
२७.१
एक दिवस मराठी भाषा कशी समृद्ध आहे याबद्दलचा लेख माझ्या वाचनात आला. त्या लेखकाचा मराठीबद्दलचा अभिमान पाहून माझं उर भरून आलं. एकच वैषम्य वाटलं की तो विचारलेख त्याने अस्खलित इंग्रजीत लिहिला होता.
२७.२
एका प्रदर्शनात महान व्यक्तींचे पुतळे विक्रीस ठेवलेले बघून मी मूर्तिकाराला विचारलं,” मूर्ती विकत घेऊन घरात ठेवल्यावर, त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन विचार बदलतील माणसांचे ?” तो म्हणाला,” विचारांशी कोणाला घेणं देणं आहे साहेब? या माणसांची नावं विकून त्यांच्या जीवावर अनेक लोक पिढ्यानपिढ्या चैनीत राहिले आहेत आणि पुढेही राहतील साहेब. मी पोटासाठी त्यांच्या केवळ मूर्ती विकतोय इतकंच”
२७.३
त्याचा मुलगा घरी आला आणि म्हणाला, “डॅडी थोडी कॅश द्या. क्रीशचा हॅपी बद्दे येतोय ना म्हणून आम्ही स्कूलमधून मॅकडोनाल्ड मध्ये जाणार आहोत पार्टी ला” क्रीश नावाचा कोणी मुलाचा मित्र आहे त्याचा उल्लेख त्याने या पूर्वी कधी ऐकला नव्हता. तो थोडा गोंधळात पडला. खूप वेळाने त्याला लक्षात आलं की पोरगं गोकुळाष्टमी साजरी करायला वर्गणी मागतंय.
२७.४
एका विचारवंतांना मी एकदा विचारलं,” संस्कृती बदलते आहे म्हणजे नक्की काय होतंय याचं उदाहरण द्या थोडक्यात” ते म्हणाले सोपं आहे. “पूर्वी लोक बाहेर काम करून घरी जेवायला यायचे. हल्ली तुम्ही मंडळी घरून काम करता आणि बाहेर जेवायला जाता” . मी निःशब्द.
२७.५
अंथरुणाला खिळलेल्या आईला एकटं सोडून हजारोंच्या संख्येने निघालेल्या त्या मोर्चात तो सामील झाला. अचानक त्याला बातमी मिळाली की त्याची आई देवाघरी गेली. त्यांनी मोर्चातच खूप जणांना विचारलं पण आवश्यक चार जण काही तो मिळवू शकला नाही. मोर्चात सामील होण्यासाठी मिळणारे पैसे बुडवून कोण यायला तयार होणार ?