
३३.१
तो धावता धावता तोंडाला फेस येऊन पडला. त्याने वर पाहिलं तर आजूबाजूच्या सगळ्यांच्याच तोंडाला फेस आला होता. त्याने त्यातल्याच एकाला विचारलं अरे आपण का इतके धावतोय ? तो म्हणाला मला माहीत नाही पण एक लक्षात आलंय की जितका फेस तोंडाला जास्त येतो तितके जास्त पैसे जमा होतात बँकेत माझ्या..
३३.२
तो जादूगार रस्त्यावर खेळ दाखवून त्याच्या पोतडीतून वेगवेगळ्या गोष्टी काढून दाखवायचा. तो खेळ नेहमी रंगून पाहणाऱ्या चिमुकल्याला एक गोष्ट मात्र कधीच कळली नाही की तो जादूगार त्याच्या पोतडीतून त्याच्या जादूने त्याच्या पोटासाठी भाकरी का नाही काढू शकत ?
३३.३
त्याला कुठे चुकलं हे कळलच नाही. तो पैसे मिळवायचे म्हणून कुटुंबापासून दूर रहायचा आणि कुटुंबाचा सहवास मिळावा म्हणून मिळालेले खूपसे पैसे खर्च करून टाकायचा..शेवटी लक्षात आलं की त्याच्याजवळ दोन्हीपैकी काहीच उरलं नाही..
३३.४
सगळ्यांच्या पुढे जायचं म्हणून भरधाव वेगाने तो धावत सुटला आणि त्याच्या अपेक्षित मुक्कामी तो जाऊन पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याला प्रश्न पडला की त्याच्या जिंकण्याचा आनंद वाटायचा कुणाबरोबर?
३३.५
मुलांनी तोंडाने मागितलेली प्रत्येक गोष्ट पुरवून तो मुलांची खूप काळजी घेतो अस त्याला वाटायचं. त्याला तेव्हा जाग आली जेव्हा एकदा तो आजारी पडल्यावर त्याच्या मुलाला फोनवर त्याच्या मित्राशी बोलताना ऐकलं की, ” अरे आज पार्टीला नाही येऊ शकणार यार!! घरचं ATM बिघडलंय”