्वस्तात प्लॅस्टिकची संत्री विकत मिळतायत दहा रुपयात चार. आपण जी खातो ना ती आईने पन्नास रुपयांची चार आणली आहेत असं शेजारच्या काकूंना मी सांगताना ऐकलं”. बाप त्याला खाण्यायोग्य संत्री आणि प्लॅस्टिकची निरुपयोगी संत्री यातील फरक समजवायला जाणार इतक्यात तो वर त्याच्या बापालच म्हणाला “तुम्हाला असं नाही वाटत की आई तुमचे पैसे फुकट उडवतेय?” हे ऐकल्यावर पोरगं काहीही समजण्याच्या पलीकडचं आहे हे बाप समजला आणि गप्प बसला.
३६.३
परवा बिल्डिंगमधल्या पोरांनी चोर पोलीस खेळ खेळायचं ठरवलं. त्या मुलांनी आधी चोर कोण होणार आपसात ठरवून चोर निवडले. मग त्या निवडून आलेल्या चोरांनी उरलेल्यातले पोलीस कोण आणि किती होणार हे ठरवलं आणि मग पहिल्या निवडलेल्या चोरांनी शेवटची जी बिचारी पोरं उरली होती त्यांना चोर ठरवून पोलिसांना त्यांना पकडण्याच्या कामी लावून दिलं आणि आपण सावलीत आरामात सरबत पित बसले. आजूबाजूच्या परिस्थिचा मुलांच्या मनावर कसा परिणाम होत असतो नाही !!!
३६.४
तो बिचारा सांगून सांगून थकला पण समोरचा तसुभरसुद्धा हलला नाही की त्यात काही फरक पडला नाही. समोरचा अगदी चकचकीत इटालियन मारबल असला तरी दगड तो दगड हे त्याला लक्षात आलं आणि त्याने समजवायचा नाद सोडून दिला.
३६.५
परिसर स्वच्छ ठेवायचा असं त्यांच्या बिल्डिंगमध्ये ठरलं. सर्वांनी उत्साहाने आपापल्या पद्धतीने हातभार लावायचं ठरवलं . त्यांच्यातील एक पोरगं म्हणलं, “आधी झाडू खरेदी करायचं टेंडर काढू. स्वच्छतेचं काय , पुढे मागे होत राहील की आटोमॅटिक”. त्या दिवशी पोराचे पाय पाळण्यात दिसले सगळ्यांना…