
२९.एक ढग नुसताच गर्जायचा बरसायचाच नाही. त्याने आषाढातल्या ढगांशी फारकत घेऊन वेगळा पक्ष काढलाय म्हणे !!
२९.त्याने कुणालाच कधी मदत केली नाही, तो कधी कुणात मिसळला नाही, उलट शेजारच्यांना शिव्याच देत राहिला. एक दिवस अचानक घरात पाणी शिरलं त्याच्या आणि सगळा गाव मदतीला धावला. पण सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तो सगळ्यांना एवढंच म्हणाला की,” कामच होतं ते तुमचं शेजारधर्म म्हणून” गावकरी फक्त स्तब्ध होऊन पाहात राहिले.
२९.” मी जाईन एकटा, मला तुझी गरज नाही” असं म्हणून छोट्या भावाने त्याच्या मोठ्या भावाचा हात झिडकारून सोडून दिला. त्यावर मोठ्या भावाने एवढंच विचारलं की,”माझ्याकडच्या मिठाईच्या डब्याचं काय?”
मुकाट हात धरला ना राव परत छोट्याने मोठ्याचा..!!
२९.गावात एक बलदंड पहेलवान आला. तो गावात आल्यावर सगळ्यांची हवाच गेली. सगळ्या स्थानिक मल्लांनी एकत्र येऊन त्याला हरवायचं ठरवलं. शेवटी त्या मोठ्या मल्लाला हरवल्यावर जेत्याचा मुकुट कुणी घालायचा यावरच त्या सगळ्या मल्लांमध्ये मारामारी झाली आणि सगळेच जायबंदी झाले. गंमत म्हणजे सगळे स्थानिक मल्ल एकत्र येतायत हे कळल्यावर तो दणकट मल्ल पूर्णपणे निश्चिन्त होता.
२९.एकाने त्याला विचारलं “तुम्ही फारच बाता मारता बुवा!. पण इडली आणि पराठा एकाच ताटात खायला लोकांना कसं शिकवणार?” त्यावर तो एवढंच उत्तरला,” लोकांचं लक्ष इडली का पराठा यापेक्षा त्यांच्या पोटात भूक आहे आणि पानांत ते ती भूक भागवणारं अन्न आहे याकडे वेधलं की तंटाच मिटेल सगळा हा विश्वास आहे माझा”.