
२६.१
ती नेहेमीसारखीच कॉल आल्यावर हॉटेलवर गेली. शरीर उस्कटलं जाण्याची सवय झाली होती तिला आता, पण त्या दिवशी मिळणारे पैसे मात्र खूप महत्वाचे होते कारण दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेची फी भरायची होती…
२६.२
त्याला प्रश्न पडला की सरहद्दीवर देशासाठी लढताना रक्त सांडलेल्या जवानांना, त्यांनी देशासाठी जीव गमावला म्हणून नुकसान भरपाई दिलेली ऐकली नाही कधी. मग विचार करताना त्याचं त्यालाच उत्तर मिळालं की जवान आरक्षणापेक्षा रक्षणाची चिंता अधिक करतात म्हणून असेल कदाचित…
२६.३
तो परदेशातून सुटीवर आला आणि जवळजवळ 25 वर्षांनी तो गावी गेला. गावातलं सामाजिक वातावरण पूर्ण बिघडलं होतं. कारणं शोधताना त्याला दोन गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे गावात टीव्ही पोहोचला होता आणि दुसरं म्हणजे शाळेतले आदर्श व्यक्तींचे फोटो बदलले गेले होते…
२६.४
गावात त्याला वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं. त्यासाठी त्याने एक सोपा उपाय केला. गावात सुविधा काहीच जणांसाठी दिल्या आणि काठ्या मात्र प्रत्येकाला मिळतील याची खात्री केली. पुढचं काम लोकांनीच आपणहून केलं.
२६.५
आपला मुलगा खोटं बोलतो म्हणून त्याच्या लहानपणी त्या पालकांना जितकं वैषम्य वाटायचं त्याही पेक्षा जास्त वैषम्य आता त्याच गुणासाठी त्याला निवडणुकीचं तिकीट मिळून त्याच्या गळ्यात हार पडताना पाहून वाटतंय. त्यांना एक मात्र कळलं की संस्काराचीच व्याख्या बदलली आहे आता….