
३२.१
त्याच्या मित्राने त्याला खूप रकमेचं कर्ज दिलं. त्याने मित्राला विचारलं “हमीपत्र कुठल्या वकीलाकडून करून घेऊया?” मित्र म्हणाला, “कागद नको. तू फक्त शब्द दे. तुझ्या संकारांचं हमीपत्र पुरेसं आहे माझ्यासाठी”
३२.२
विषण्ण मनाने तो देवळात गेला पण मन शांत झालं नाही त्याचं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तो त्याच मनस्थितीत स्मशानात गेला. तिथे जळणाऱ्या एकाकी प्रेताकडे पाहिल्यावर त्याच्या मनावरच्या त्याने स्वतःच ओढवून घेतलेल्या सगळ्या ओझ्यातील फोलपण त्याला कळलं आणि सगळी चिंता जळून गेली त्या चितेतच…
३२.३
साधू संन्यासी हे न पाहिलेल्या कुठल्यातरी ईश्वरासाठी सर्वसंगपरित्याग का करतात असा त्याला नेहमी प्रश्न पडायचा. पण त्याच्या म्हातारपणात त्याने आयुष्यभर कष्ट करून कमावलेली त्याची संपत्ती समाजासाठी का दान करून टाकली याचंही उत्तर तो कधी देऊ शकला नाही.
३२.४
आलेल्या संकटात देव माझी काहीच मदत करत नाही असं मला वाटायचं. परवा चालण्याचा प्रयत्न करताना एक मूल धप्पकन पडलं, कुणी बघत नाही ना! याची याची खात्री करून ते पुन्हा उभं राहून चालू लागलं हे पाहून मला चटकन हसू आलं आणि त्या हास्यात माझं मलाच माझ्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं.
३२.५
तिने उत्साहाने कवितेच्या दोन ओळी कागदावर लिहिल्या. तेवढ्यात चुकून तिच्या जोडीदाराच्या हातून पाणी पडलं त्यावर आणि शाई पसरली संपूर्ण कागदावर आणि लिहिलेल्या कवितेचे शब्द धूसर झाले त्यामुळे. तिने तो कागद त्या पसरलेल्या शाईशकट आणि पुसट झालेल्या शब्दांसकट तसाच वाळू दिला आणि मग खाली लिहिलं “माझं आत्मचरित्र”.