
२२.१
एकदा एका सुगंधालयात जाऊन त्याने स्वतःसाठी पाच हजार रुपयांची उंची अत्तरं खरेदी केली. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो दुकानदाराला म्हणाला ,” अरे तुझ्याकडे स्वस्तातल्या उदबत्त्या असतील तर दे. आईला देवपूजेसाठी हव्या आहेत.”
२२.२
तो आईबाबांना दररोज देवाला नमस्कार करताना पाहायचा पण आईबाबांनी कितीही वेळा सांगितलं तरी तो देवाला नमस्कार करायचा नाही. सध्या तो शिक्षणासाठी परदेशात आहे. आता त्याच्या खोलीत एक छोटं देवघरही आहे आणि संध्याकाळी दिवा लावून तो रामरक्षाही म्हणतो दररोज. उपदेशापेक्षा कृतीचा वस्तुपाठ अधिक संस्कारी असतो हेच खरं!!
२२.३
शिष्याने गुरुजींना विचारलं ,”गुरुजी आम्हाला संगीत शिकवत असताना कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी का येतं?”
गुरुजी उत्तरले,”जे स्वतःलाच नीट कळलं नाही ते दुसऱ्याला शिकवताना अपराधी वाटतं रे!”
“मग तरी का शिकवता?” शिष्याने विचारलं
गुरुजी उत्तरले, “अपराधी वाटूनही केवळ कर्तव्य म्हणून मनापासून शिकवलं जातं ना, तेव्हाच परंपरा घडतात बेटा !!”
२२.४
तिनसांजा उलटून गेल्या तरी ती शेवटच्या गिऱ्हाईकाची वाट पाहत मंदिराबाहेर थांबली होती. कारण तिच्या बरोबर असणाऱ्या गाईसाठी शिळ्या भाकरीपोळीचा बनवलेला गोळा खायला घालण्याचं पुण्य कुणा धनिकाला विकूनच तिला आज तिच्या तान्ह्यासाठी दुघ विकत घेता येणार होतं.
२२.५
साहेबांचा पीए म्हणून रात्रंदिवस तो राबायचा. साहेबही त्याला त्याच्या तोंडावर माझा तानाजी म्हणायचे. फरक एवढाच होता की आधी लगीन कोंढण्याचं मग जमलंच तर रायबाचं असं पीए नाही तर साहेब म्हणायचे.