
३४.१
त्याच्या अप्रतिम पदलालित्याचं तोंड भरुन कौतुक केल्यावर त्याला रंगमंचावर बोलावलं तेव्हा सत्काराला उत्तर देताना तो म्हणाला”क्षमा करा, तुमच्यासमोर असं व्हीलचेअरवर बसून राहणं योग्य नाही पण नृत्य करताना होणाऱ्या वेदना येऊ देत नाही मी चेहऱ्यावर पण नृत्यानंतर मात्र माझ्या वेशभूषेबरोबर माझे जयपूर फूट पण काढावे लागतात मला …
३४.२
परवडत नाही म्हणून दोघांपैकी एकालाच खूप शिकवलं त्या मायपित्यांनी. आता साधारण दोन-तीन वर्षातून एकदा कंपनीच्या कामासाठी कंपनीच्या खर्चाने परदेशातून तो येतो तेव्हा येतो आपल्या वृद्ध माय पित्यांना भेटायला मीटिंग नसतील तेव्हा …आणि आपल्या आईवडिलांना सांभाळणाऱ्या आपल्या अशिक्षित भावाच्या हातावर ठेऊन जातो काही डॉलर…
३४.३
कोर्टात केसचे निकाल लवकर का लागत नाहीत हे नुकतच लक्षात आलं. दोन्ही बाजूचे पक्षकार कोर्टाच्या तारखेला मंदिरात जाऊन त्याच देवाला केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागावा म्हणून नवस बोलून येतात. आशावेळी कुणाची प्रार्थना ऐकावी मोडावी हा प्रश्न देवाला पडतो आणि तोच निर्णय देत नाही मग बिचारं कोर्ट तरी काय करणार ..
३४.४
हमाल म्हणून विटांचे भारे डोक्यावरून वाहताना आपल्या तान्हुल्याला झाडाखाली आपल्याच एक साडीच्या झोळीत वर्तमानपत्रांची सावली करून निजवायची ती. तिचा तोच तान्हुला आता करोडोपती झालाय पण आजही गादीवर तीच साडी अंथरून आणि तोंडावर वर्तमानपत्र घेऊन निजतो तो आईची आठवण काढत…
३४.५
समाजाला दोन्ही हाताने भरभरून देणाऱ्या हातांवर समाजानेच दिलेले डाग दिसले. त्या दानशुरांना त्याबद्दल विचारलं तेव्हा ते एवढंच म्हणाले, “समाजव्रतींच्या हातावरच्या भाग्यरेषा समाजच तर घडवणार.. नाही का ?”