
कृपया पुढील कुठल्याही अलक चा संबंध राजकारणाशी जोडू नये. काही व्यक्ती किंवा प्रसंगाशी साम्य हा केवळ नकळत घडलेला योगायोग आहे
३१.१
खूप वर्षांनी मी परवा रद्दी टाकायला रद्दीवाल्याकडे गेलो. त्याने रद्दीचं वजन करून अर्धेच पैसे दिले. मी कारण विचारल्यावर तो निरागसपणे म्हणाला,” दादा, काय जादू झाली माहीत नाही, पण हल्ली पूर्वीपेक्षा दुप्पट माल पारड्यात घालावा तेव्हा कुठे वजन भरतं. परवा कुणीतरी म्हणतही होतं की हल्ली वर्तमानपत्राचं पूर्वीइतकं वजन नाही राहिलेलं”
३१.२
परवा एका वर्तमानपत्रात जाहिरात बघितली. “रस्त्यांच्या कामासाठी निविदा मागवण्यात येत आहे, कंत्राटदाराने प्रस्तावित रस्त्याला खड्डे पडल्यावर त्याच्या डागडुजीचा येणारा खर्च निविदेत वेगळा दाखवावा”
३१.३
त्याने पाहिलं की गावातला खूप दिवस साचलेला उकिरडा साफ करायला सुरवात केल्यामुळे जी दुर्गंधी पसरली त्याचा दोष गाववाले तो उकिरडा साफ करणाऱ्यालाच देतायत. त्याला कळेना की याला गावाचं दुर्दैव म्हणायचं की गाववाल्यांचा अडाणीपणा?
३१.४
देशाचं रक्षण करता करता शाहिद झालेल्या एका सैनिकासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन दोन मिनिटं डोळ्यात पाणी आणून मौन पाळलं आणि मग कुठल्याश्या आरक्षणाचा असंतोष देशात कसा पेटवायचा याची चर्चा त्यांनी करायला सुरुवात केली.
३१.५
गावात एका जागृत देवतेचा जन्मोत्सव वर्षानुवर्षे साजरा होत होता. कुणीतरी सरकारदरबारी तक्रार करून केस ठोकली. त्या देवतेचं बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही या एका तांत्रिक मुद्यामुळे केसचाही निकाल लागत नाही आणि जन्मोत्सवही साजरा होत नाही.