
३५.१
तो समुद्रावर गेला आणि एक एक शिंपला हातात घेऊन आत पाहत होता. कुणीतरी त्याला विचारलं काय करतोयस ? तो म्हणाला ,” माझी आजी काल गोष्ट सांगताना म्हणाली की आपली नाती म्हणजे शिंपल्यातल्या मोत्यांसारखी असतात, दुर्मिळ आणि मौल्यवान. म्हणून माझे आई बाबा मिळतायत का ते शोधतोय या शिंपल्यात..”
३५.२
दिवे गेले म्हणून तो अंधारात चाचपडत दरवाजा शोधत होता. एकाने त्याचा हात धरला आणि नीट आणून सोडलं दरवाज्यापाशी आणि मग आपली आधाराची काठी टेकवत टेकवत तो जन्मांध निघून गेला त्याच्यासाठी नेहेमीच उजळत असलेल्या अंतस्थ प्रकाशाच्या सोबतीने…
३५.३
तो नेहेमी मालकांच्या मुलाचे जुने कपडे घालायचा. आता तेच कपडे तो त्याच्या मुलालाही सांगतो सणासुदीला घालायला आणि दोघे त्यांच्या मर्सिडीजमधून जातात देवाच्या दर्शनाला मनात देवाने उदंड दिल्याबद्दल कृतज्ञता भाव जागता ठेवण्यासाठी…
३५.४
तो एक डॉक्टर होता.. रक्तातल्या साखरेवर खूप संशोधन केलं त्याने पण काही लोकांच्या रक्तातल्या गोडव्यामागचं कारण मात्र शोधून काढू शकला नाही कुठल्याही यंत्राने तो कधीही …
३५.दिवाळीत घरी कंदील करताना कागद चिकटवण्यासाठी गोंद वापरताना ती मुलाला म्हणाली ,”हा गोंद आहे. याने दोन गोष्टी जोडल्या जातात बरं का!” मुलाने निरागसपणे विचारलं, “बाबांना जर हा दिला असता ते आपल्याला सोडून गेले तेव्हा तर थांबले असते का ते ?” …