
२५.१
मित्राला रुग्णालयात बघायला गेलं असता त्याच्या शेजारच्या बेडवर एकटाच असणाऱ्या एका रुग्णाशीही त्याच्या तासभर गप्पा झाल्या. त्याला नंतर कळलं की तेवढ्यानेही दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाच्या तब्येतीत खूप फरक पडला होता. आता तो संध्याकाळचा वेळ सिनिअर सिटीझन क्लब ऐवजी रुग्णालयात रुग्णांशी हलक्या फुलक्या गप्पा मारण्यात घालवतो. गंमत म्हणजे त्याच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा होत आहे असं परवाच त्याच्याही डॉक्टरनेही त्याला त्याचे रिपोर्ट्स बघून सांगितलं.
२५.२
एक नेता सांगत होता, “एकवेळ पाणी आलं नाही तरी चालेल, रस्त्यांवर खड्डे असले तरी चालेल, दुघ मिळालं नाही तरी चालेल ते सहन करा पण आपल्या अस्मितेला धक्का लागू देऊ नका.” अस्मिता या शब्दाचा अर्थ कळला नाही अर्ध्या जणांना, पण सभेतून अनुयायी घरी परतले ते भारावलेल्या मनस्थितीतच, त्या नेत्याच्या जवळच्या एका नातेवाईकाच्या कंपनीने टँकरने पुरावलेलं पाणी विकत घ्यायला.
२५.३
तिरंग्यात लपेटून आलेल्या आपल्या मुलाच्या कपाळावरून मायेने हात फिरवत ती माऊली म्हणाली,”तरी म्हणत होते, हातावर दही देते, पण घाईघाईत न ऐकताच बाहेर पडलास. आईचं एकदाच न ऐकल्याची खूप मोठी शिक्षा मिळाली रे तुला”
२५.”यांच्यामुळे आपल्या जातीच्या माणसांना शहराबाहेर जावं लागतं” असं म्हणून तो त्या जातीविरुद्ध नेहेमी आगपाखड करायचा. शेवटी आपली शहरातली मोक्याची प्रॉपर्टी त्याच जातीच्या बिल्डरच्या हाती सोपवून गडगंज खिसा भरून कोकणात आपल्या गावी जाऊन बांगला बंधून राहू लागला. गम्मत म्हणजे त्या जातीविषयीची त्याची आगपाखड तिथेही सुरूच राहिली.
२५.तो आईचं श्राद्ध करत होता. तिथे त्याला क्लायंटचा फोन आला. याही वेळी त्याने आईकडे दुर्लक्ष केलं आणि फोन घेतला. पिंडाला कावळा शिवला नाही तर “अंधश्रद्धा आहे नुसती” असं म्हणून तो पुढच्या मिटींगला निघूनही गेला. तो नवसाचा होता हे त्याला कुठे माहीत होतं?